अंगात त्राण नसेल, पोटात अन्नाचा कण नसेल तर काहीही काम करवत नाही. सारं कसं शक्तिहीन बनून जातं. कामासाठी ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा अन्नातून मिळत असते. प्रचंड भूक लागलेली असताना, पोटात कावळे कावकाव करत असताना काहीही सुचत नाही. जेवणाचं ताट समोर आलं की पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासागणिक सारं कसं ऊर्जामय झाल्यासारखं होतं. भुकेविषयी हे एवढं लिहिण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. जी गोष्ट भुकेची तीच कहाणी मोबाइलच्या बॅटरीची. आणि जितकं महत्त्व अन्नाचं तितकंच महत्त्व फोनच्या चार्जरचं.

स्मार्टफोन्सच्या या डिजिटल युगात २४ बाय ७ कनेक्टेड राहणं जणू काही अपरिहार्यच झालेलं आहे. मोबाइल बंद म्हणजे अश्मयुगाचा फेरफटका. स्मार्टफोन कुठलाही असो. दिवसाच्या शेवटी फोनची बॅटरी उतरणं कुणालाच टाळता येत नाही. फोन जितका स्मार्ट, तितक्या उशीरा चार्ज होणार. त्यामुळेच फोनमधली बॅटरी कायम चार्ज ठेवणं महत्त्वाचं आहे. चार्जर आणि सॉकेट हे दोन्ही जवळ असतील तर काही अडचण नाही. अन्यथा पॉवर बँकचा पर्यायही उपलब्ध आहेच. पण मुळाच फोन चार्ज होतो म्हणजे नेमकं काय होतं? चार्जरचं कामकाज कसं चालतं? एका फोनचा चार्जर दुसऱ्या फोनसाठी वापरला तर काय होतं? फोन चार्ज व्हायला किती वेळ लागतो? असे अनेक प्रश्न अनेकदा उद्भवतात. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच हा प्रपंच.

मोबाइल चार्जर्स म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून एसी टू डीसी कन्व्हर्टर असतो. घरात किंवा ऑफिसमध्ये वाहणारा २२० व्होल्टचा एसी सप्लाय घेऊन अंदाजे ५ व्होल्टचा डीसी सप्लाय सातत्याने करत राहणं हे चार्जरचं काम. अर्थात हे काम थोडक्यात सांगितलेलं आहे. पण साधारण सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे चार्जर्स अशाच पद्धतीने कामकाज करतात. ढोबळमानाने चार्जरमध्ये ट्रान्स्फॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर आणि रेग्युलेटर असे चार भाग असतात.

ट्रान्स्फॉर्मरमध्ये दोन मोठय़ा कॉपर कॉइल्स असतात. इनपुट पॉवर सप्लाय म्हणजेच चार्जर जिथे सॉकेटमध्ये लावला जातो त्या दोन टर्मिनल्समध्ये एक आणि आउटपुट म्हणजेच जी पिन मोबाइलमध्ये जाते तिथल्या दोन टर्मिनल्समध्ये एक अशा दोन कॉपर कॉइल्स असतात. स्टेप-डाऊन पद्धतीने ट्रान्स्फॉर्मर काम करतो आणि हाय व्होल्टेजचं परिवर्तन लो व्होल्टेजमध्ये करतो. कॉइलला कॉपर तारेच्या असणाऱ्या वेढय़ांवर व्होल्टेज अवलंबून असतो.

ट्रान्स्फॉर्मर पाठोपाठ येतो तो म्हणजे रेक्टिफायर. एसी व्होल्टेज आऊटपूटला डीसीमध्ये परिवर्तित करण्याचं काम रेक्टिफायर करतो. जरा तांत्रिक असं काम असतं हे. म्हणजे अध्र्या पीरियडची पोलॅरिटी रिव्हर्स करत अल्टरनेट करंटला डायरेक्ट करंटमध्ये बदललं जातं. रेक्टिफायरला जोडून असणारा भाग म्हणजे फिल्टर. कसं असतं की, एसीचा डीसी झाला तरी त्यामध्ये सातत्य नसतं. ते सातत्य राखण्यासाठी फिल्टरचा वापर होतो. फिल्टरमधून निघालेल्या डीसी व्होल्टेजला अधिक सुरळीत आणि नियमित राखण्यासाठी रेग्युलेटरचा वापर होतो. रेग्युलेटर नसेल तर व्होल्टेज अनियमत राहतो किंवा फ्लुएंट होतो. असा व्होल्टेज कुठल्याही डिव्हाइससाठी हानिकारक असतो.

चार्जरविषयीची ही फारच मूलभूत माहिती आहे. घराघरातून वाहणारा एसी व्होल्टेज डीसीमध्ये बदलून आपल्या हातातला स्मार्टफोन कसा काय चार्ज होतो हे सांगायचा हा प्रयत्न. आता यात अडचण अनेकदा अशी होते की, आपल्या मोबाइलचा चार्जर आपल्याकडे नसणं आणि मग ज्याचा कुणाचा चार्जर आपल्या मोबाइलला लागतो तो कनेक्ट करणं. पूर्वी बारीक पिन किंवा जाड पिनच्या चार्जरची मारामार होती. आऊटपूट व्होल्टेजनुसार या चार्जरच्या पिन्स बनल्या जायच्या. सध्या मिनी यूएसबी केबल्सचा वापर चार्जिगसाठी होतो. आणि या केबल्स बुहतांश इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसना कनेक्ट होतात. पण केवळ कनेक्ट होतात म्हणून त्यानेच मोबाइल चार्ज करणं योग्य नाही. प्रत्येक स्मार्टफोन, टॅब्लेटची व्होल्टेजची गरज वेगवेगळी असते. आणि त्या त्या स्मार्टफोनसोबत असणारा चार्जरच ती गरज पूर्ण करत असतो. गरजेपेक्षा जास्त व्होल्टेज इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये जात असेल तर ते त्या डिव्हाइससाठी हानिकारक असतं.

साधारणत: यूएसबी केबल्स या १ ते १.५ अ‍ॅम्पिअर करंटसाठी बनवल्या जातात. नवीन आयपॅड आणि इतर काही उपकरणांचे चार्जर्स हे साधारण २.१ अ‍ॅम्पिअर इतका करंट डिलिव्हर करतं. आणि म्हणूनच जर का अशा एखाद्या केबलने तुम्ही तुमचा मोबाइल चार्ज करत असाल तर चार्जिग व्हायला वेळ लागतोच. त्याशिवाय बराचवेळ चार्जिग सुरू असल्याने कॉइल गरम होऊन चार्जरही गरम होतो. असा प्रकार सतत सुरू राहिला तर चार्जर खराब होण्याची शक्यता असते. त्याशिवाय मोबाइलही खराब होऊ शकतो. त्यामुळेच शक्यतो स्वत:च्या मोबाइलसाठी असणाऱ्या चार्जरनेच चार्जिग करावं. कसंय, आपल्याला भूक लागली म्हणून आपण जर का सतत बाहेरचं खायला लागलो तर आपलं पोट खराब होतं. तसाच हा प्रकार आहे. शेवटी शरीराचं आरोग्य आणि मोबाइलची प्रकृती ठणठणीत असणं महत्त्वाचं नाही का?

पुष्कर सामंत -pushkar.samant@gmail.com

Story img Loader