कुठलीही भाषा शिकण्यासाठी तिच्या व्याकरणाचा अभ्यास करावाच लागतो. शिवाय अभ्यास केल्यानंतर आपल्याला झालेले आकलन किती योग्य आहे हे पडताळून पाहावे लागते. इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने आपल्याला ती चांगल्या प्रकारे यावी असे सगळ्यांना वाटते यात नवल ते काय? आणि मोबाइल फोनसारखे साधन हातात असल्यावर हे शिकणे आता सहज सुलभ झाले आहे. इंग्रजी व्याकरणावर आधारित असलेली अनेक अॅप्स आज उपलब्ध आहेत. त्यापैकी काही निवडक अॅप्सबद्दल जाणून घेऊ.
यापैकी पहिले आहे ब्रिटिश कौन्सिलचे Johnny Grammarls word challenge.. येथे ग्रामर, वर्डस् आणि स्पेलिंग या तीन कॅटेगरीज आहेत. प्रत्येकात एका मिनिटात जास्तीत जास्त किती प्रश्न तुम्हाला सोडवता येतात हे बघणारा खेळ आहे. व्याकरणातील बारा वेगवेगळ्या पाठांवरील सोप्यापासून अगदी अवघड स्तरापर्यंतच्या प्रश्नमंजूषा आहेत. वर्डस् या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाणारे शब्द ओळखायचे असतात. इंग्लिश शिकताना अचूक स्पेलिंग लिहिण्याला खूप महत्त्व आहे हे आपण जाणतोच. स्पेलिंग या विभागात लिहिताना हमखास चुकणाऱ्या स्पेलिंगपैकी योग्य स्पेलिंग निवडायचे असते. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तो प्रश्न सोडून तुम्ही पुढील प्रश्नावर जाऊ शकता. या अॅपमधील प्रश्नमंजूषा सोडवताना तुम्ही लॉगिन केले असेल तर तुमचा स्कोर लीडर बोर्डवर पोस्ट करू शकता. तसेच तो फेसबुकवर शेअर करू शकता.
Sevenlynx ¨¹FF English Grammar Test या अॅपमधील प्रश्नमंजूषा इंटरमीडिएट आणि अप्पर इंटरमीडिएट अशा दोन स्तरांसाठी बनवल्या आहेत. येथे व्याकरणाचे वीस वेगवेगळ्या पाठांत विभाजन केले आहे आणि प्रत्येक पाठात तीस प्रश्न आहेत. तसेच सर्व पाठांवर आधारित मिश्र प्रश्नमंजूषादेखील आहेत. प्रश्नमंजूषा सोडवून झाल्यावर किती उत्तरे बरोबर आली, किती चुकली आणि किती सोडून दिली याचे प्रगतिपत्रक दिसते. तुमच्या ज्या प्रश्नांचे उत्तर चुकले असेल त्या प्रश्नांचे अतिशय सोप्या शब्दात स्पष्टीकरण दिले जाते. तुमचा प्रत्येक पाठाचा किती अभ्यास झाला आहे हे तपासण्यासाठी अतिशय उपयुक्त अॅप आहे.
LABsterzz चे English Grammar Test हे टू इन वन इंग्लिश लर्निग अॅप आहे. यात इंग्रजी भाषेतील काही मूलभूत गोष्टी शिकायला मिळतील. जसे की अवतरण चिन्हांचा वापर, घडय़ाळातील वेळ सांगण्याची योग्य पद्धत, त्यासाठी वापरले जाणारे शब्द, इत्यादी. त्याचबरोबर अठरा भागांत विभागलेले व्याकरणाचे पाठ शिकायला मिळतील. प्रत्येक पाठ अतिशय सोप्या पद्धतीने उदाहरणांसहित समजावून सांगितला आहे. तसेच व्याकरणाच्या पाठांवर आधारित असलेल्या वीस प्रश्नमंजूषा येथे उपलब्ध आहेत. स्पर्धात्मक परीक्षांमधे रुची असलेल्यांसाठी येथे टेस्ट दिल्यावर गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अशी डिजिटल पदके प्रदान केली जातात.
इंग्रजी भाषा शिकवणाऱ्या या आणि यासारख्या विविध अॅप्समधे मूलभूत गोष्टी सारख्याच असल्या तरी प्रत्येक अॅपचे काही तरी वेगळेपण असते. इच्छुक आणि परीक्षार्थीनी या अॅप्सचा तुलनात्मक अभ्यास करून आपल्या आवडीप्रमाणे त्याचा वापर करावा.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com
अॅपची शाळा : अचूक इंग्रजी
LABsterzz चे English Grammar Test हे टू इन वन इंग्लिश लर्निग अॅप आहे.
Written by मनाली रानडे
First published on: 23-02-2016 at 04:13 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn english with apps