वय वाढतं तसं गरजा वाढत जातात असं म्हणतात. म्हणजे अमुक एका वयात दोन जीन्सची आवश्यकता असेल तर अमुक +५ वर्षांचे झाल्यानंतर दोनाच्या आठ होतात. अर्थात हे गणित घरापरत्वे बदलत जातं. पण हा आकडा वाढल्यानंतर उर्वरित सहा जीन्स ठेवायच्या कुठे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. मग घरात इतस्तत: पसरलेल्या जीन्सवरून आरडाओरडा सुरू होतो. कपाटात का नाही ठेवत अशी पृच्छा चिडचिडीच्या सुरात केली जाते. पण मुळात कपाटातच जागा नसते. त्यामुळे मग आता वय वाढलं, गरजा वाढल्या म्हणून मग कपाटही वाढवलं जातं. या नव्या कपाटासाठी अमुक+१५ वर्षांचा विचार केला जातो. त्यानुसार त्याचा दर्जा, त्याची क्षमता वगैरे वगैरे गोष्टी निश्चित केल्या जातात. आणि मग ते कपाट तयार होतं.
जी गोष्ट कपाटाची तीच गोष्ट कॅमेरा, टॅब्लेट्स, स्मार्टफोन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या एसडी कार्डसची. ही कार्डस सध्याच्या घडीला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं अत्यंत महत्त्वाचं असं अंग आहेत. सगळा डेटा या कार्डसमध्येच कोंबला जातो. त्यामुळे या ई-कपाटांची क्षमता बघूनच त्यांची खरेदी केली जाते. पण ही कार्डस खरेदी करताना फक्त क्षमता विकत घेणं उपयुक्त नाही. एसडी, मायक्रो-एसडी, मिनी-एसडी अशी कार्डस खरेदी करताना आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या जाणं गरजेचं आहे. त्यामुळेच या कार्डसची निवड कशी करायची ते कळणं आवश्यक आहे.
क्षमता
सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याचा प्राधान्याने विचार केला जातो तो म्हणजे ‘किती जीबीचं कार्ड आहे?’ या प्रश्नाचा. पेनड्राइव्ह, हार्डडिस्क, एक्स्टर्नल हार्डडिस्कप्रमाणेच एसडी कार्डसही स्टोरेज कॅपिसिटीनुसार मिळतात. मात्र यात वेगवेगळे प्रकार आहेत. एसडीएससी – सिक्युअर डिजीटल स्टँडर्ड कॅपॅसिटी, एसडीएचसी – सिक्युअर डिजीटल हाय कॅपॅसिटी, एसडीएक्ससी – सिक्युअर डिजीटल एक्सटेंडेड कॅपॅसिटी) असे या कार्डसचे मुख्य प्रकार आहेत.
एसडीएससी – हे कार्ड अगदी प्राथमिक स्टोअरेज कार्ड आहे. अगदी एक एमबीपासून ते २ जीबीपर्यंत इतकी या कार्डची क्षमता असते. स्मार्टफोन्स अस्तित्वात यायच्या आधीच्या फोन्समध्ये प्रामुख्याने ही कार्डस वापरली जायची. साध्या डिजीटल तसंच डिएसएलआर कॅमेरांमध्येही हीच कार्डस वापरली जायची.
एसडीएचसी- सध्या वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्ससाठी ही हाय कॅपॅसिटी कार्डस उत्तम आहेत. ४ जीबी ते ३२ जीबीपर्यंतची क्षमता या एसडी कार्डसची आहे. तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोन, टॅब्लेट्ससाठी प्रामुख्याने हीच एसडीकार्डस योग्य आहेत. तुमच्या आवश्यकतेनुसार त्या त्या कॅपॅसिटीची कार्डस निवडा.
एसडीएक्ससी – ३२ जीबी ते अगदी २ टीबीपर्यंतची क्षमता असणारी ही एसडी कार्डस सामान्यत: डीएसएलआर कॅमेरा किंवा शूटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅमेरासाठी ही कार्डस उपयुक्त आहेत.
