प्रत्येक व्यक्ती स्वत:तील कलागुण, कलाकौशल्य इतरांना दाखवण्यासाठी उत्सुक असते. त्याचप्रमाणे अनेकांना नवनवीन गोष्टी बघण्याची, स्वत:च्या ज्ञानात भर टाकून वेगवेगळे प्रयोग करून पाहाण्याची इच्छा असते. ‘ऑटोडेस्क’चे ‘इन्स्ट्रक्टेबल्स’ (Instructables)(https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.adsk.instructables&hl=en ) हे अ‍ॅप, एक असे ठिकाण आहे जिथे या दोन्ही गोष्टी म्हणजेच नवीन गोष्टी शिकण्याची आणि तुम्ही केलेली नावीन्यपूर्ण गोष्ट जगासमोर ठेवण्याची संधी तुम्हाला मिळते, तेसुद्धा संपूर्णपणे विनामूल्य.

उदाहरणार्थ तुम्हाला मोत्यांचे दागिने, जसे की माळा किंवा ब्रेसलेट बनवून बघायचे आहेत. त्यासाठी सर्चबारमध्ये योग्य ते शब्द टाका. त्याच्याशी संबंधित असलेले सर्च रिझल्ट येथे दिसतील. त्यातील आवडलेले डिझाईन निवडल्यास त्या प्रकारची कलाकृती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, प्रत्येक टप्प्याची कृती फोटोसहित वाचायला मिळेल. काही ठिकाणी संपूर्ण कृतीचे व्हिडीओदेखील उपलब्ध आहेत.

येथे केवळ हस्तकलाच नाही तर तंत्रज्ञानासंबंधी कृती उपलब्ध आहेत.  उदाहरणार्थ कॉम्प्युटरशी संबंधित करड इमेजच्या साहाय्याने विंडोज किंवा लिनस्कची बुटेबल वरइ ड्राइव्ह तयार करणे. लॅपटॉपच्या जुन्या बॅटरीजचा उपयोग करून पॉवरबँक तयार करणे. रासबेरी-पाय मायक्रो संगणक वापरून केलेली प्रोजेक्ट्स. रुबिक्स क्यूब सोडवणारा, ड्रॉइंग काढणारा, चेस खेळणारा रोबो बनवणे आणि यांसारखे इतर अनेक.

तसेच नावीन्यपूर्ण प्रकारच्या पाककृती करून केलेले वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थ, उदाहरणार्थ केक्स, पास्ता, सॅलड्स, कॉफीचे वेगवेगळे प्रकार.

तुम्ही स्वत: बनवलेली कलाकृती/पाककृती/एखादे कॉम्प्युटर अ‍ॅप/विज्ञानातील एखादा प्रयोग इत्यादी लोकांबरोबर शेअर करायचे असल्यास येथे अपलोड करण्याची सोय आहे. त्यासाठी तुम्हाला मुख्य पेजच्या वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या कॅमेऱ्याच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रोजेक्टला नाव देऊन त्याचा प्रकार, उपप्रकार इत्यादी निवडायचा असतो. त्यानंतर प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेले फोटो, व्हिडीओज आणि इतर फॉरमॅटमधील फाइल्स जसे की, फाइल्स वगैरे अपलोड करता येतात. आवश्यक असलेल्या सर्व स्टेप्स येथे टाइप करून तुमचे प्रोजेक्ट या साइटवर प्रसिद्ध करता येते.

येथे अनेक प्रकारच्या स्पर्धा सतत चालू असतात. सध्या बेकिंग, सॉफ्ट टॉइज, वूडन टॉइज अशा अनेक स्पर्धा चालू आहेत. प्रत्येक स्पर्धेचे नियम समजून घेऊन तुम्ही त्यात सहभागी होऊ  शकता.

सतत काही तरी नवीन करू इच्छिणाऱ्यांना, आपले ज्ञान आणि कला इतरांसमोर मांडून त्याचा जास्तीत जास्त लोकांना वापर करता यावा अशी इच्छा असलेल्या सर्वासाठी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे.

मनाली रानडे

 manaliranade84@gmail.com