स्मार्टहोम म्हणजे नेमकं काय आणि त्याचं तंत्रज्ञान कसं काय काम करतं याविषयी आपण गेल्या आठवडय़ात पाहिलं. हे प्रकरण आपल्या घरात कसं आणता येईल आणि तेही वाजवी दरात हे बघूया. मुळात स्मार्टहोम म्हणजे महागडे चोचले हे मत डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. सध्याच्या घडीला बाजारात अनेक कंपन्यांची उपकरणं आणि अॅप्स उपलब्ध आहेत. घरगुती उपकरणं, इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स तसंच ऑनलाइनही ही उपकरणं मिळू शकतात. तसंच एखाद्या स्थानिक इलेक्ट्रिशिअनकडून घरात इन्स्टॉलही करू शकता.
एक्सटेन आणि झेड-वेव्ह या दोनपैकी एक टेक्नॉलॉजी कुठल्याही उपकरणांमध्ये वापरली जाते. त्यामुळे समान तंत्रज्ञान असणारी उपकरणं घ्या. म्हणजे संपूर्ण घरात एक्सटेन टेक्नॉलॉजी असणारीच उपकरणं असू द्या किंवा झेड-वेव्हची. अर्धी एक्सटेन आणि उरलेली झेड-वेव्हची इन्स्टॉल करणं जरा किचकट ठरू शकतं.
जर का स्वत:चं स्वत: इन्स्टॉल करत असाल तर सुरुवात सोप्या उपकरणांपासून करा. उदाहरणार्थ, लायटिंग स्टार्टर किट म्हणजे घरातली प्रकाशव्यवस्था आणि त्यानंतर हळूहळू सुरक्षाव्यवस्था वगैरे इतर प्रकारांकडे वळा. वायरलेस नेटवर्कवर चालणारी उपकरणं ही शक्यतो वायफाय राऊटरच्या जागेला अनुसरून इन्स्टॉल करणं योग्य असतं. अगदीच घराची तोडफोड करून नव्याने बांधणी करत असाल तर आधीच योजना नीट आखा. म्हणजे त्यानुसार स्मार्टहोम बनवता येऊ शकतं. इलेक्ट्रिशिअनशी योग्य सल्लामसलत केल्यास उत्तम भावात आणि चांगल्या दर्जाची उत्पादनं नक्कीच मिळू शकतात. काही उत्पादनं आणि त्यांच्या किमती इथे देत आहोत.
बेल्किन विमो लाइट स्विच
दिव्या-पंख्याची विविध आकाराची आणि रंगाची बटणं हे घरोघरी भिंतीवर दिसणारं दृश्य. लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अशा साधारण उंचीवर ही बटणं असतात. पण स्मार्टहोमने मात्र ही बटणं थेट स्मार्टफोनवर आणली आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल अशा कुठल्याही ठिकाणाहून घरातील दिवे आणि पंखे नियंत्रित करता येऊ शकतात. बेल्किन विमोचा लाइट स्विच हा साधारण नेहमीच्या स्विचेस किंवा बटणांपेक्षा मोठा असतो. त्यामुळे स्वीचबोर्डमध्ये बसवताना जरा खटपट करावी लागेल. साधारण १५-२० मिनिटांमध्ये हा स्वीच बसवून होतो. एकदा का हार्डवेअरचा कार्यभाग उरकला की मग सॉफ्टवेअरचं प्रकरण सुरू होतं. स्मार्टफोन किंवा टॅबवर विमो सेटअप करावा लागतो. विमोचं अॅप अॅपस्टोअर किंवा प्लेस्टोअरमध्ये मोफत उपलब्ध आहे. जर का क्रिएटिव्हिटी करायची असेल तर सोबत आयएफटीटीटी हे अॅपसुद्धा इन्स्टॉल करा.
त्यानंतर वाय-फायच्या सेटिंगमध्ये जा आणि अॅव्हायलेबल नेटवर्कच्या यादीमध्ये विमोचा समावेश करा.
विमोचं अॅप सुरू करा आणि पुढल्या टप्प्यांचं अनुसरण करा. ही कॉन्फिगरेशनची प्रक्रिया अगदी सोपी आहे. ती पूर्ण झाली की घरातल्या दिव्यांचं नियंत्रण हातातल्या स्मार्टफोनवरून सहज शक्य होतं. पंख्यांसाठी वेगळा स्विच इन्स्टॉल करावा लागतो. हा एक स्विच साधारण अडीच हजार रुपयांपर्यंत मिळतो. फिलिप्स कंपनीचा ह्य़ुए लक्स हासुद्धा एक पर्याय आहे. पण त्याची किंमत ही साधारण सहा हजारापर्यंत जाते.
इझविझ मिनी ओ
घराची सुरक्षा हा आजच्या घडीला महत्त्वाचा प्रश्न आहे. दिवसाचे १५ तास घरापासून लांब असताना आपल्या घरात कुणी चोर तर घुसत नाही ना यावर लक्ष ठेवणं कठीण असतं. अशावेळी घरात एखादा गुप्तहेर ठेवून निर्धास्तपणे काम करणं किंवा सुट्टय़ांचा आनंद घेणं ही गरज बनते. सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे सिक्युरिटी कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे इझविझ मिनी आणि मिनी ओ. या दोन प्रकारांमध्ये फरक हा की मिनी ओमध्ये आवाजही रेकॉर्ड करण्याची सुविधा आहे.
या कॅमेऱ्याचं वैशिष्टय़ असं की घरात एखाद्या ठिकाणी लपवून घरावर नजर ठेवणं शक्य असतं. तसंच मोशन सेन्सरमुळे घरात काही हालचाल झाली की लगेचच हा कॅमेरा त्या हालचालीचा फोटो काढून स्मार्टफोनवर अलर्ट पाठवतो. याशिवाय नाइट व्हिजनची सुविधा तर आहेच. कॅमेऱ्याला मॅग्नेटिक बेस असल्यामुळे तो कुठेही चिकटून राहू शकतो. इन्स्टॉलेशन अगदी सोपं असल्याने सहजरीत्या घरात आपल्याला हव्या त्या ठिकाणी कॅमेरा लावता येऊ शकतो. रेकॉर्डिग स्टोअरेजसाठी तीन एसडी कार्ड, क्लाउड स्टोअरेज आणि व्हॉल्ट डीव्हीआर असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. साधारण चार हजाराच्या आत अशी या कॅमेऱ्याची किंमत आहे.
स्मार्टहोम ही संकल्पना आजकाल इंटिरिअर डेकोरेटर या बॅनरखाली येते. त्यामुळे जर का कधी घराची पुनर्बाधणी करायचं ठरवलं तर बजेट स्मार्टहोमचा विचार नक्की करा.
pushkar.samant@gmail.com