शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर परगावी राहणाऱ्या मित्रांच्या/मैत्रिणींच्या गटाने एखादा फ्लॅट भाडय़ाने शेअर करणे किंवा दोन-तीन कुटुंबांनी एकत्र येऊन एखादी सहल किंवा मोठा प्रवास करणे किंवा अनेक मित्रांनी एकत्र येऊन एखाद्या मित्राला वाढदिवसाची पार्टी देणे असो, या सर्व बाबींमध्ये सामाईक गोष्ट असते ती म्हणजे झालेल्या खर्चाची नीट नोंद ठेवून तो योग्य प्रमाणात वाटून घेणे. तसे हे बऱ्यापैकी जिकिरीचे काम असते. प्रत्येक सदस्याने केलेला खर्च वेगवेगळा नोंदवून सदस्य संख्येच्या प्रमाणात विभागणी करणे. यातच काही खर्चाचे वाटेकरी वेगवेगळे असणे यांसारखी गुंतागुंत असू शकते.
हे काम सोपे करण्यासाठी स्प्लिटवाइज (Splitwise) हे अ‍ॅप स्मार्टफोनधारकांना उपलब्ध आहे. (सदर अ‍ॅप संगणक, लॅपटॉप यावरदेखील उपलब्ध आहे) ज्या मित्रमंडळींमध्ये खर्च विभागायचा आहे त्यांचा व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे ग्रुप बनवावा लागतो. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जसे अनेक ग्रुप बनवता येतात त्याचप्रमाणे येथेही गरजेनुसार एकापेक्षा जास्त ग्रुप बनवता येतात. उदाहरणार्थ घर शेअर करणाऱ्यांचा गट, ऑफिसमध्ये एकत्र पार्टी करणाऱ्यांचा गट इत्यादी इत्यादी. या गटातील प्रत्येक सदस्याकडे ह्या ग्रुपचे सदस्यत्व असावे लागते.
आता हे अ‍ॅप कसे काम करते ते पाहू. घर शेअर करणारे मित्र स्वत: केलेल्या खर्चाची नोंद या अ‍ॅपवर आपापल्या मोबाइलवर करतात. उदाहरणार्थ एकाने घरभाडे भरले असेल, दुसऱ्याने वीज बिल, तर तिसऱ्याने किराणा सामान आणले असेल आणि महिन्याच्या शेवटी हिशेब पूर्ण करायचे असे ठरले असल्यास शेवटी कोण कोणाला किती पैसे देणे लागतो याचा हिशेब अ‍ॅप तुम्हाला करून देते. (तुम्ही सांगितल्यास आठवण म्हणून तसा ईमेलही पाठवते.)
जर अनेक मित्र एकत्र हॉटेलमध्ये जाऊन जेवले असल्यास कोणी काय काय मागवले यावरही बिलाची विभागणी करता येते. त्यामुळे शाकाहारींना मांसाहाराचे पैसे भरावे लागत नाही. शिवाय हे जेवण एखाद्याच्या वाढदिवसासाठी असेल तर ज्याचा वाढदिवस आहे त्याला बिल शेअिरगमधून वगळण्याची सोय आहे.
मित्रांमध्ये गरजेला हातउसने पैसे घेण्याची सवय असते. अशा वेळी आपण कोणाला पैसे उसने दिले व कोणाकडून घेतले याची नोंद करण्याची सोयही या अ‍ॅपमध्ये आहे. सेटिंगमध्ये योग्य तो पर्याय निवडल्यास उसन्यांचा हिशेब नक्की काय झाला ते हे अ‍ॅप तुम्हाला सांगते. आपले अशा प्रकारचे वैयक्तिक हिशेब इतरांनी पाहू नये, असे वाटत असल्यास बोटाचे ठसे पासवर्डप्रमाणे वापरण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये दिलेली आहे. अर्थातच त्यासाठी स्मार्ट फोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर असणे गरजेचे आहे. (हल्लीच्या बऱ्याच फोन्समध्ये तो असतो.)
अनेक जणांनी एकत्र येऊन करायच्या कार्यक्रमांमध्ये पैशांचे हिशेब ठेवण्याचा त्रास कमी करणारे हे विनामूल्य अ‍ॅप खरोखरच बहुमूल्य आहे. याच प्रकारातील आणखी काही अ‍ॅप्स तुम्हाला गुगल स्टोअरवर दिसतील. प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे त्याची निवड करावी.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com