सध्या बाजारात नवनवीन स्मार्टफोनची गर्दी होऊ लागली आहे. यामध्ये चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोनने बाजारात आघाडी घेतली आहे. यातच मेड इन इंडिया स्मार्टफोननेही भारतीय स्मार्टफोन बाजारात चंचूप्रवेश केला आहे. यात झिऑक्स मोबाइल ही कंपनी सध्या आघाडीवर आहे. विविध प्रकारे ब्रॅण्डिंग करून कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीचा झिऑक्स अॅस्ट्रा टायटन फोर जी हा फोन बाजारातील सर्वात स्वस्त अत्याधुनिक फोन म्हणून ओळखला जात आहे. पाहुयात कसा आहे हा फोन.
सध्या भारतीय बाजारात दिसत असलेल्या फोनच्या ‘स्मार्ट’ गर्दीमध्ये आपल्याला अगदी पंचवीस मेगापिक्सेलचे फोनही उपलब्ध आहेत. याचबरोबर अत्याधुनिक सुविधाही या फोन्समध्ये आहेत. मात्र या सर्व सुविधा परदेशी कंपन्यांनी विचार केलेल्या आहेत. यामुळे अनेकदा स्मार्टफोनशी फारशी मैत्री नसलेल्या वापरकर्त्यांना हे फोन्स वापरणे अवघड वाटते. म्हणूनच भारतीय कंपन्यांनी खास भारतीयांसाठी त्यांना परवडेल अशा किमतीत अत्याधुनिक फोन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी झिऑक्स मोबाइलने अॅस्ट्रा मालिका बाजारात आणली. यातील सर्वात अत्याधुनिक असा अॅस्ट्रा टायटन फोर जी हा फोन बाजारात आणला.
डिस्प्ले, रॅम, प्रोसेसर
या फोनमध्ये पाच इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला २.५ अंशांचे वळण देण्यात आले आहे. हा फोन अधिक आकर्षक दिसतो. याचा डिस्प्ले एचडी असला तरी टच सेन्सर हा इतर महागडय़ा फोनच्या तुलनेत जड वाटतो. यामुळे ज्यांनी याआधी महागडा फोन वापरला असेल त्यांना मात्र या फोनमध्ये टच करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त शक्ती वापरावी लागणार आहे. या फोनमध्ये १.३ गीगाहर्टझचा क्वाडकोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे, तर फोनमध्ये एक जीबी रॅम देण्यात आली आहे.
यामुळे फोनचा वेग चांगला असला तरी एका वेळी जास्त अॅपचा वापर झाल्यास काहीवेळा हा वेग मंदावतो.
साठवणूक क्षमता
भारतीयांसाठी मोबाइलमध्ये साठवणूक क्षमता जास्त असणे खूप महत्त्वाचे असते. यामुळेच या फोनमध्ये १६ जीबी साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. याचबरोबर यामध्ये ही साठवणूक क्षमता आणखी ६४ जीबीने वाढण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे या फोनमध्ये ८० जीबीपर्यंतची साठवणूक क्षमता मिळू शकते. या फोनच्या किमतीमध्ये इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या फोनच्या तुलनेत ही साठवणूक क्षमता अधिक असल्याचे म्हणता येईल.
कॅमेरा
या फोनमध्ये मुख्य कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही पाच मेगापिक्सेलचे देण्यात आले आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फोन्सच्या तुलनेत हे मेगापिक्सेल कमी असले तरी यातील कॅमेराचा दर्जा उत्तम आहे. यामुळे पाच मेगापिक्सेलमध्येही उत्तम छायाचित्र टिपता येते. याचे छायाचित्र टिपण्यासाठी विविध मोड्स देण्यात आले आहेत. याचबरोबर या कॅमेरामध्येच क्युआर कोड रीडर देण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला क्युआर कोड वाचण्यासाठी वेगळे अॅप घेण्याची गरज भासणार नाही.
