लॅपटॉप अर्थात ‘मांडी-संगणका’ने एक काळ गाजवला. काही वर्षांपूर्वी मोजक्याच जणांकडे नांदणारा हा संगणक आता सर्रास दिसू लागलाय. अख्खाच्या अख्खा कॉम्प्युटर एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं निव्वळ अशक्य. त्यामुळेच निकडीच्या गरजेतून लॅपटॉपचा उदय झाला. ने-आण करायला सहज-सोपा, वजनाने हलका असा हा लॅपटॉप आल्याने जीवन सुकर झालं. (जसं आता स्मार्टफोनमुळे झालंय तसंच) पण स्मार्टफोनमध्ये जशी बॅटरी भराभर डिस्चार्ज होते तसंच या लॅपटॉपमध्येसुद्धा होतं. त्यामुळे अनेकदा हे मांडी-संगणकधारी प्लगला चिकटलेले दिसतात. मधाभोवती मधमाशी तसं चार्जिग प्लगभोवती मोबाइल आणि लॅपटॉपधारी हे चित्र सहज दृष्टीस पडतं; पण मुद्दा हा आहे की, मुळात लॅपटॉपची बॅटरी लवकर डिस्चार्ज का आणि कशी होते? लॅपटॉपच्या बॅटरीचं लाइफ जपायचं तरी कसं?
युसेज सायकल्स – प्रत्येक लॅपटॉपचे ठरावीक असे युसेज सायकल्स असतात. कुठल्याही कंपनीच्या लॅपटॉपचे साधारणत: ५०० पेक्षा जास्त युसेज सायकल्स असतात. प्रत्येक वापरागणिक लॅपटॉपची बॅटरी ड्रेन होत असते. ड्रेन होणं म्हणजे शून्य होणं बरं का. नेहमीच बॅटरी शून्य होईपर्यंत काम केलं जात नाही; पण अनेकदा आपण बॅटरी पूर्णत: डिस्चार्ज झाल्यावर चार्जिगला लावतो. त्यामुळेच बॅटरी जितक्या कमी वेळा ड्रेन होईल तितकी अधिक काळ ती व्यवस्थित काम करू शकेल.
इको-मोडचा सहारा – लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढवायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉवर सेटिंग्जमध्ये जाऊन लॅपटॉप इको-मोडवर ठेवायचा. हल्लीच्या अनेक लॅपटॉप्समध्ये हा पर्याय उपलब्ध असतो. भोवतालच्या परिस्थितीनुसार पॉवर युसेज आणि पर्यायाने बॅटरीचा वापर अ‍ॅडजस्ट करणं यामुळे शक्य होतं. प्रकाशानुसार डेस्कटॉप ब्राइटनेस आपोआप अ‍ॅडजस्ट केला जातो.
हिबरनेशन – याशिवाय आणखी एक उपाय म्हणजे हिबरनेशन मोड. बॅटरी संपूर्ण ड्रेन व्हायच्या आधी लॅपटॉप हिबरेनट मोडवर टाकला तर ५ टक्के बॅटरी वाढते. इतकंच नाही तर काही काळासाठी जर का लॅपटॉपचा वापर करायचा नसेल, तर लॅपटॉप पूर्णपणे शट डाऊन करण्याऐवजी हिबरनेट मोडवर टाकणं सयुक्तिक ठरतं.
प्रोसेसेस बंद करा – याशिवाय पॉवर सेव्हिंगसाठी लॅपटॉपमध्ये असलेल्या अ‍ॅप्स (विंडोज ८ नंतर लॅपटॉपमध्येही अ‍ॅप्सचाच भरणा असतो.) तसंच सॉफ्टवेअर्सचा वेळोवेळी आढावा घेणंही गरजेचं असतं. ज्या प्रकारे स्मार्टफोन्समध्ये बॅकग्राऊंडमध्ये सुरू असणाऱ्या अ‍ॅप्समुळे बॅटरी खर्च होते, तसाच प्रकार लॅपटॉपच्या बाबतीतही होतो. त्यामुळेच टास्क मॅनेजर सुरू करून त्यातल्या प्रोसेसेस टॅबवर क्लिक करायचं आणि नको असलेल्या प्रोसेसेस बंद करायच्या. यामुळे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे बॅटरी तर वाचतेच, पण त्याशिवाय लॅपटॉपचा स्पीडसुद्धा वाढतो.
भोवतालचं तापमान – भोवतालच्या तापमानाचाही लॅपटॉपच्या बॅटरी लाइफवर परिणाम होत असतो. लॅपटॉप एक्स्पर्ट्सचं असं म्हणणं आहे की, ३५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिकचं तापमान हे बॅटरी लाइफवर परिणाम करू शकतं. अशा परिस्थितीत काही साधे उपाय करणं सोयीस्कर आहे, कारण ३५ डिग्री हे भारतासारख्या देशासाठी कमी-अधिक फरकाने बऱ्याचशा शहरांमध्ये असणारं तापमान आहे. त्यामुळेच चार्ज होत असताना जर का लॅपटॉप गरम होत असेल तर प्लग काढायचा आणि बॅटरी व्यवस्थित बाहेर काढायची. थोडा वेळ थंड होऊ द्यायची आणि मग पुन्हा आत घालायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्जिगच्या वेळी लॅपटॉप मांडीवर कधीच ठेवू नका. व्हेंटिलेशनची अडचण भेडसावू शकते. त्यामुळे लॅपटॉप आणखी गरम होऊ शकतो. थंड ठिकाणी लॅपटॉप चार्ज करणं हे उत्तम. खरं तर बॅटरीसुद्धा जरा थंड ठिकाणी ठेवण्याचाच सल्ला दिला जातो. तुम्हाला जर का तुमच्या लॅपटॉपचं तापमान जाणून घ्यायचं असेल तर कोअरटेम्प, रीअल टेम्पसारखी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. ही अ‍ॅप्स तुमच्या लॅपटॉपची उष्णता आणि तापमान मोजतात.
बॅटरीची निगा – बहुतांश वेळा लॅपटॉपची बॅटरी ही तो आणल्या दिवसापासून जी आत असते ती कायम आतच राहते. असं न करता त्या बॅटरीलासुद्धा जरा मोकळी हवा खाण्याचं भाग्य लाभू द्यावं. अर्थात लॅपटॉपमधून वेळोवेळी बॅटरी काढून तिची काळजी घेणं याला पर्याय नाही. दर दोन-तीन महिन्यांतून एकदा लॅपटॉपची बॅटरी काढायची आणि ती एका स्वच्छ फडक्याने साफ करायची. तिचे चार्जिग पॉइंट्सही स्वच्छ करायचे. धूळ साफ केल्याने चार्जिगमध्ये अडचण येत नाही.
या सगळ्या उपायांशिवाय वेळोवेळी सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट्स खरंच उपयुक्त असतात. नवीन अपडेट्स हे सॉफ्टवेअरच्या पॉवर कन्झम्प्शनवर आळा घालण्याचं काम करतात.

