फोरजी फोनच्या स्पध्रेत उडी घेत असताना आयबॉलने नुकत्या संपलेल्या वर्षांच्या अखेरीस अँडी स्प्रिंटर फोरजी हा फोन बाजारात आणला. स्वस्त आणि मस्त या सूत्राने काम करणाऱ्या या कंपनीचा हा फोनही तसा सुमारच आहे. कमी किमतीत मोठी स्क्रीन आणि फोरजी सुविधा देणारा हा फोन वापरताना आयबॉलच्या अँडी मालिकेतील आधीच्या फोनपेक्षा फारसे काही वेगळे वाटले नाही. अँडी मालिकेतील इतर फोनच्या तुलनेत या फोनची जाडी थोडी जास्त असल्यामुळे तो वापरण्यास अधिक मोठा वाटतो.
फोनमध्ये काय आहे?
या फोनमध्ये १ गीगाहर्टझ क्वाडकोअर प्रोसेससर असून एक जीबी रॅम आहे. फोनमध्ये असलेल्या सुविधांचा विचार करता फोनमध्ये किमान दोन जीबी रॅम असणे आवश्यक आहे. फोनमध्ये आठ जीबीची अंतर्गत साठवणूक आहे. मात्र यापैकी ऑपरेटिंग सिस्टिम आणि अंतर्गत अ‍ॅपसाठी तब्बल साडेतीन जीबी खर्च झाली आहे. उर्वरित सुमारे साडेचार जीबी साठवणूक आपल्याला वापरास मिळते. तसेच या फोनमध्ये आपल्याला एसडी कार्ड वापरून ३२ जीबीपर्यंत साठवणूक वाढवता येते. फोनचा डिस्प्ले पाच इंचांचा असून तो ४८० बाय ८४५ पिक्सेल इतका आहे. पर पिक्सेल पर इंचेस म्हणजेच पीपीआय १९५ इतका आहे. यामुळे स्क्रीनचा अनुभव तसा चांगला आहे. या फोनमधील इतर फिचर्सच्या तुलनेत फोनमध्ये बॅटरी क्षमता पुरेशी देण्यात आली आहे. फोनमध्ये २१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याचा वापर आपण फोनमधील सर्व सुविधा वापरून अगदी चार तासांपर्यंत करू शकतो. फोनमध्ये अँड्रॉइडची ५.१ ही आधुनिक ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपसारखे उपयुक्त अ‍ॅप्सअंतर्गत देण्यात आले आहेत. यामुळे ते प्ले स्टोअरवरून अपलोड करण्याची गरज भासत नाही.
फोनमध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटय़ूथ, इन्फ्रारेडची जोडणी देण्यात आली आहे. शिवाय फोनमध्ये एफएमही देण्यात आले आहे. डय़ुएल सिमच्या या फोनमध्ये दोन्ही सिमकार्ड हे सामान्य आहेत. फोनमध्ये थ्रीजी जोडणी असून फोरजी जोडणी ही एलटीई सुविधेस पुरक आहे. सध्या आपल्या देशात फोरजी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची सुविधा या फोनमध्ये काम करू शकणार आहे. फोनमध्ये मुख्य कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा देण्यात आला असून फ्रंट कॅमेरा हा ३.२ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. मात्र या आठ मेगापिक्सेलच्या कॅमेरासोबत देण्यात आलेल्या शटर आणि आयएसओसारख्या सुविधा काहीशा कमी पडत असल्यामुळे या कॅमेरातून टिपलेले छायाचित्र इतर आठ मेगापिक्सेलच्या कॅमेरातून टिपलेल्या छायाचित्रांसमोर कमी पडतात.

थोडक्यात
इतर महागडय़ा फोनच्या तुलनेत किंवा चिनी ब्रँड्सच्या समोर हा फोन सुमार वाटत असला तरी स्वस्तात मोठी स्क्रीन आणि महागडय़ा फोनमधील सुविधांनी युक्त फोन घ्यायचा असेल तर हा पर्याय विचार करता येऊ शकतो. किंमत ७०९० रुपये. पण ई-व्यापार संकेतस्थळांवर सहा हजारपासून उपलब्ध आहे.

नीरज पंडित
Niraj.pandit@expressindia.com

Story img Loader