बाजारात हेडफोनचे अनेक प्रकार उपलब्ध झाले असल्याने वापरकर्त्यांना चांगले पर्याय मिळू लागले आहेत. ऑन इअर, इन-इअर, वायरलेस, ब्लूटूथ अशा पारंपरिक पर्यायांतही कंपन्यांनी छोटे-मोठे बदल करून वापरकर्त्यांच्या कानांना चांगल्या आवाजाची अनुभूती कशी मिळेल, याकडे लक्ष दिले आहे. बहुतांश वेळा स्मार्टफोनसोबत येणाऱ्या ‘इन इअर’ हेडसेटचा वापर केला जातो. परंतु अनेकदा कंपन्या मोबाइलचा निर्मितीखर्च आटोक्यात ठेवण्यासाठी अशा इअरफोनच्या दर्जामध्ये तडजोड करताना दिसतात. त्यामुळे मोबाइलमध्ये डॉल्बी किंवा स्टिरिओ साऊंडची सुविधा असूनही हेडफोनमधून तितका दर्जेदार ध्वनी ऐकायला मिळत नाही. अशा वेळी सीहजिकच बाजारात स्वतंत्रपणे मिळणाऱ्या हेडफोनकडे वापरकर्त्यांचा मोर्चा वळतो. वापरकर्त्यांच्या विशेषत: तरुणवर्गाच्या संगीतप्रेमामुळे बाजारात हेडफोन उत्पादनांचे स्वतंत्र ‘सेगमेंट’च तयार झाले आहे. सोनीसारख्या बडय़ा बडय़ा कंपन्या यात आघाडीवर असतानाच छोटय़ा कंपन्यांकडूनही दर्जेदार हेडफोनची निर्मिती केली जात आहे. ‘ऑडिओ टेक्निका’ ही अशीच एक कंपनी आहे. या कंपनीचे नाव सुपरिचित नसले तरी गेल्या काही वर्षांत या कंपनीकडून मोठय़ा प्रमाणात विविध श्रेणीतील आकर्षक व दर्जेदार हेडफोनची निर्मिती करण्यात येत आहे. याच कंपनीने अलीकडे बाजारात ‘एटीएच-एस १००’ या नावाचे हेडफोन आणले आहेत. या हेडफोनमधून उत्पन्न होणारा दमदार ध्वनी हे त्याचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
‘ऑडिओ टेक्निका’ने गेल्या महिन्यातच हेडफोनची सहा-सात नवीन उत्पादने भारतीय बाजारात सादर केली. त्यामध्येच ‘एस १००’ हा हेडफोन आहे. अतिशय कमी वजनाचा, आटोपशीर आकार आणि सुटसुटीत रचना असलेला असा हा हेडफोन आहे. या फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये नव्याने विकसित करण्यात आलेले ३६मिमी ड्रायव्हर बसवण्यात आले असल्याने त्यातून ‘बेस’ आणि ‘बिट’ध्वनी अतिशय दमदारपणे बाहेर येतो. या हेडफोनला १.२ मीटर लांबीची कॉर्ड असल्याने हेडफोन हाताळणे सोपे जाते. हा हेडफोन ‘ऑन इअर’ असल्याने ध्वनी व्यवस्थित ऐकता येतो. शिवाय त्यात सुस्पष्टताही आहे. या हेडफोनला ३.५ मिमी आकाराचा प्लग देण्यात आला असल्याने स्मार्टफोनशिवाय संगणक, टीव्ही किंवा अन्य साधनांनाही तो बसवून संगीताचा आनंद लूटता येतो. सध्या हा हेडफोन काळा, हिरवा, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांत उपलब्ध आहे. याची किंमत १६९९ इतकी आहे.