दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात शरीर आणि मनाच्या विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळतोच असे नाही. तरीही आपण आपापल्या पद्धतीने स्वत:साठी करमणुकीची किंवा विरंगुळ्याची साधने शोधत असतोच. टीव्ही बघणे, वाचन, विणकाम, भरतकाम, कोडी सोडवणे असे बरेच काही. मोबाइलवरील मनोरंजनपर असंख्य अॅप्सदेखील हे काम चोख बजावत आहेत. आज आपण अशाच काही अॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत.
मुलांसाठी विविध प्रकारची चित्रे रंगवण्याची पुस्तके बाजारात उपलब्ध असतात. एकाग्र आणि तल्लीन होऊन मुले ही चित्रे रंगवत असतात. मनासारखे चित्र रंगवून झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही निराळाच असतो. ही पुस्तके मोठय़ांनादेखील आकर्षित करतात. चित्रकला हे एक सर्जनशील माध्यम आहे. आपल्या मनातल्या रंगसंगती चित्रांमध्ये भरून पाहणे हे मनोरंजकच नव्हे तर मित्रमंडळी आणि नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी उपयोगी पडू शकते.
हा विरंगुळा आता लहान-थोर सर्वासाठी स्मार्टफोनवर उपलब्ध झालाय अॅप्सच्या रूपात. मंडला कलरिंग पेजेस (Mandala Colouring Pages) या अॅपमध्ये १०० चित्रे रंगवण्यासाठी दिलेली आहेत. अगदी सोप्या आणि सुटसुटीत चित्रांपासून अवघड आणि किचकट डिझाईन्स या अॅपमध्ये उपलब्ध आहेत. रंगवण्यासाठी येथे रंगाच्या असंख्य छटा, ब्रश आणि फिलर्स येथे उपलब्ध आहेत. चित्रातील एखादा छोटा भाग रंगवायचा असल्यास ते चित्र तुम्ही झूम करू शकता. तुम्ही दिलेला रंग तुम्हाला योग्य वाटत नसल्यास ४ल्ल िया पर्यायाची सोय दिलेली आहे. ते चित्र सेव्ह करून ठेवू शकता तसेच सोशल मीडिया साइट्स किंवा ई-मेलद्वारे शेअरही करता येते.
‘मंडाला-अॅडल्ट कलरिंग बुक’/ ‘कलरिंग – अॅडल्ट कलरिंग’ या अॅप्समध्ये फुले, प्राणी, फुलपाखरे, कार्टून्स अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या चित्रांचा समावेश आहे. यातील काही चित्रे संपूर्णपणे विनामूल्य आहेत, तर काहींसाठी थोडेफार शुल्क भरावे लागते. अशा प्रकारचे अनेक अॅप्स प्ले स्टोअरवर मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. मुलांमध्ये रंगछटांचे ज्ञान विकसित होण्यासाठी, त्यांची एकाग्रता आणि कल्पनाशक्ती वाढण्यासाठी, डोळे आणि हात यांचा समन्वय साधून काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी हे अॅप्स निश्चित उपयोगी होतील. चिंता, तणाव यांतून बाहेर पडून रिलॅक्स व्हायचे आहे, तर चला तर, अॅप डाऊनलोड करा आणि मनसोक्त चित्रे रंगवा.
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com