भारतीय शास्त्रीय संगीत हे जितके मनाला स्पर्शून जाते तितकाच प्रभाव पाश्चात्त्य संगीताचे सूरही ऐकणाऱ्यावर पाडतात. त्यामुळे मैफील भारतीय वा पाश्चिमात्य संगीताची असली तरी श्रोत्यांसाठी ती पर्वणीच असते. या दोन्ही संगीतांतील बरीचशी वाद्ये वेगवेगळी असली तरी अलीकडच्या काळात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये पाश्चिमात्य वाद्यांचा आणि पाश्चिमात्य संगीतात भारतीय वाद्यांचा वापर होताना दिसतो. अशा मिलाफाने संगीताला नवे आयाम मिळवून दिले आहेत. पण अशी वाद्यांची देवाणघेवाण होत असली तरी प्रत्यक्षात ती वाद्ये शिकताना त्यांच्या मूळ शैलीतूनच (भारतीय वा पाश्चिमात्य) शिकावी लागतात. संगीताचे धडे गिरवणाऱ्यांना हा अनुभव हार्मोनियम, गिटार, सिंथेसायझर अशा वाद्यांची संगत करताना विशेषपणे जाणवतो. याचे कारण दोन्ही वाद्यांच्या ‘कॉर्ड्स’ वेगवेगळय़ा असतात. कॉर्डस म्हणजे दोन किंवा अधिक सुरांचे एकत्रित वादन होय. हा प्रकार मूलत: पाश्चात्त्य संगीतशैलीचा भाग आहे. परंतु, आता जवळजवळ संपूर्ण जागतिक संगीताचा ‘कॉर्ड्स’ हा अविभाज्य घटन बनला आहे. अशा वेळी वाद्य वाजवणाऱ्याला नव्याने पाश्चिमात्य शैलीचा अभ्यास करणे गरजेचे पडते. हीच गरज ओळखून विनायक दाबके यांनी अँड्रॉइडवर एक अॅप विकसित केले आहे.
‘Chords and Swara’ नावाचे हे अॅप म्हणजे भारतीय स्वर आणि पाश्चिमात्य कॉर्ड्स यांचा एकत्रित संगम आहे. भारतीय संगीतात सूरवाद्यांची साथसंगत करताना, विशेषत: हार्मोनियम, सिंथेसायझर आणि गिटार या वाद्यांची संगत करताना, कॉर्ड्स वादनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. भारतीय शास्त्रीय संगीताच्या पायावर आधारित संगीतज्ञान असलेल्या कलाकारांना कॉर्ड्सची पाश्चात्त्य नावे (उदा. C Major, C# Minor… इ.) विशेष परिचित नसतात, तसेच पाश्चात्त्य संगीतावर आधारित संगीतज्ञान असलेल्या कलाकारांना कॉर्ड्समध्ये लागलेल्या स्वरांची भारतीय शास्त्रीय नावे (सा, रे, ग, म, प.. इ.) माहीत नसतात, असे बरेचदा पाहण्यास मिळते. या भिन्न सांगीतिक-भाषांमुळे कलाकारांना होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विनायक दाबके यांनी ‘कॉर्ड्स अॅण्ड स्वर’ नावाचे अॅप विकसित केले आहे. व्यवसायाने वादक असलेले विनायक दाबके हे संगीत संयोजक व ध्वनी तंत्रज्ञ असून गेल्या २५ वर्षांपासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. संगीतवादकांना जाणवणारी ही अडचण ओळखून त्यांनी हे नवे अॅप तयार केले आहे. वादकांच्या वादनकलेला भौगोलिक वा शैलीच्या सीमेतून मुक्त करणारे हे अॅप आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रकाशित करण्यात आलेल्या या अॅपचा आतापर्यंत १८००हून अधिक लोकांनी वापर सुरू केला आहे. तसेच भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत शैलीचा संगम साधल्याबद्दल या अॅपचे कौतुकही केले आहे. लवकरच हे अॅप अॅपलच्या अॅप स्टोअरवरूनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या अॅपची ठळक वैशिष्टय़े :
* १२ पट्टय़ांमधून कोणतीही एक पट्टी आणि २९ विविध कॉर्ड्समधून कोणताही एक कॉर्ड निवडण्याची सुविधा
* निवडलेल्या पट्टीमध्ये (scale) निवडलेल्या कॉर्डचे पाश्चात्त्य नाव आणि त्यामधील स्वरांची भारतीय शास्त्रीय नावे – ही माहिती स्क्रीनवर वाचण्याची सोय
* तो कॉर्ड त्वरित तिथल्या तिथे पियानोच्या आवाजात ऐकण्याची सुविधा
* त्याचसोबत स्क्रीनवर दिसणाऱ्या कीबोर्डवर त्या कॉर्डमधील प्रत्येक स्वर स्वतंत्रपणे वाजवून ऐकण्याची सुविधा