स्मार्टफोन्सच्या येण्याने ज्या काही टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या त्यातलं एक म्हणजे घडय़ाळ. आजही दिवसाच्या कोणत्याही प्रहरी एखाद्याला वेळ विचारली तर मनगटाकडे बघण्याऐवजी त्याचा हात खिशातल्या मोबाइलकडे जातो. तबकडी आणि चामडय़ाच्या बेडय़ांपासून मनगटाची मुक्तता झाली असं वाटत असतानाच घडय़ाळंही स्मार्ट बनली. आणि स्मार्टफोनचा लहान भाऊ या नात्याने स्मार्टवॉचेस उदयाला आली. स्मार्टवॉचेसची लोकप्रियता हा वादाचा विषय असू शकतो. सध्याच्या घडीला तरी ती स्टाइल स्टेटमेंट किंवा फॅशनशीच संबंधित असल्याच्या चर्चा असतात. पण तरीही या स्मार्टवॉचेसच्या प्रॉडक्शनमध्ये खंड पडलेला नाही. आणि लोकप्रिय नसली तरी त्यांच्याबद्दलचं आकर्षण मात्र सगळ्यांनाच असतं.
पूर्वी शाळेत असताना काटय़ाच्या घडय़ाळांमध्ये डिजिटल घडय़ाळ मनगटाला दिसलं की त्याचं अप्रूप असायचं. काही घडय़ाळांमध्ये कॅलक्युलेटरही असायचा. हे डिजिटल घडय़ाळ म्हणजे आत्ताच्या स्मार्टवॉचेसचं आद्य रूप असं आपण म्हणू शकतो. पण आत्ताची स्मार्टवॉचेस ही कॅलक्युलेटरच्याही पुढे गेलीयत. अॅप्स रन करणं, म्युझिक प्ले करणं, ई-मेल्स, नोटिफिकेशन्ससारख्या स्मार्टफोन्सचे फीचर्स या स्मार्टवॉचेसमध्ये असतात.
मनगटावरची ही घडय़ाळं स्मार्ट तेव्हाच होतात जेव्हा ती स्मार्टफोनशी कनेक्टेड असतात. हे कनेक्शन बहुतांश वेळा ब्लू-टूथमार्गेच असतं. इंटरनेट हा आत्मा असल्यामुळे तो त्या घडय़ाळात शिरला की ते घडय़ाळ जिवंत झाल्यागत होतं. इंटरनेट अॅक्सेस मिळाल्यावर ही घडय़ाळं अगदी जीपीएस नेव्हिगेशन्ससुद्धा दाखवतात. छोटेखानी स्मार्टफोनसारखीच ही स्मार्टवॉचेस काम करतात. त्यामुळेच ‘ाांचं काम कसं चालतं हे जाणून घेणं रंजक आहे.
पहिलं स्मार्टवॉच काढण्याचं पाऊल मायक्रोसॉफ्टने १९८४ मध्ये उचललं. यूसी-२००० हे पहिलंवहिलं स्मार्टवॉच बेसिक या प्रोग्रामिंग लँग्वेजवर चालत होतं. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी मायक्रोसॉफ्टकडून २००२मध्ये स्मार्ट पर्सनल ऑब्जेक्ट टेक्नॉलॉजी म्हणजेच स्पॉट आणण्यात आली. दररोजच्या वापरातली डिव्हाइसेस स्मार्ट बनवणं हा या टेक्नॉलॉजीचा मूळ उद्देश होता. स्पॉट टेक्नॉलॉजी असलेली घडय़ाळं २००८पर्यंत चालली. त्यानंतर मात्र कंपनीकडून ती बंद करण्यात आली.
मात्र ही घडय़ाळं जरी बाजारात नसली तरी त्यामागचं तंत्रज्ञान नामशेष झालं नाही. साइको, कॅसिओ, पल्सर अशा घडय़ाळं बनवणाऱ्या कंपन्यांच्या यादीत गुगल, सॅमसंग, पेबल, अॅपल अशा टेकजाएंट्सची भर पडली. सध्याच्या घडीला डझनवारी स्मार्टवॉचेस बाजारात आहेत. पण त्यापैकी चर्चेत असणारी स्मार्टवॉचेस आपण बघूया.
सोनी स्मार्टवॉच २ – साधारण ४ सेंटीमीटर स्क्रीन असणारं हे स्मार्टवॉच त्याच्या बॉटरी लाइफसाठी प्रसिद्ध आहे. एकदा चार्ज केलं की साधारण चार दिवस हे घडय़ाळ अविरत चालू राहतं. याशिवाय यूएसबी पोर्ट असल्यामुळे डेटा ट्रान्स्फर आणि चार्जिगचीही अडचण नाही. सोनीच्या स्मार्टफोन्सप्रमाणेच इतर स्मार्टफोन्ससोबतही हे स्मार्टवॉच उत्तमरीत्या काम करू शकतं.
पेबल – स्मार्टवॉचच्या दुनियेत पेबलने बराच काळ स्वत:च्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. नेहमीच्या एलसीडी स्क्रीनऐवजी पेबलने ई-पेपरसारखी मोनोक्रोम टेक्नॉलॉजी वापरली. डिजिटल बुक रीडर्समध्ये वापरतात अगदी तसंच हे तंत्रज्ञान काम करतं. त्यामुळेच इतर स्मार्टवॉचेसपेक्षा पेबलच्या बॅटरीचं लाइफ जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमसोबत पेबल काम करू शकतं. त्यामुळेच पेबल हे अधिक लोकप्रिय आहे. मात्र इतर स्मार्टवॉचेससारखं पेबल टचस्क्रीन नाही. मेन्यूज नॅव्हिगेट करण्यासाठी घडय़ाळाच्या बाजूला बटन्स दिलेली आहेत.
गॅलक्सी गीअर – सॅमसंगचं हे स्मार्टवॉच म्हणजे फीचर्सचा भरणा असलेलं गॅजेट. 4 जीबी मेमरी, व्हॉइस कमांड इनपुट, १.९ मेगापिक्सेल कॅमेरा, स्पीकर असा फौजफाटा असलेलं हे स्मार्टवॉच. मुळात फिटनेसवेडय़ा लोकांसाठी हे स्मार्टवॉच बनवण्यात आलं होतं. पण त्यातल्या फीचर्समुळे या घडय़ाळाचीही चर्चा गॅजेट्सप्रेमींमध्ये सुरू असते.
मुळात घडय़ाळ हा प्रकार आता फक्त वेळ दाखवण्यापुरता राहिलेला नाही हे वास्तव आहे. काळ बदलला तसं घडय़ाळंही बदलली. कालदर्शकाचं काम करणारी ही तबकडी कूलनेस आणि फॅशन गॅजेट बनून गेलं. पण आता ते वेअरेबल टेक्नॉलॉजीच्या कक्षेत शिरलंय. सतत हातात स्मार्टफोन ठेवण्यापेक्षा मनगटाकडे बघणं अधिक सोयीस्कर. गुगल ग्लासची जी अवस्था झाली तशी अवस्था या वेअरेबल गॅजेटची होणार नाही. याचं कारण म्हणजे सहजता आणि परवडण्याजोगं तंत्रज्ञान. त्यामुळे स्मार्टफोन्ससोबत स्मार्टवॉचच्या ऑफर्स येणं नाकारता येत नाही.
पुष्कर सामंत – pushkar.samant@gmail.com