स्मार्टफोन हे जर का शरीर असेल तर नेटपॅक हा त्याचा आत्मा आहे. मेसेजिंग अ‍ॅप्स असोत, युटय़ूब व्हीडिओज असोत, इमेल्स, जीपीएस, ट्विटर, फेसबुक, बातम्या अशा सगळ्याच सोयीसुविधांसाठी इंटरनेट हे लागतंच. ते नसेल तर मग हा स्मार्टफोन ‘ढ’ होऊन जातो. इंटरनेटशिवाय स्मार्टफोन म्हणजे घडय़ाळ, म्युझिक प्लेयर आणि कॅमेरा यांचं तांत्रिक मिश्रण. बाकी काही नाही. या सगळ्या सुविधा कुठल्याही अडथळ्याविना सुरळीत चालाव्यात यासाठी टूजी, थ्रीजी, फोरजी वगैरे इंटरनेट सुविधांची अजीजी करावी लागते. सव्‍‌र्हिस प्रोव्हाइडर म्हणजेच टेलिकॉम ऑपरेटरची सुविधा जितकी चांगली तितका इंटरनेटचा स्पीड चांगला.
डेटा ने-आण करण्यासाठी बँडविड्थची गरज असते. बँडविड्थ जितकी जास्त तितक्या जलदगतीने डेटाची वाहतूक चालते. दुपदरी, चौपदरी, सहापदरी द्रुतगती मार्गानुसार ट्रॅफिक जसजसं कमी होत जातं आणि गाडय़ा जशा वेगाने धावतात अगदी तसाच हा टूजी, थ्रीजी, फोरजीचा प्रकार आहे. द्रुतगती मार्गाच्या रुंदीनुसार जसा टोल वाढत जातो तशीच टूजी, थ्रीजी, फोरजीची किंमतही वाढत जाते. सध्याच्या घडीला टूजी आणि थ्रीजी फॉर्मात आहे. लोक महिन्याकाठी निदान एकदा तरी नेटपॅक रिचार्ज करतात. पण खरा प्रॉब्लेम हा नेटपॅकच्या किमतीत नसून तो पटकन संपून जाण्यात आहे. अनेकदा अचानक नेटपॅक संपल्याचा मेसेज येतो आणि आपण चक्रावून जातो. हे झालं तरी कसं हे मात्र काहीही कळत नाही. सव्‍‌र्हिस प्रोव्हाइडरच्या कस्टमर केअरवाल्यांशी आपण भांडत बसतो. पण त्याने मनस्तापच जास्त होतो. यात सव्‍‌र्हिस प्रोव्हाइडर्सचा फारसा दोष नसतो. आपणच आपल्या नकळत अशी अ‍ॅप्स आणि सुविधा सुरू ठेवलेल्या असतात ज्या याला कारणीभूत असतात. पोळीला जसं भाजी लावून खातात तसंच स्मार्टफोन बॅटरीच्या जोडीला इंटरनेट डेटा खात असतो. त्यामुळे बॅटरीबरोबरच या नेटपॅकच्या डाएटचीही काळजी करणं गरजेचं आहे.

नेटपॅकचं डाएट कसं सांभाळाल
१. वेबपेजेस कम्प्रेस करणं – गुगल क्रोम हा जर का तुमचा डिफॉल्ट वेब ब्राउजर असेल तर वेबपेजेस कम्प्रेस केल्याने मोबाइल ब्राउजर डेटाच्या वापरामध्ये ३०-३५ टक्क्यांनी कमी होते. याचाच अर्थ तुम्ही तेवढय़ा डेटाची बचत करता. याचा एक तोटा असा आहे की वेबपेज लोड व्हायला थोडा वेळ लागतो. पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि जेव्हा इंटरनेट डेटाच्या बाबतीत असं असेल तर काय हरकत आहे.

काय करायचं
* मोबाइलवर गुगल क्रोम सुरू करा
* उजवीकडे तीन उभी टिंबं दिसतील त्यावर टॅप करा
* सेटिंग्जमध्ये जा
* डेटा सेव्हर असा ऑप्शन दिसेल तो ऑन करा. आणि पहा कमाल.
२. व्हीडिओ कम्प्रेसर – ऑपेरा हासुद्धा एक मोबाइल वेब ब्राउजर आहे. फार लोक तो वापरत नाहीत. पण अँड्रॉइडसाठी ऑपेराचा एक महत्त्वाचा फायदा आहे. जर का तुम्ही सतत व्हीडिओज बघत असाल तर हा वेबब्राउजर तुमच्यासाठी तारणहार आहे. डेटाचा वापर कमी तर होतोच, पण व्हीडिओ लोड होण्याचा वेगही वाढतो.

काय करायचं
* ऑपेरा इन्स्टॉल करा
* सेटिंग्जमध्ये जा
* डेटा सेव्हिंग्ज या ऑप्शनवर क्लिक करा
* व्हीडिओ कम्प्रेशन असा ऑप्शन दिसेल त्यावर टीक करा.
३. फेसबुक करा डिलीट – मोबाइलवरचं फेसबुक अ‍ॅप हे सगळ्याच जास्त डेटा वापरतं. खुद्द फेसबुकनेही हे मान्य केलेलं आहे. त्यामुळेच त्यांनी फेसबुक
लाइट नावाचं दुसरं एक अ‍ॅप्लिकेशनही लाँच केलं होतं. पण त्याचाही तोच लोच्या आहे. फेसबुक लाइट हे
अ‍ॅप एका महिन्यात साधारण १०० एमबी इतका डेटा खातं. त्यावरूनच अंदाज येऊ शकतो. फेसबुक मोबाइलमध्ये नसणं हे अनेकांना पटणारं नसतं. साहजिक आहे ते. अशी अनेक अ‍ॅप्स आहेत जी फेसबुकला पर्याय आहेत, पण ती अ‍ॅप्ससुद्धा फेसबुक इतकाच डेटा
खर्च करतं.
मात्र टिनफॉइल नावाचं एक वेब अ‍ॅप आहे जे इंटरनेट डेटाच्या खर्चावर चांगलीच मर्यादा आणतं. एकतर हे वेब अ‍ॅप असल्यामुळे फेसबुक अ‍ॅपमध्ये सुरू होण्याऐवजी वेबसाइट स्वरूपात सुरू होतं.
यापेक्षा सोपा उपाय आहे. तो म्हणजे गुगल क्रोम ब्राउजरमध्ये फेसबुक सुरू करायचं आणि त्याचा शॉर्टकट होम स्क्रीनवर आणायचा.
काय करायचं.
* क्रोममध्ये फेसबुक सुरू करा
* चित्रात दाखवल्याप्रमाणे ओव्हरफ्लो मेन्यू ओपन करा
* अ‍ॅड टू होम स्क्रीनवर क्लिक करा की झालं काम
४. बॅकग्राउंड डेटावर मर्यादा आणा – इंटरनेट डेटाच्या बचतीसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. बॅकग्राउंड डेटा म्हणजे अशी अनेक अ‍ॅप्स ती स्क्रीनवर सुरू आहेत हे दिसत नाहीत, पण मागच्या मागे इंटरनेटचा वापर करत असतात. उदाहरणार्थ इमेल सिंकिंग, हवामानाशी संबंधित अ‍ॅप्स इत्यादी. त्यामुळेच अशा अ‍ॅप्सच्या इंटरनेट वापरावर मर्यादा आणण्यासाठी रिस्ट्रिक्ट बॅकग्राउंड डेटा नावाचा पर्याय आहे.
कसं करायचं
* मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये जा
* डेटा युसेज ऑप्शनवर क्लिक करा
* रिस्ट्रिक्ट बॅकग्राउंड डेटावर क्लिक करा – तुम्हाला आवश्यक तेवढी मर्यादा तुम्ही ठरवू शकता. हा पर्याय पोस्टपेड असणा-यांसाठी फार उपयोगी आहे.
५ ऑटो अपडेट बंद करा – हा पर्यायही तुमचं इंटरनेट डेटा वाचवू शकतो. अनेकदा अ‍ॅप्स आपोआप अपडेट व्हायला लागतात. प्लेस्टोअरमधून हे ऑटो अपडेट बंद करता येतात.
कसं करायचं
* गुगल प्लेस्टोअर सुरू करा
* डावीकडून उजवीकडे स्वाइप करा
* येणाऱ्या नेव्हीगेटर ड्रॉवरवर सेटिंग्जमध्ये जा
* सर्वात वर तुम्हाला ऑटो अपडेट अ‍ॅप्स दिसेल. एक तर त्यावर क्लिक करून ते बंद करा किंवा ऑटोअपडेट ऑन वायफाय ओन्लीवर क्लिक करा.

६ ऑफलाइन मॅप वापरा – गुगल मॅप्स किंवा जीपीएस ज्याप्रमाणे बॅटरीचा पुरेपूर आस्वाद घेतं तसंच ते मोबाइल डेटाचाही घेतं. त्यामुळेच ही सेवा न वापरता ऑफलाइन मॅप्स वापरणं उत्तम. गुगल मॅप्स ऑफलाइन ही सेवा तुमचा इंटरनेट डेटा वाचवते.
थोडक्यात काय तर इंटरनेट है तो फोन स्मार्ट है. नाहीतर तो फोन म्हणजे थोडे जास्त ऑप्शन्स असणारा कॅलक्युलेटरच.
pushkar.samant@gmail.com