अनेक वेबसाइट्स, ब्लॉग्सवर उजव्या कोपऱ्यात एक आयकॉन अनेकदा दिसतं. फरर फीड असं लिहिलेलं. सामान्यत: भगव्या किंवा केशरी रंगावर पांढऱ्या अक्षरात हे लिहिलेलं असतं. आरएसएस आणि भगवा रंग जर असला तरी त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दुरान्वये संबंध नाही. शब्दाचं संक्षिप्त रूप जरी एकसारखं असलं तरी आरएसएस फीड केवळ कम्प्युटर टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत. आपण सगळेच इंटरनेट वापरतो. नियमितपणे किंवा अनियमितपणे वेगवेगळे ब्लॉग्स, वेबसाइट्स वाचत असतो. अशा वेळी त्या त्या साइटवर नवीन माहिती अपडेट झाली की नाही हे बघण्यासाठी काही पर्याय आहेत.
पहिला पर्याय म्हणजे एखादी लिंक बुकमार्क करायची. कंट्रोल आणि डी दाबलं की ती लिंक, वेबसाइट किंवा ब्लॉग कायमस्वरूपी आपल्या ब्राउजरमध्ये सेव्ह होतो. अगदी हिस्टरी क्लीअर केली तरी बुकमार्क्‍स डिलीट होत नाहीत. जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा त्या बुकमार्कवर क्लिक करणं हा झाला एक पर्याय. पण याचे काही तोटे आहेत. एका कम्प्युटरवरच्या ब्राउजरवर सेव्ह केलेले बुकमार्क्‍स दुसऱ्या कम्प्युटरवर पाहता येत नाहीत. (गुगल क्रोम असेल आणि गुगल साइन इन केलं असेल तर आणि डेटा सिंक केला असेल तर बुकमार्क्‍स दुसऱ्या कम्प्युटरवरही बघता येतात.) बरेचसे ब्लॉग्स अनियमितपणे अपडेट्स होतात. त्यामुळे तो ब्लॉग पुन्हा उघडल्यावर जुनीच पोस्ट दिसण्याचा प्रकार बरेचदा घडतो.
दुसरा पर्याय म्हणजे इमेल सबस्क्रिप्शन. हा एका उत्तम पर्याय असला तरी सगळ्याच वेबसाइट्स किंवा ब्लॉग्सवर हा पर्याय उपलब्ध असतोच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राइब केल्यानंतर उपयुक्त इमेलऐवजी स्पॅम्स येण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे हा पर्याय चांगला असला तरी फारसा किफायतशीर नाही.
तिसरा पर्याय आणि आपण ज्याचा वर उल्लेख केला तो म्हणजे आरएसएस फीडमार्फत अपडेट्स मिळवणं.
आरएसएस म्हणजे रिअली सिंपल सिंडिकेशन. हा वेबसाइटकडून अपडेट्स मिळवण्याचा एक फॉरमॅट आहे. तुम्ही साइटच्या आरएसएस फीड्सना सबस्क्राइब केलं की तुम्हाला प्रत्येक वेळी त्या वेबसाइटवर जाऊन अपडेट्स बघण्याची गरज नाही. साइट जेव्हा केव्हा अपडेट होईल किंवा नवीन माहिती, पोस्ट जेव्हा साइटवर अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन आरएसएस फीड रीडरमध्ये मिळतात. आरएसएस रीडरमधून तुम्ही सबस्क्राइब केलेल्या सर्व वेबसाइट्सचे अपडेट्स एकाच युजर इंटरफेसमध्ये दिसतात. त्यामुळे एखाद्या वेबसाइटचा, ब्लॉगचा लेआउट, फॉण्ट आवडत नसेल तरीही विशेष फरक पडत नाही.
एखाद्या वेबसाइट्सवरची नवीन माहिती इतर ठिकाणी मुख्यत्वे वेबसाइट्सना किंवा थेट आपल्या कम्प्युटरवर एकाच वेळी कळवणं ही आरएसएसची प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ समजा एक एबीसी नावाची वेबसाइट आहे. ही वेबसाइट टेक्नॉलॉजी विषयावर वेळोवेळी लेख प्रसिद्ध करते. एखाद्या वेबसाइटवर जेव्हा एखादा लेख प्रकाशित होतो तेव्हा त्याची लिंक ही सामान्यत: त्या लेखाचा मथळा असावा अशा पद्धतीने त्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते. वाचकांना त्या वेबसाइटवरच्या माहितीमध्ये विशेष रुची असते हे एक झालं. पण त्याचबरोबर वेबसाइटलाही स्वत:चे हिट्स वाढवायचे असतात. अर्थात आपली वेबसाइट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची असते. एबीसी डॉट कॉमने नव्या लेखाच्या लिंकचा फीड दिला की त्याची आरएसएस फाइल वेबसाइट तयार करते. ही फाइल किंवा हा फीड एकाच वेळी सबस्क्राइब केलेल्या युजर्सना पाठवला जातो. आपल्याला सबस्क्राइब टू आरएसएस फीड वगैरेचे आयकॉन्स अनेक वेबसाइट्सवर दिसतात. त्यामागे हीच सिंडिकेशनची कल्पना आहे.
आरएसएसची संकल्पना एक्सएमएल म्हणजेच एक्स्टेन्सिबल मार्क अप लँग्वेज या प्रोग्रामिंग लँग्वेजवर आधारलेली आहे. आरएसएसबाबत अनेक (Extensible Mark-up Language) ह्या संगणकी भाषेवर आधारलेली आहे. आरएसएस हे उपयुक्त असलं तरी त्याबाबत अनेक मतमतांतरं आहेत. काहीजण त्याला रिच साइट इंडिकेशन म्हणतात तर काही जण रिच साइट समरीही म्हणतात. काहीही असलं तरी त्यामागे असणारं तंत्रज्ञान हे सर्वमान्य आहे.
दुसरीकडे गुगल रीडर ही गुगलची आरएसएस फीड रीडरची सुविधा आहे. गुगलच्या अकाउंटने तुम्ही यावर लॉगइन करू शकता. लॉगइन केल्यावर डाव्या बाजूला असलेल्या अ‍ॅड सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या वेबसाइटची यूआरएल किंवा लिंक टाकली की काम झालं. त्या वेबसाइटवरचे सगळे अपडेट्स तुम्हाला गुगल रीडरवर कळवले जातात. याशिवाय गुगल रीडरवर नवीन फीड्स शोधण्याचीही. सोय आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाचे नवीन ब्लॉग्स आणि त्यासंबंधीच्या वेबसाइट्स शोधू शकता.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

Story img Loader