आपण ज्या सृष्टीमध्ये राहतो तिच्याबद्दल जाणून घेण्याचे आपल्याला नेहमीच कुतूहल असते. या सृष्टीचे महत्त्वाचे घटक म्हणजे वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन. यापैकी विविध वनस्पतींबद्दल आपण या आधी जाणून घेतले होते. आज आपण प्राणी जीवनाबद्दल जाणून घेऊ. आपण अभयारण्ये किंवा प्राणिसंग्रहालयांना भेटी देत असतो. प्राणिसंग्रहालयात प्रत्येक प्राण्याची माहिती सविस्तर वाचायला मिळते. या प्राण्यांचे जंगलातील खरे जीवन कशा प्रकारचे असते ह्य़ाचे चित्रण अभ्यासक तसेच काही तज्ज्ञ मंडळींच्या सहकार्याने आपण दूरदर्शनवरही बघत असतो. त्यातूनच प्राण्यांबद्दलच्या आपल्या माहितीत भर पडत जाते. विश्वकोशातही ही माहिती वाचायला मिळते.
लूप्ड लॅब्स प्रा. लि.चे ‘अॅनिमल एन्सायक्लोपीडिया’ (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.encyclopedia.animals&hl=en) या अॅपमधे सध्या ४००हून अधिक प्राण्यांच्या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. यामधे सस्तन प्राणी (मॅमल), सरपटणारे प्राणी (रेप्टाइल), पक्षी (बर्डस), उभयचर प्राणी (अँफिबियन्स), पाठीचा कणा नसणारे प्राणी (इनव्हर्टिब्रेट) अशा प्रकारे प्राण्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
तुम्हाला माहीत आहे का, गरुडाच्या अंगावर अंदाजे ७००० पिसे असतात किंवा कांगारूच्या शेपटीचा जमिनीला स्पर्श झाल्याशिवाय त्याला उडी मारता येत नाही किंवा मधमाशा त्यांच्या वजनाच्या ३०० पट जास्त वजन उचलू शकतात. अशा प्रकारची प्राण्यांविषयीची भन्नाट माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ‘मुव्हिनअॅप’चे ‘अमेझिंग अॅनिमल फॅक्ट्स’ (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.movinapp.facts.animal&hl=en) या अॅपमधे प्राण्यांविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. या अॅपमधे तुम्ही सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या प्राण्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे त्या प्राण्याचे नाव टाकून सर्च करू शकता.
स्क्रीनवर वरच्या बाजूला असलेल्या एका प्राण्याच्या पंज्याच्या आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती रॅण्डमली वाचता येते. टेक्स्ट रूपातील ही माहिती ऑडियो स्वरूपात ऐकण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे.
उर्सा गेम्सच्या अॅनिमल साऊंड्स-अॅप फॉर किड (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.juniorpear.animal_sound&hl=en) या अॅप्सच्या माध्यमातून अंदाजे ७० प्राण्यांचे आवाज ऐकायला मिळू शकतात. त्याचबरोबर प्राण्यांचे आवाज ओळखण्याचे एक पझलदेखील येथे आहे.
प्रीमियम सॉफ्टवेअरच्या ‘अॅनिमल साऊंड्स’ (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.premiumsoftware.
animalsoundsandphotos&hl=en) या अॅपमध्ये अंदाजे १४० प्राण्यांचे आवाज ऐकायला मिळतील. येथे प्राणी आणि पक्षी असे दोन गट केले आहेत. तसेच येथे शेतात दिसणारे प्राणी, जंगली आणि पाळीव प्राणी, सस्तन, सरपटणारे प्राणी, कीटक असे वर्गीकरणदेखील उपलब्ध आहे. मेमरी गेम, स्क्रॅच पझल आणि स्लाइड पझल अशी कोडीही येथे सोडवता येतील.
या अॅप्समुळे आपल्याला बऱ्याच प्राण्यांची नव्याने ओळख होईल यात शंका नाही!
मनाली रानडे manaliranade84@gmail.com