निश्चलनीकरणाच्या काळात कॅशलेस व्यवहारांच्या चर्चेला उधाण आलं होतं. इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स किती उपयुक्त आहेत ह्यावर जो तो मतांच्या गप्पा मारत होता. बाकी निश्चलनीकरणाचे फायदे-तोटे आणि यश-अपयशाबद्दल नेमकी माहिती कुठेच उपलब्ध नाही. पण त्यानिमित्ताने ह्या ई-वॉलेट्सना बरे दिवस आले. ‘पेटीएम’ तर आधीपासूनच पाय पसरायला लागलं होतं. विविध ऑफर्स देऊन मोबाइल वापरकर्त्यांना पेटीएमचा वापर करायला भाग पाडण्यासाठी कंपनीने कंबर कसली होती. त्याचं फळही त्यांना मिळालं. ब्रॅण्डेड दुकानांबरोबरच अगदी वाणसामानाच्या दुकानांमध्येही पेटीएमचे स्टीकर्स झळकायला लागले. पेटीएम हे लोकप्रिय होत असतानाच दुसरीकडे भीम नावाचं अॅपही पेटीएमला टक्कर द्यायला बाजारात उतरलं. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केलेलं ‘भीम’ हे अॅप मार्केटिंगमध्ये जरी कमी पडलं असेल तरी त्याचा वापर मात्र काही कमी नाही. मोबाइलमार्फत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी अनेक ठिकाणी हे अॅप वापरलं जातं. खरं तर निश्चलनीकरणानंतरच डिसेंबर २०१६ मध्ये हे अॅप लाँच करण्यात आलं होतं.
मुळात पेटीएम, एमपेसा, मोबिक्विक आणि भीममध्ये काही मूलभूत फरक आहेत. पेटीएम हे खरं तर इलेक्ट्रॉनिक वॉलेट आहे. म्हणजे बँकेचं अकाउंट हे पेटीएमशी जोडावं लागतं. आणि पैसे बँकेतून प्रथम पेटीएममध्ये ट्रान्सफर करावे लागतात. त्यानंतर ते पेटीएमच्या इंटरफेसचा वापर करतच पुढले व्यवहार करतं. जर का पेटीएम वॉलेटमध्ये पैसे नसतील तर व्यवहार होऊ शकत नाही. भीम हे मात्र वॉलेट नाही. भीम हे यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट इंटरफेस आहे म्हणजेच हे वॉलेट नसून ती इंटरफेस आहे. भीमचं नावही तसंच तयार करण्यात आलंय. भीम म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी. भीमचा हे खरं तर ट्रान्सफर मेकॅनिझम आहे. म्हणजे एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी ही इंटरफेस वापरली जाते. हे व्यवहार तातडीने केले जातात. त्यासाठी वाट पाहावी लागत नाही. अगदी वीकेण्डला किंवा सुटीच्या दिवशीही हे व्यवहार विनासायास पार पडले जातात. त्याशिवाय बँकेच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत याची माहितीसुद्धा उपलब्ध होऊ शकते. एकापेक्षा अधिक बँक खाती या अॅपशी जोडता येतात. इतकंच नाही तर क्यूआर कोड बनवण्याची सोयही या अॅपमध्ये देण्यात आली आहे. आधार नंबर खात्याशी जोडला असेल तर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचीही गरज पडत नाही. अगदी एक रुपयापासून ते एक लाखापर्यंतची रक्कम पाठवणं शक्य होतं. सध्याच्या घडीला एक कोटीपेक्षा जास्त वापरकर्ते भीमचा लाभ घेतात, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले होते.
हा सगळा प्रपंच इथे करण्याचं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलेटच्या भारतीय बाजारपेठेत आता गुगलनेही उडी घेतलीये. गुगलतर्फे तेज हे अॅप लाँच करण्यात आलंय. आशियाई बाजारपेठेसाठी सुरू करण्यात आलेली ही मोबाइल व्यवहाराची यंत्रणा आहे. अॅण्ड्रॉइड पेपेक्षा पूर्णपणे वेगळी अशी ही यंत्रणा असल्याचं गुगलतर्फे सांगण्यात आलंय. अॅण्ड्रॉइड पे हे बरंचसं पेटीएम वगैरे वर्गाकडे वळणारं अॅप आहे. तर गुगल तेज हे भीमच्या जवळ जाणारं अॅप आहे. कारण तेज हे वॉलेट नसून ती सुद्धा एक इंटरफेस आहे. आत्ताच्या घडीला देशातल्या ५५ बँका गुगल तेजशी जोडल्या गेल्या आहेत. त्याशिवाय सध्या तरी आधार व्हेरिफिकेशनची सुविधा या अॅपमध्ये नाहीये. शिवाय या अॅपची साइजही इतर ई-वॉलेटच्या तुलनेत कमी आहे. मुळातच वॉलेट नसल्यामुळे साइज फार जास्त असू शकत नाही. केवळ ७ एमबी साइजमध्ये पूर्ण अॅप सामावलेलं आहे. भीम हे अॅप तर केवळ ३ एमबी इतकी साइज व्यापतं.
ई-वॉलेट ही काळाची गरज आहे आणि मोबाइल बँकिंग ही तर निकडीची गरज आहे. त्यामुळेच हे क्षेत्र अनेक टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या रडारवर आहे. पण यामधला प्रमुख धोका आहे तो व्हायरस आणि हॅकिंगचा. कारण ही अॅप्स आणि इंटरफेस ज्या सव्र्हरवर आहेत ते सव्र्हर जर का हॅक झाले तर त्यातून उद्भवणारा धोका फार मोठा आहे. मोठय़ा आर्थिक उलाढाली जरी या अॅप आणि इंटरफेसवरून होत नसल्या तरी अनेक लघू आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आणि उद्योजक या अॅप्सचा वापर व्यवहारासाठी करतात. आणि म्हणूनच गुगलसारख्या मोठय़ा कंपनीचं या क्षेत्रात उतरणं हे स्वागतार्ह आहे. एक भक्कम यंत्रणा पाठीशी असल्यामुळे गुगलच्या तेजकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com