इंटरनेट टीव्ही ब्रॉडकास्टिंगचे प्रकार आपण पाहिले. आयपीटीव्हीची संकल्पना नवीन असली तरी त्याचं कामकाज मात्र हटके आहे. आयपीटीव्हीचे कामकाज हे मुख्यत्वे दोन गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे बँडविड्थ आणि दुसरं म्हणजे ऑडिओ-व्हिडीओ स्ट्रीमिंग. बँडविड्थ हा प्रकार समजण्यासाठी अत्यंत सोपा आहे. इंटरनेटच्या संदर्भातल्या गप्पा मारताना अनेकदा हा शब्द कानावर पडतो. इंटरनेट हा एक हायवे किंवा द्रुतगती मार्ग आहे आणि डेटा म्हणजे गाडय़ा अशी कल्पना करा. जेव्हा हायवेवर फक्त एकच गाडी असते तेव्हा ती सुस्साट वेगाने निघून जाते. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला तिला कमी वेळ लागतो. उलटपक्षी जेव्हा हायवेवर खूप गाडय़ा असल्या की ट्रॅफिक होतं. त्यामुळे गाडय़ांचा वेग मंदावतो आणि परिणामी तितक्याच अंतरासाठी जास्त वेळ लागतो.
इंटरनेटचंसुद्धा असंच आहे. एक व्यक्ती जर का फाइल डाऊनलोड करत असेल तर डेटा ट्रान्स्फर चटकन होते. पण एकाच वेळी अनेक जण तीच फाइल डाऊनलोड करत असतील तर मात्र डेटा ट्रान्स्फरचा वेग मंदावतो. या सगळ्या प्रकरणात बँडविड्थ म्हणजे हायवेवर असणाऱ्या लेन. हायवेवर जितक्या जास्त लेन तितका गाडय़ांचा वेग जास्त. वेबसाइटची बँडविड्थ जर का कमी असेल तर त्या वेबसाइटवर ट्रॅफिक वाढेल. पण वेबसाइटने बँडविड्थ वाढवली तर मात्र डेटा ट्रॅव्हलचा वेग वाढून कामकाज सुरळीत होईल. म्हणूनच इंटरनेट टीव्हीसाठी महत्त्वाची आहे ती बॅंडविड्थ. कारण मोठय़ा प्रमाणात व्हिडीओ आणि ऑडिओ डेटा ट्रान्स्फरसाठी जास्त बँडविड्थची गरज असते.
आयपीटीव्हीच्या बाबतीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ-व्हिडीओ स्ट्रीमिंग. स्ट्रीमिंग टेक्नॉलॉजीमुळे व्हिडीओ लाइव्ह किंवा ऑन डिमांड बघणं शक्य आहे. व्हिडीओ डाऊनलोड न करता किंवा कॉम्प्युटरवर कॉपी न करता बघणं या तंत्रज्ञानामुळे शक्य होतं. स्ट्रीमिंग ऑडिओ-व्हिडिओ बघण्याच्या काही मुलभूत पायऱ्या आहेत.
१. व्हिडीओ डेटा हा सव्‍‌र्हरवर असतो.
२. जेव्हा व्हिडीओ बघण्यासाठी आपण प्ले किंवा वॉचवर क्लिक करतो तेव्हा तसा मेसेज सव्‍‌र्हरकडे पाठवला जातो.
३. या मेसेजला सव्‍‌र्हरकडून रिस्पॉन्स दिला जातो. हा रिस्पॉन्स म्हणजेच व्हिडीओ प्ले होणं. हा डेटा पाठवण्यासाठी स्ट्रीमिंग मीडिया प्रोटोकॉल्सचा वापर केला जातो. पाठवण्यात येणाऱ्या डेटाची क्वालिटी अबाधित रखण्याचं काम हा प्रोटोकॉल करतो.
४. सव्‍‌र्हरकडून पाठवण्यात आलेल्या व्हिडीओ सिग्नल्सना डिकोड करण्याचं काम तुमच्या कम्प्युटरवरचे प्लगइन्स किंवा प्लेयर करत असतात.
ही प्रक्रिया झाली इंटरनेट टीव्ही बघण्याची किंवा खरंतर कुठलाही ऑनलाइन व्हिडीओ बघण्याची. आता गंमत अशी आहे की तुमच्याकडे असणाऱ्या इंटरनेट कनेक्शननुसार व्हिडीओची क्वालिटी ठरत असते. जर का कनेक्शन चांगलं असेल तर व्हिडीओची क्वालिटीही उत्तम असते. अर्थात यामध्ये वेबसाइटची बँडविड्थही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
हा सगळा प्रपंच आयपीटीव्ही म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी होता. भविष्यात आयपीटीव्ही हे पारंपरिक टीव्हीला मागे टाकतील का, ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नाही असंच द्यावं लागेल. ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टीव्हीचा असणारा स्क्रीन. लॅपटॉपच्या स्क्रीनवर टीव्ही बघण्याची मानसिकता तयार होणं कठीण आहे. मोठय़ा स्क्रीनवर टीव्ही बघण्याची सवय असल्यामुळे ती मोडणं तसं सोपं काम नाही. म्हणूनच सेट टॉप बॉक्ससारखी संकल्पना रुजू पाहत आहे. आयपीटीव्हीपेक्षा व्हिडीओ ऑन डिमांड ही सुविधा सध्या जगभरात लोकप्रिय आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारली तरच आयपीटीव्ही फायदेशीर ठरू शकतं. व्हिडीओची क्वालिटी चांगली राखण्यासाठी उत्तम इंटरनेटची आवश्यकता असते हे वास्तव आहे.
आपण ज्या पद्धतीने सध्या बातम्या किंवा करमणुकीचे कार्यक्रम बघतो त्यात आयपीटीव्हीमुळे बदल होईल हे मात्र तितकंच खरं आहे. तुम्ही एखाद्या विषयात तज्ज्ञ असाल आणि तितकेच उत्साहीसुद्धा असाल तर स्वत:चा इंटरनेट चॅनेल काढणं सहज शक्य आहे. स्वत:च एखादा शो किंवा स्किट प्रोडय़ूस करण्यासाठीचं तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. स्मार्टफोन्समुळे व्हिडीओ रेकॉर्डिग आणि ऑनलाइन एडिटिंग सॉफ्टवेअर्समुळे व्हिडीओ एडिटिंगही सोपं झालं आहे. त्यामुळेच ब्रॉडकास्टिंग ही संकल्पना सध्या जोर धरतेय. युजर जनरेटेड कंटेट म्हणतात ते हेच.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

Story img Loader