कॅमेराचा शोध लागल्यानंतर इतिहासातले अनेक महत्त्वाचे क्षण त्या चौकोनी जादुई यंत्रात टिपले जाऊ लागले. प्रकाश आणि लेन्सच्या माध्यमातून समोर दिसणारं दृश्य जसंच्या तसं टिपणं ही संकल्पनाच अद्भुत होती. तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतसं या लेन्सची आणि पर्यायाने कॅमेराची उपयुक्तता वाढत गेली. पिक्सेल, मेगापिक्सेल इतकंच नाही तर गिगापिक्सेलपर्यंत ही मजल गेलीये. नुकताच अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी पार पडला. त्या सोहळ्याचं एक छायाचित्र सीएनएन या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलं. त्या छायाचित्राचं वैशिष्टय़ हे की ते गिगापिक्सेलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
कॅमेराच्या आणि खरं तर फोटो काढण्याच्या बाबतीत समोरचं दृश्य सुस्पष्ट दिसण्यासाठी फोकस अॅडजस्ट करणं महत्त्वाचं असतं. एसएलआर कॅमेराच्या बाबतीत फोकस मॅन्युअली अॅडजस्ट करावा लागतो. पण सध्या असणारे बहुतांश कॅमेरे हे ऑटोफोकसच्या तंत्रज्ञानावरच काम करतात. स्मार्टफोन्स आणि डिजिटल कॅमेराच्या मुळाशी हेच तंत्रज्ञान असतं. पण हे ऑटोफोकस नेमकं काम कसं करतं. ऑटोफोकस म्हणजेच पॉवर फोकस. कॉम्प्युटरच्या साहाय्याने एक छोटीशी मोटोर कॅमेराच्या आत फिरते. आणि हीच मोटोर लेन्स फोकस करते. लेन्स फोकस होते म्हणजे नेमकं काय होतं? समोर दिसणारं दृश्य अगदी लख्ख आणि स्पष्टपणे फिल्मवर पडेपर्यंत लेन्स आत-बाहेर होते. आणि यालाच फोकसिंग म्हणतात. दृश्यापासून कॅमेरा जितक्या अंतरावर असतो त्यानुसार लेन्स आणि कॅमेरातली फिल्म (ज्यावर दृश्याची प्रतिमा पडते) यांच्यातील अंतर अॅडजस्ट होत असतं. ऑटोफोकसप्रमाणेच सध्याच्या स्मार्टफोन कॅमेरामध्ये असणारी वैशिष्टय़े म्हणजे ऑटोमॅटिक फिल्म अॅडव्हान्स, ऑटो फ्लॅश आणि ऑटो एक्स्पोजर.
ऑटोफोकसचे मूलत: दोन प्रकार आहेत. अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह. साधारणपणे स्वस्त असे पॉइंट टू शूट डिजिटल कॅमेरा तसंच स्मार्टफोनचे कॅमेरा अॅक्टिव्ह सिस्टीमनुसार काम करतात. हे कॅमेरा तुलनेने स्वस्त असतात. तर महागडे एसएलआर (सिंगल लेन्स रिफ्लेक्स) कॅमेरा पॅसिव्ह सिस्टीमचा अवलंब करतात. अॅक्टिव्ह ऑटोफोकसमध्ये सोनार म्हणजेच साऊंड नेव्हिगेशन रेंजिंगचा वापर केला जातो. पोलारॉइड कार्पोरेशनने या संकल्पनेचा वापर सर्वप्रथम कॅमेरासाठी केला. अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्हचा वापर करत लेन्स अॅडजस्ट केली जाते. यामध्ये एक महत्त्वाची अडचण असते. उदाहरणार्थ चालत्या बसमधून अनेकदा फोटो काढले जातात. खिडकीची काच जेव्हा बंद असते तेव्हा अशा कॅमेरांमधून (डिजिटल तसंच स्मार्टफोन कॅमेरांमध्ये अनेकदा ही अडचण येते) काढले जाणारे फोटो ब्लर येतात. याचं कारण म्हणजे साऊंड वेव्हज या खिडकीवर आपटल्या जातात आणि लेन्स नीट फोकस होत नाही. परिणामी फोटो चांगला येत नाही. सध्या अस्तित्वात असणारे कॅमेरा हे साऊंड वेव्हजऐवजी इन्फ्रारेड सिग्नलचा अवलंब करतात. त्यामुळे २० फूट अंतरावरील वस्तू, दृश्य टिपण्यासाठी असे कॅमेरे वापरणं उत्तम ठरतं. पॅसिव्ह ऑटोफोकस हा प्रकार वर म्हटल्याप्रमाणे प्रामुख्याने एसएलआरमध्ये वापरला जातो. कॉम्प्युटर अॅनालिसिसच्या माध्यमातून सबजेक्ट आणि कॅमेरा यांच्यातलं अंतर मोजलं जातं. कॅमेरा हा थेट समोरच्या दृश्यानुसार लेन्स पुढेमागे करतो आणि ती प्रतिमा स्वच्छ येईपर्यंत हा प्रकार सुरू असतो. प्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट झाली की हे अॅडजस्ट होणं बंद होतं.
ऑटोफोकस हे नेहमीच अचूक असेल असं नाही. शेवटी कॅमेरा वापरण्यावर लेन्सचं फोकसिंग अवलंबून असतो. वापरणाऱ्यालाच जर का फोकसिंगचं पुरेसं ज्ञान नसेल तर ऑटोफोकसच्या साहाय्याने काढलेले फोटोही ब्लर येतात. कॅमेरामध्ये असणारा मायक्रोप्रोसेसर (ह्य़ाचं कामकाज नेमकं कसं चालतं तेही लवकरच बघू या.) या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतोच. पण शेवटी क्लिकवर असणारं बोटच त्या प्रोसेसरचा मालक असतो.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com