स्पीड
एसडीकार्डस ही स्टोअरेज डिव्हाइसेस आहेत. या कार्डसवर डेटा स्टोअर होतो. हा डेटा रीड होणं (उदा. गाणी प्ले होणं, फोटो बघणं इत्यादी) आणि या कार्डसवर डेटा कॉपी होणं यांचा एक वेग असतो. एकाच क्षमतेची कार्डस असली तरी प्रत्येक कार्डसाठी हा वेग वेगवेगळा असतो. रीड होणं आणि कॉपी होणं यांचा वेग जितका जास्त तितकं ते कार्ड उपयुक्त. प्रोफेशनल फोटोग्राफर्ससाठी हायस्पीडची एसडीकार्डस आवश्यक असतात तर स्मार्टफोन्स, टॅब्लेटसाठी बऱ्यापैकी स्पीड असलेली कार्डसही चालतात.
हा वेग कसा ओळखायचा?
एसडी कार्डसची निर्मिती करणाऱ्या कंपन्या एसडी कार्डसचा वेग मोजण्यासाठी ‘स्पीड क्लास’ ही संज्ञा वापरतात. एसडी असोसिएशनच्या नियमांनुसारच ही कार्डस तयार केली जातात. तुम्ही जर का तुमच्या मोबाइलमधलं किंवा कॅमेरामधलं एसडीकार्ड काढून पाहिलं तर त्यावर तुम्हाला स्पीड क्लास दिसू शकेल.
प्रामुख्याने चार स्पीड क्लासची एसडी कार्डस उपलब्ध आहेत. १०. ६, ४ आणि २. १० म्हणजे सर्वात वेगवान तर २ म्हणजे सर्वात मंद. क्लास २ म्हणजे २ एमबी पर सेकंड असा रीड आणि राइड स्पीड असलेली कार्डस. ही कार्डस साध्या रेकॉर्डिंगसाठी किंवा सामान्य वापरासाठी योग्य आहेत.
क्लास ४ आणि ६ म्हणजेच ४ एबीपीएस आणि ६ एमबीपीएस इतका स्पीड असलेली कार्डस हायडेफिनेशन व्हीडिओ रेकॉर्डिंगसाठी उपयुक्त ठरतात. तर क्लास १० म्हणजेच १० एमबीपीएस इतक्या स्पीडची कार्डस फुलएचडी रेकॉर्डिग्ससाठी वापरली जातात.
याशिवाय यूएचएस क्लास ३ प्रकारची कार्डसही उपलब्ध आहेत. सध्याच्या ‘फोर के’ व्हिडिओजसाठी हे कार्ड वापरलं जातं. ३० एमबीपीएस इतका रीड आणि राइड स्पीड असणारी ही कार्डस आहेत.
तुम्ही जर का ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तिथे ‘डिटेल्स’मध्ये गेलं असता तुम्हाला ही माहिती मिळू शकते. त्यामध्ये ‘रीड’ आणि ‘राइट स्पीड ’ हा वेगवेगळा दिलेला असतो. आपल्या आवश्यकतेनुसार त्या त्या स्पीड क्लासचं कार्ड विकत घेणं सहज शक्य आहे. मात्र एक लक्षात ठेवा, स्पीड जितका जास्त तितकी किंमतही जास्त. त्यामुळेच ३२ जीबीचं एक कार्ड ५०० रुपयांनाही असू शकतं आणि तितक्याच कॅपॅसिटीचं दुसरं एखादं कार्ड ७०० रुपयांनाही मिळू शकतं.
तुमच्याकडे असणारं डिव्हाइस (कॅमेरा, मोबाइल, टॅब्लेट) बघून त्याला कम्पॅटिबल असं आणि तुम्हाला आवश्यक अशा स्पीडचं कार्ड निवडणं किफायतशीर आहे. शेवटी कपाटात डेटा कोंबायचा असं जरी म्हटलं तरी तो कोंबण्यासाठी योग्य ते कपाट असायला हवं नको का?
पुष्कर सामंत
pushkar.samant@gmail.com