बॅटरी बॅकअप
या फोनची इतर क्षमता लक्षात घेता त्याला पुरेशी अशी तीन हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे या फोनचा पुरेपूर वापर केल्यास पाच ते सहा तास बॅटरी वापरता येऊ शकते. मर्यादित वापर केल्यास दहा तासांपर्यंतही बॅटरी वापरता येऊ शकते.
सॉफ्टवेअर आणि जोडणी
या फोनमध्ये अॅण्ड्रॉइडची अद्ययावत आवृत्ती वापरण्यात आली आहे. अॅण्ड्रॉइड ७.० नोगट या ओएसचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. यामुळे या फोनमध्ये सर्व अॅप्स काम करू शकतात. तसेच त्यांचा काम करण्याचा वेगही जास्त असल्याचे जाणवतो. या ऑपरेटिंग प्रणालीमुळे फोनमध्ये एकापेक्षा जास्त अॅप्स एकाच वेळी वापरता येऊ शकतात. या फोनमध्ये डय़ुएल सिम यामध्ये मॅक्रो आणि नॅनो दोन्ही सिमकार्ड बसवता येऊ शकतात. याशिवाय फोनमध्ये फोरजी व्हीओएलटीई आणि व्हीआयएलटीई सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय जीपीएस, वायफाय, हॉटस्पॉट, ब्लूटय़ुथ, ओटीजी केबल सपोर्ट अशा विविध प्रकारे जोडणी देण्यात आली आहे. यामुळे फोनचा वापर करताना तुमचे कोठेही अडणार नाही. यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वापरण्यात आले आहेत. यामुळे अॅपचा वापर करण्यामध्ये खूप फरक पडतो.
भाषा स्वातंत्र्य
खास भारतीयांचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या या फोनमध्ये भाषा स्वातंत्र्य असल्याचे आपण म्हणू शकतो. यात मराठीसह २१ भारतीय भाषांचा पर्याय देण्यात आला आहे. या भाषांमध्ये केवळ फोन वापरूच शकतो असे नाही. तर यामध्ये देण्यात आलेल्या चिलॅक्स या अॅपमध्ये त्या भाषेतील मनोरंजनाचे व्हिडीओज, गाणी आदी गोष्टीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे हा फोन भारतीयांसाठीचा फोन असल्याचे म्हणणे योग्य ठरते.
सुरक्षा सुविधा
सुरक्षेच्या दृष्टीने हा फोन इतर सर्वच फोनच्या तुलनेत खूपच उजवा ठरतो. या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या बोटानेच तुमचा फोन सुरू करू शकता. यामुळे फोन चोरीला गेला किंवा हरवला तरी तुमच्या फिंगरप्रिंटशिवाय त्याचा वापर करणे शक्य होणार नाही. याचबरोबर या फोनमध्ये फिंगरप्रिंट अॅप संरक्षणाची सुविधाही देण्यात आली आहे. ही सुविधा इतर बाह्य़ अॅप सुरक्षा अॅपमध्येही उपलब्ध नसते. यामुळे हे या फोनचे आगळे वैशिष्टय़ ठरते. याहीशिवाय यामध्ये चेहऱ्यावरील हावभावाने फोन लॉक अनलॉक करणे शक्य होते. कारण यामध्ये चेहऱ्याचे हावभाव टिपणारे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे तुम्ही तुमची नजर फिरवून फोन लॉक किंवा अनलॉक होते.
थोडक्यात
या फोनची किंमत ६,५९९ रुपये इतकी आहे. मात्र ई-व्यापार संकेतस्थळांवर हा फोन ५,५९९ पासून उपलब्ध आहे. तसेच हा फोन ऑफलाइन बाजारातही उपलब्ध आहे. अवघ्या साडेपाच हजारांत अत्याधुनिक सुविधा देणाऱ्या फोनच्या स्पध्रेत हा फोन उजवा ठरतो. तो म्हणजे याच्यातील सुरक्षा सुविधांमुळे. तसेच हा फोन भारतीयांच्या आवडी व गरजेनुसार विकसित करण्यात आलेला आहे. यामुळे जर तुम्ही पाच ते दहा हजारांपर्यंत स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर त्यासाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
nirajcpanditNiraj.pandit@expressindia.com