तंत्रज्ञान बदलतं तसं उपकरणं त्यांचं रूपडं बदलतात. टीव्हीच्या बाबतीतही हे खरं आहे. कधी काळी अँटेनाशी होणारी झटापट आता इंटरनेट कनेक्शनपर्यंत येऊन पोहोचली आहे. ओव्हर-द-एअर ब्रॉडकास्ट, अँटेना, केबल, डिश टीव्ही असं करत करत जमाना इंटरनेट टीव्हीचा आला. ओव्हर-द-एअर ब्रॉडकास्टच्या बाबतीत अँटेना रेडिओ लहरी पकडायचा आणि इमेजेस-साऊंड टीव्ही सेटकडे ट्रान्समिट करायचा. त्यामुळेच या लहरी पकडण्यासाठी अँटेनाच्या हातापाया पडावं लागायचं. केबल टीव्ही आले आणि चित्र बदललं. टीव्ही सेट किंवा सेट टॉप बॉक्सला केबल जोडलेली असते आणि तिथून ती केबल नजीकच्या मोठय़ा अशा केबल अँटेनाला जोडली जाते. सध्या असलेले टेलिव्हिजन्स हे केबल किंवा डिश टीव्हीचाच आधार घेतात, पण याला स्पर्धा देणारं तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट टीव्ही किंवा आयपी टीव्ही.

सर्वात लोकप्रिय असं तंत्रज्ञान कुठलं? या प्रश्नाचं उत्तर तसं कठीणच. कुणी म्हणेल रेडिओ. कुणी मोबाइल, स्मार्टफोन्सना लोकप्रिय ठरवेल. कुणासाठी कॉम्प्युटर हिट टेक्नॉलॉजी असेल, तर काहींचा कल टेलिव्हिजन अर्थात टीव्हीकडे असू शकतो. यातलं प्रत्येक तंत्रज्ञान हे घराघरांत पोहोचलेलं आहे. कॉम्प्युटरचा अपवाद असू शकतो. मात्र स्मार्टफोन ज्या प्रकारे लोकप्रिय झाला तसाच किंबहुना तेवढाच लोकप्रिय झाला तो टीव्ही. इडियट बॉक्स म्हणून लोकांनी कितीही हिणवलं तरी त्या बॉक्सचं दर्शन झालं नाही असा जीव सापडणं जरा कठीणच.
तंत्रज्ञान बदलतं तसं उपकरणं त्यांचं रूपडं बदलतात. टीव्हीच्या बाबतीतही हे खरं आहे. कधी काळी अँटेनाशी होणारी झटापट आता इंटरनेट कनेक्शनपर्यंत येऊन पोहोचली आहे. ओव्हर-द-एअर ब्रॉडकास्ट, अँटेना, केबल, डिश टीव्ही असं करत करत जमाना इंटरनेट टीव्हीचा आला. ओव्हर-द-एअर ब्रॉडकास्टच्या बाबतीत अँटेना रेडिओ लहरी पकडायचा आणि इमेजेस-साऊंड टीव्ही सेटकडे ट्रान्समिट करायचा. त्यामुळेच या लहरी पकडण्यासाठी अँटेनाच्या हातापाया पडावं लागायचं. केबल टीव्ही आले आणि चित्र बदललं. टीव्ही सेट किंवा सेट टॉप बॉक्सला केबल जोडलेली असते आणि तिथून ती केबल नजीकच्या मोठय़ा अशा केबल अँटेनाला जोडली जाते. सध्या असलेले टेलिव्हिजन्स हे केबल किंवा डिश टीव्हीचाच आधार घेतात, पण याला स्पर्धा देणारं तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट टीव्ही किंवा आयपी टीव्ही.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर व्हिडीओ आणि ऑडिओ इंटरनेटमार्फत पाठवणं म्हणजे इंटरनेट टीव्ही. म्हणूनच कॉम्प्युटर स्क्रीन, टेलिव्हिजिन सेट (सेट टॉप बॉक्सच्या मदतीने) किंवा मोबाइल फोन्स, स्मार्टफोन्स, आयपॅड, आयपॉडवर इंटरनेट टीव्ही बघता येऊ शकतो. अँटेना किंवा केबलच्या मार्फत ज्या पद्धतीने ऑडिओ-व्हिडीओ पाठवले जातात अगदी तसाच प्रकार आयपी टीव्हीच्या बाबतीत आहे. फरक एवढाच की, इथे इन्फॉर्मेशन ही इंटरनेटवरून डेटाच्या रूपात पाठवली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट टीव्हीमध्ये केबल टीव्हीपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात.
