टॅनग्रॅम हा जगभरात लोकप्रिय असलेला एक खेळ आहे. हा खेळ मूळचा चीनमधला. दोन मोठे, एक मध्यम आणि दोन लहान काटकोन त्रिकोण, एक चौरस आणि एक समांतरभुज चौकोन असे सात प्रमाणबद्ध आकार घेऊन हा खेळ खेळायचा असतो. या आकारांचा वापर करून विविध माणसे, प्राणी, पक्षी, इंग्रजी आकडे, अक्षरे, भौमितिक आकृत्या बनवता येतात. या आकृत्या बनवताना आपल्याजवळील आकार एकमेकांवर येता कामा नयेत. हा या खेळाचा प्राथमिक नियम.
या खेळाच्या साहित्यात सात आकार आणि त्यांच्यापासून बनवता येणाऱ्या शेकडो आकृत्यांची पुस्तिका आपल्याला मिळते. पुस्तकातील आकृती बघून त्याप्रमाणे आकार बनवायचा असतो. अर्थातच हा खेळ खेळताना कल्पनाशक्तीला चालना मिळते, तसेच एकाग्रता वाढायला मदत होते. हा खेळ लहानांपासून थोरांपर्यंत सर्वाना खेळता येण्यासारखा आहे. हा खेळ आता अॅपच्या माध्यमातून तुम्ही मोबाइलवर देखील खेळू शकता. पॉकेट स्टॉर्मचे Tangram HD या अॅपमध्ये ५५० पेक्षा अधिक डिझाईन पझल म्हणून सोडवण्यास दिलेली आहेत. हे अॅप तुम्ही https://play.google.com/store/apps/details?id=com.jin.games.tangramया लिंकवरून डाऊनलोड करून घेऊ शकता. यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे प्राणी, इंग्रजी अंक, अक्षरे, भौमितिक आकृत्या इत्यादींचा समावेश आहे. रेग्युलर आणि मास्टर अशा दोन्ही स्तरांवर हा खेळ खेळता येतो.
रेग्युलर मोडमध्ये आपल्यासमोर चित्र दिले जाते आणि सात आकार दिले जातात. आकाराच्या साहाय्याने हे चित्र बनवण्यासाठी दिलेले आकार तुम्हाला या चित्रावर योग्य पद्धतीने ठेवायचे असतात. तर मास्टर मोडमध्ये तुम्हाला जे चित्र बनवायचे आहे त्याची छोटी आकृती एका कोपऱ्यात दिलेली असते. ही आकृती बघून तुम्हाला कल्पनाशक्ती लढवून हे चित्र पूर्ण करायचे असते. या मोडमध्ये चित्र पूर्ण करण्यासाठी दिलेल्या हिंटची तुम्ही मदत घेऊ शकता. सोल्यूशनसुद्धा बघण्याची सोय येथे दिलेली आहे. दोन्ही मोडमध्ये प्रत्येक आकार हवा तसा फिरवून घेण्याची किंवा तो उलटदेखील करून घेण्याची सोय येथे उपलब्ध आहे.
एका चिनी मानसशास्त्राने टॅनग्रॅम या खेळाला ‘जगातील सर्वात जुनी बुद्धिमत्ता चाचणी’ असे म्हटले आहे. स्क्रॅबल या खेळात उपलब्ध अक्षरांतून आपण शब्द तयार करतो. यातून आपली शब्दसंपत्ती वाढते. अंकांशी संबंधित बुद्धिमत्ता चाचणीतून आपले गणिताचे ज्ञान विकसित होते. तसेच टॅनग्रॅममधून आपली भौमितीय आकारांशी संबंधित बुद्धिमत्ता विकसित (अॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग) होण्यास हातभार लागतो. या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा आपल्याला नक्की कुठे उपयोग होतो? आर्किटेक्ट घराचा नकाशा बनवताना उपलब्ध जागेत घरातील विविध खोल्या, खिडक्या, दरवाजे यांची आदर्श मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. इंटिरियर डिझायनर्स दिलेल्या घरात विविध सुविधा योग्य पद्धतीने बसवून देतात, तर नगररचनाकार शहरांमधील रस्ते व नागरी सुविधांची मांडणी करतात. हे सर्व करताना जी बुद्धिमत्ता पणास लागते तीच टॅनग्रॅम या खेळासही लागते. थोडक्यात म्हणजे हा खेळ खेळता खेळता तुम्हाला तुमच्यातील कल्पकतेचा साक्षात्कार होण्याची शक्यता आहे.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा