देशात अक्षय ऊर्जेसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून सध्या सौर ऊर्जेत मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. सौर ऊर्जेचे मोठे प्रकल्प काही प्रमाणात यशस्वी होत असतानाच. घरगुती वापरासाठी किंवा छोटय़ा स्तरावरील वापरासाठीही सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल पॉवर बँक्स बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. यापैकी ईटी-स्टोन पॉवर बँक नुकतीच बाजारात आली आहे. पाहुयात कशी आहे ही पॉवर बँक.

मार्केटिंगमध्ये काम करणारा असो किंवा प्रवासाला जाणारा असो प्रत्येक व्यक्तीच्या हातात सध्या मोबाइल चार्जिगसाठी पॉवर बँक दिसते. पण अनेकदा या पॉबर बँकचीही क्षमता संपते आणि आपल्या कामाच्या वेळी आपल्याला फोन वापरता येत नाही. तसेच आपण मोबाइल पॉवर बँकचा वापर करून इतर कोणतेही उपकरण चार्ज करू शकत नाही. यामुळेच ईटी-स्टोन या कंपनीने बाजारात आणलेली पॉवर बँक या सर्वासाठी उपयुक्त ठरते. ही पॉवर बँक सौर ऊर्जेवर चार्ज होणारी असल्यामुळे आपण ही बँक वापरत असताना दुसरीकडे ती सूर्य प्रकाशामुळे चार्जही होत असते. यामुळे याला पॉवर बॅकअप चांगला राहतो. पाहुयात काय आहेत या पॉवर बँकची वैशिष्टय़े आणि उणिवा.

रचना

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पॉवर बँक या लहान आकारात उपलब्ध आहेत. पण ईटी-स्टोनने प्रस्थापित आकारांना तडा देत थोडी मोठी म्हणजे ७४ बाय १३५ बाय १६.८एमएम आकाराची पॉवर बँक बाजारात आणली आहे. तरीही ही पॉवर बँक खिशात आरामात राहू शकते. ती खिशात बसल्यावर दुसरी कोणतीही वस्तू त्यात ठेवता येणार नाही. याचे वेगळेपण म्हणजे याला एक स्टँड देण्यात आला आहे. ज्याच्या आधारे आपण ही पॉवर बँक कोणत्याही दिशेला फिरवू शकतो. तसेच यामध्ये ट्रायपॉडसारखी एक स्टिकही देण्यात आली आहे. ज्याच्या साह्याने आपण पॉवर बँक प्रकाशाच्या कोणत्याही ठिकाणी चार्जिगला लावू शकतो.  या स्टॅंडला सक्शन पंप आहे. जेणे करून आपण त्याला जोडलेली पॉवर बँक काचेच्या खिडकीला किंवा गाडीच्या काचेवर लावून पॉवर बँक चार्ज करू शकतो. पॉवर बँकच्या वरच्या बाजूस सोलार पॅनल देण्यात आले आहे. त्याच्यावर मॅट फिनिशिंग करण्यात आले आहे यामुळे ते हाताळत असताना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवत नाही. पॉवर बँकच्या दुसऱ्या बाजूला दोन एलईडी दिवे देण्यात आले आहेत. याचा वापर आपण अंधारात प्रवास करत असताना करू शकतो. येथेही चार्जरसोबत देण्यात आलेल्या किकस्टँडचा वापर करून आपल्याला ज्या दिशेला प्रकाश पाहिजे त्या दिशेला आपण ते फिरवू शकतो. याचबरोबर या दिव्यांचा प्रकाश वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठीची सोयही यामध्ये देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर उपकरणाच्या तळाला आणखी एक फ्लॅश दिवा देण्यात आला आहे. ही पॉवर बँक सौर ऊर्जेबरोबरच यूएसबी चार्जरनेही चार्ज होऊ शकते. यामुळे जर प्रकाशाची अडचण असेल तर तुम्ही ही पॉवर बँक यूएसबीनेही चार्ज करू शकता.

कामकाज

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर जास्त क्षमतेच्या पॉवर बँकच्या तुलनेत या पॉवर बँकची क्षमता कमी आहे. या पॉवर बँकची क्षमता ३१०० एमएएच इतकीच आहे. पण ही पॉवर बँक सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे त्याची काम करण्याची क्षमता दिवसा खूप अधिक असते. इतर पॉवर बँकमध्ये बॅटरीचे चार्जिग संपल्यावर ती पुन्हा चार्ज करण्यासाठी सारखी जोडणी करून ठेवावी लागते. म्हणजे जर तुम्ही प्रवास करत आहात आणि तेथे तुम्हाला चार्जिगची सोय नसेल अशावेळी ही सोलार पॉवर बँक खूप उपयुक्त ठरू शकते. ही पॉवर बँक पाच ते साडेपाच तासांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. पण उन्हाळय़ाच्या दिवसांत एवढय़ाच वेळात पूर्ण चार्ज होण्याची क्षमता या पॉवर बँकची असल्याचा कंपनीचा दावा आहे. या पॉवर बँकमध्ये आऊटपूट जोडणी १.५ अ‍ॅम्पिअर इतकी देण्यात आली आहे. यामुळे आयपॅडसारखी उपकरणेही यावर चार्ज होऊ शकतात.

थोडक्यात

सौर ऊर्जेवर सध्या बाजारात उपलबध असलेल्या पॉवर बँकच्या तुलनेत नक्कीच ईटी स्टोनची ही पॉवर बँक उजवी ठरते. यामुळे या बाजारात नवी स्पर्धा निर्माण होणार आहे. पण इतर पॉवर बँकच्या तुलनेत याची किंमत खूप जास्त असल्यामुळे दिवसाला दोन ते तीन तास पॉवर बँकचा वापर करणारी मंडळी या पॉवर बँककडे वळतील का हा प्रश्न आहे. याची किंमत ४४९९ रुपये इतकी आहे. यामुळे ही पॉवर बँक सतत प्रवास करणारे, ट्रेकर्स अशा मंडळींसाठी उपयुक्त ठरू शकते.

– नीरज पंडित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

niraj.pandit@expressindia.com