इंटरनेट टीव्ही ही तुलनेने नवीन संकल्पना आहे. क्वालिटी, कंटेंट, किमतीनुसार आयपी टीव्हीचं सबक्रिप्शन घेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. सध्याच्या घडीला इंटरनेट टीव्ही ब्रॉडकास्टिंगच्या दोन प्रमुख पद्धती आहेत. एक म्हणजे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि दुसरं म्हणजे ऑन डिमांड व्हिडीओज.
डब्लूडब्लूआयटीव्ही नावाची एक वेबसाइट आहे. या वेबसाइटवर लाइव्ह ब्रॉडकास्ट होणाऱ्या चॅनेल्सची एक यादी असते. प्रत्येक देशानुसार ही यादी बनवली जाते. आपल्याला हव्या त्या देशावर क्लिक करायचं आणि तिथे उपलब्ध असणाऱ्या चॅनल्सवर क्लिक करून तो बघायचा. काही टीव्ही नेटवर्क्‍सवर लाइव्ह स्ट्रीमिंगचा पर्याय असतो. जसा टीव्हीवर एखादा कार्यक्रम दिसतो अगदी तसाच तो कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतो. तो कार्यक्रम चालू असताना पॉझ करणं किंवा रिवाइंड-फॉरवर्ड करणं शक्य नसतं. जसा टीव्ही सुरू असतो तसंच हे लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असतं. अनेकदा नेहमीच्या टीव्हीपेक्षा काही सेकंद उशिराने ऑडिओ-व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये दिसत असते.
याउलट ऑन डिमांड व्हिडीओज हे एखाद्या प्लेलिस्टसारखे असतात. एपिसोड्स किंवा क्लिप्स हे त्यांच्या नावानुसार किंवा चॅनेलनुसार किंवा क्रीडा, बातम्या, म्युझिक व्हिडीओ अशा प्रकारानुसार अरेंज केलेले असतात. आपल्याला हवा तो प्रोग्राम आपण मागवून तो बघू शकतो. हे प्रकरण बरंचसं यूटय़ूबसारखं काम करतं. हव्या त्या चॅनेलवरचा एखादा आवडता प्रोग्राम त्या त्या चॅनेलच्या वेबसाइटवर असलेल्या व्हिडीओजमध्ये अनेकदा पाहता येतो.
आयपीटीव्ही ब्रॉडकास्टिंगचे हे दोन मूलभूत प्रकार आहेत, पण कसंय ना, की कुठलाहा टीव्ही हा सहसा फुकट नसतो. त्यामुळेच आयपी टीव्हीच्या बाबतीतही फी मोजावी लागते.
काही काही चॅनेल्स हे मोफत असतात हे खरं आहे. अनेक अशा टीव्ही साइट्स आहेत ज्यात विनामूल्य कार्यक्रम दाखवतात. त्यामुळे दरमहा इंटरनेटचे जे दर आहेत तेवढेच फक्त भरावे लागतात. बाकी सगळं मोफत. मात्र याचा अर्थ असा नाही की, हे चॅनल्स पैसे कमावत नाहीत. आपल्यावर अधूनमधून होणारा जाहिरातींचा भडिमार हा यांच्या कमाईचा मुख्य स्रोत. ५ सेकंदांपासून ते ३० सेकंदांपर्यंतच्या जाहिराती व्हिडीओच्या आधी किंवा मध्येच टाकल्या, की दर्शक नाइलाजाने त्या बघतोच.
दुसरा प्रकार म्हणजे सबस्क्रिप्शन. ज्या पद्धतीने आपण केबलवाल्याला दरमहा पैसे देतो, डिश टीव्हीचे दरमहा बिल भरतो तशी मासिक फी भरून चॅनेल्स बघता येतात. आपल्या आवडीनुसार ज्यादा पैसे भरून अतिरिक्त चॅनल्स मागवताही येतात.
फी आकारणीचा तिसरा प्रकार म्हणजे पे पर व्ह्य़ू. जर का वेबसाइट मोफत असेल तर पे पर व्ह्य़ू किंवा पॉडकास्टची फी फारशी नसते. बहुतांश वेळा हे व्हिडीओज मोफत असतात. काही वेळा एखाद्या विशिष्ट प्रकारामधले काही व्हिडीओज मोफत असतात, तर इतर व्हिडीओज पाहण्यासाठी प्रति व्हिडीओ पैसे भरावे लागतात. हे पैसे खिशाला कात्री लावणारे नसतात.
आयपीटीव्ही हा प्रकार तूर्तास नवीन आहे, पण तितकीच रंजक आहे याची कार्यपद्धती. हे आयपीटीव्ही नेमके कसे काम करतात ते आपण बघू या पुढल्या भागात.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

Story img Loader