खालील गोष्टी टाळा संपूर्ण डिस्चार्ज
मगाशी सांगितल्याप्रमाणे लॅपटॉप पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याने तो शटडाऊन होतो. अशा परिस्थितीत शून्यापासून बॅटरी चार्ज होणं तसं कठीण काम असतं. त्यामुळेच लॅपटॉपची बॅटरी शक्यतो १० टक्कय़ांच्या खाली जाऊ देऊ नका. एक आकडी बॅटरीची टक्केवारी दिसायला लागली की थेट प्लग शोधा आणि चार्जिग करा.
हिबरनेशन मोडचा अतिरेक
बॅटरी वाचवण्यासाठी सतत जर का हिबरनेट मोडचा वापर करत असाल तर त्याचा बॅटरीवर वाईट परिणाम होऊ शकतो. सततच्या हिबरनेशनमुळे बॅटरीवर ताण पडतो. त्यामुळेच बॅटरी एका विशिष्ट टक्केवारीपर्यंत मर्यादित ठेवणं गरजेचं आहे.
वापर न करणे
अनेकदा मोठय़ा कालावधीसाठी लॅपटॉपचा वापर केला जात नाही. अशा वेळी लॅपटॉपची बॅटरी संपूर्णत: डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. संपूर्णत: डिस्चार्ज झालेली बॅटरी जर बराच काळ तशीच राहिली तर पुन्हा चार्ज करताना त्रास होतो आणि बराच वेळ लागतो. हे टाळण्यासाठी बॅटरी अर्धी चार्ज करून ठेवणं उत्तम.

 

पुष्कर सामंत
pushkar.samant @gmail.com