गेली काही वर्षे महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. मान्सूनचा पाऊस वेळेवर येणार का याची शेतकऱ्यांनाच नव्हे तर सर्वच जनतेला काळजी वाटत आहे. मानवाने निसर्गावर केलेल्या आक्रमणामुळे पर्यावरणाचा तोल तर बिघडला नाही ना, ही शंका विचारी मनाला सतत पोखरत असते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय करावे याची चर्चाही विविध माध्यमांतून होताना दिसते. निसर्गसंपत्तीचा ऱ्हास रोखण्याची पहिली पायरी म्हणजे या संपत्तीची प्रथम ओळख करून घेणे. या उद्देशाने बऱ्याच संस्था कार्य करीत आहेत. कोणी निसर्ग सहली काढतो, कोणी आकडेवारी गोळा करतो इत्यादी.
लोकांमध्ये ही माहिती प्रसारित करण्याचा एक आधुनिक प्रयत्न म्हणजे स्मार्ट फोनवरील अ‍ॅपच्या माध्यमातून निसर्ग शिक्षण! आज आपण आयनेचर वॉच आयट्रीज (iNaturewatch iTrees) हे अ‍ॅप पाहणार आहोत. या अ‍ॅपमध्ये भारतात मुख्यत्वे (मुंबई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद) येथे आढळणाऱ्या पन्नास प्रकारच्या झाडांची अप्रतिम चित्रांसहित माहिती दिलेली आहे. ही माहिती देताना झाडाचे प्रचलित नाव आणि शास्त्रीय नाव याप्रमाणे त्यांची वर्णानुक्रमानुसार यादी दिलेली आहे.
माहिती देताना प्रत्येक झाडाचा प्रकार (फॅमिली), त्याचे आढळण्याचे ठिकाण, त्याची अंदाजे उंची, फुले आणि फळे येण्याचा वर्षांतील काळ, त्याच्या खोडाची, पानांसंबंधीची तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे. याचबरोबर या झाडांशी जोडले गेलेले प्राणी व पक्षी कोणते याचीही माहिती येथे मिळते. तसेच झाडाचे उपयोगही (औषधी, खाण्यासाठी इत्यादी) देण्यात आलेले आहेत.
हे अ‍ॅप कसे वापरावे याचे टय़ुटोरियलही येथे देण्यात आलेले आहे. स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सना नवखे असलेल्यांना हे टय़ुटोरियल मार्गदर्शक ठरेल. हे अ‍ॅप केवळ चित्रे आणि माहिती सांगणारे नसून ते झाडाची वर्गवारी पानांच्या आणि खोडांच्या प्रकारानुसारही करून देते. तुम्ही पाहिलेली माहिती तुम्हाला किती आत्मसात झाली हे पाहण्यासाठी पाने, फुले, फळे आणि खोड यांच्यावरील बहुपर्यायी प्रश्नावली ‘फन विथ ट्रीज’ या विभागात सोडवता येईल.
या अ‍ॅपमध्ये झाडांसंबंधी वापरल्या गेलेल्या सर्व शब्दांची यादी Glossary मध्ये स्पष्टीकरणासहित दिलेली आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी वेबवरील लिंक्स आणि पुस्तकांची नावे पुढील अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
निसर्गाबद्दल माहिती देणारी अ‍ॅप्स बनवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रस्ताव मागवण्यात आले होते. डॉ. व्ही. शुभलक्ष्मी यांच्या टीमने दिलेल्या या अ‍ॅपच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. भारतातून मान्यता मिळालेला हा एकमेव प्रस्ताव होता. निसर्गाशी जवळीक साधणारे हे अ‍ॅप तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री वाटते.
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा