दिवाळीनिमित्त आपल्या प्रियजनांना कोणती भेटवस्तू द्यायची या विवंचनेत असलेल्यांना नेहमीच्याच कपडे, भांडी या व्यतिरिक्त काहीतरी हटके पर्याय हवे असतात. पण यामध्ये नेमके काय द्यायचे. मोबाइल आणि मोबाइलशी संबंधित नियमित अॅक्सेसरीज अनेक असतात. मात्र असे काही गॅजेट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळतील तसेच तुमच्या प्रियजनांना उपयुक्तही ठरतील. पाहुयात असे काही पर्याय.
स्मार्टबॅण्ड
जर तुमच्या प्रियजनांना स्मार्टवॉच किंवा स्मार्टबॅण्डची हौस असेल तर तुम्ही या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. यामध्ये आपल्या हृदयाच्या ठोक्यांपासून ते आपण कितीवेळा जिने चढलो अथवा उतरलो, आपल्या झोपेचे वेळापत्रक आदी आरोग्यात उपयुक्त माहिती मिळू शकते. पण जेव्हा आपण आरोग्य बॅण्डचा विचार करतो तेव्हा कुठेतरी ही किंमत खूप जास्त आहे असे लक्षात येते. मात्र ट्रेस या कंपनीच्या स्मार्टबॅण्ड तुम्हाला अवघ्या १५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या बॅण्डमध्ये आपण दिवसभरात काय काय करतो याची नोंद राहते. आपण घरात असताना नेमके काय करतो, व्यायामशाळेत असताना नेमके काय करतो किंवा अगदी फावल्या वेळात आपल्या हालचाली कशा होतात याचा तपशील या बॅण्डमध्ये नोंदविला जातो. दिवसअखेर आपल्याला दिवसभरात आपण किती पावले चाललो याचा तपशील पुरवितानाच किती कॅलरीज जाळल्या याचा तपशीलही हा बॅण्ड उपलब्ध करून देतो. याचबरोबर आपण कधी झोपलो पाहिजे आणि आपण कसे व किती वेळ झोपतो याचा तपशीलही या बॅण्डमध्ये मिळतो. याचबरोबर अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांचे हे बॅण्ड्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. झेब्रॉनिक्स, सॅमसंग, एचटीसी यांसारख्या कंपन्यांचेही हेल्थ बॅण्ड्स उपलब्ध आहेत. हे बॅण्ड्स तुम्हाला बाजारात अगदी १५०० रुपयांपासून ते ४५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
वायरलेस फ्लॅश ड्राइव्ह
सध्या आपण सर्व वायरलेस जगात वावरतो. असे असले तरी आपण पेन ड्राइव्हमध्ये पाहिजे ती माहिती साठवून ठेवणे, मोबाइलमध्ये साठवून ठेवणे असे करत असतो. पण या सर्वामध्ये आपण जेवढी उपकरणे वापरू तेवढय़ा उपकरणांना पेन ड्राइव्ह जोडावा लागतो. परत सुरुवातीपासून सगळी प्रक्रिया करावी लागते. आता हे सर्व टाळणे शक्य आहे. यासाठी सॅनडिस्क या कंपनीने वायरलेस फ्लॅश ड्राइव्ह बाजारात आणला आहे. या ड्राइव्हच्या मदतीने आपण संगणक, फोन आणि टॅबलेट या तिन्हीवर उपकरणांना एकमेकांशी जोडू शकतो. एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणात मोठय़ा फाइल्स ट्रान्सफर करणे, एचडी व्हिडीओ स्ट्रिमिंग करणे, गाणी ऐकणे किंवा फाइल अथवा फोटो सेव्ह करणे शक्य होणार आहे. याशिवाय या स्टिकच्या माध्यमातून आपण एका उपकरणावर अर्धवट पाहिलेला व्हिडीओ दुसऱ्या उपकरणावर त्याच्या पुढे पाहता येऊ शकतो. यामुळे ही स्टिक आपल्याला कोणत्याही उपकरणावर उपयुक्त अशी ठरते. १६ जीबीच्या या स्टिकची किंमत १८०० रुपये इतकी आहे. याचबरोबर कंपनीने नुकतीच २०० जीबीची स्टिकही बाजारात आणली आहे.
ब्लूटूथ हेडसेट
जर तुमचे प्रियजन तंत्रस्नेही आणि संगीतप्रेमी असतील तर त्यांना ब्लूटूथ हेडसेट ही नक्कीच आवडणारी भेट ठरू शकते. अनेकदा मुलींना प्रवासादरम्यान वायर असलेले हेडफोन वापरणे त्रासदायक ठरते. विशेषत: मुलींना ही भेट आवडते आणि उपयुक्तही ठरू शकते. मुलींच्या पोशाखात अनेकदा खिसा कमी असल्यामुळे हेडफोन जोडला तरी फोन ठेवायचा कुठे असा प्रश्न पडतो. मग फोन बॅगेत ठेवला जातो. अशा वेळी फोनशी जोडलेले राहणे अवघड होते. पण जर तुमच्याकडे ब्लू्टूथ हेडसेट असेल तर तुम्ही फोन बॅग किंवा पर्समध्ये ठेवून बिनधास्तपणे फोनशी जोडलेले राहू शकता. आयबॉलसारख्या कंपनीने बाजारात आणलेल्या हेडसेटमध्ये इनबिल्ट एफएमची सुविधा दिल्यामुळे आपल्याला गाणी ऐकण्यासाठी मोबाइलवरच अवलंबून राहावे लागते असे होत नाही. याशिवाय या हेडसेटना एलईडी लाइट असल्यामुळे तो आणखीच आकर्षक ठरतो. हे हेडसेट ९९९ रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत ऑनलाइन बाजारात उपलब्ध आहेत.
पॉवरबँक
सध्या नोकरीच्या निमित्ताने अनेकदा लोकांना बाहेरगावी प्रवास करावा लागतो किंवा फोनचा वापर वाढल्यामुळे अनेकदा अर्धा दिवसपण बॅटरी पुरत नाही. अशा वेळी पॉवरबँक आपली चांगली सोबती ठरू शकते. सध्या बाजारात अगदी १२०० एमएएचपासून ते २० हजार एमएएचपर्यंतच्या पॉवरबँक उपलब्ध आहेत. मात्र ही पॉवरबँक घेताना त्यातील बॅटरी कोणत्या क्षमतेची आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे. नाहीतर अनेकदा पॉवरबँकच पूर्ण चार्ज होत नाही आणि अडचण निर्माण होते. शिओमी या कंपनीने नुकतीच
२० हजार ८०० एमएएच क्षमतेची पॉवरबँक बाजारात आणली आहे. या पॉवरबँकची किंमत २९९९ रुपये असली तरी ती सध्या ९८० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे ही पॉवरबँक किंवा अन्य कंपनीच्या पॉवरबँकचा तुम्ही विचार करू शकता.
संगणक तुमच्या खिशात
सुरुवातीला लॅपटॉपने नंतर खिशातल्या टॅबलेटने आणि आता तर मोबाइलने संगणक बाजार पुरता गिळंकृत केला आहे. पण छोटय़ा स्क्रीनवर काम करण्यापेक्षा मोठय़ा स्क्रीनवर काम करण्याचा नवा प्रवाह पुन्हा दिसू लागला आहे. ही काळाची गरज लक्षात घेऊन आयबॉल, एसर, इंटेल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी एकमेकांच्या सहकार्याने खिशातल्या संगणक स्टिकची निर्मिती केली. यामध्ये एक डोंगल देण्यात आले आहे जे आपल्या संगणकाचा सीपीयू म्हणून काम पाहणार आहे. साधारण वर्षभरापूर्वी इंटेलने संगणक स्टीक बाजारात आणली आणि संगणक आपल्या खिशात नेऊन ठेवला. याच पावलावर पाऊल टाकत अनेक कंपन्यांनी एकत्र येऊन एक संगणक स्टिक बाजारात आणली आहे. हे उपकरण आपल्या टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडले की आपल्या टीव्हीचे संगणकात रूपांतर होते. इंटेलची स्टिक ही भारतीय वापरकर्त्यांची मानसिकता लक्षात ठेवून बनविण्यात आली नसून ती एक प्रयोग म्हणून बनविण्यात आली होती. पण कालांतराने अनेक कंपन्यांनी या उत्पादनात उडी घेत वापरकर्त्यांना उपयुक्त अशा स्टिक्स बाजारात आणल्या. या स्टिकचा आकार पेन ड्राइव्हपेक्षा थोडा मोठा असतो. याच्याबरोबर आपल्याला की-बोर्ड आणि माऊसही दिला जातो. याची किंमत साधरणत: पाच हजार ते नऊ हजारांपर्यंत आहे.
व्हीआर हेडसेट
झपाटय़ाने बदलत असलेल्या तंत्रविश्वात चालू वर्ष आभासी वास्तवाचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचा प्रत्यय आपल्याला तंत्रज्ञानक्षेत्रात सध्या घडत असलेल्या घडामोडींवरून येतच आहे. आभासी वास्तवाला महत्त्व देत अनेक उत्पादने बाजारात आली आहेत. यामध्ये गेम्सचा विशेष भरणा आहे. नेत्रदीपक असे हे सर्व गेम्स अनुभवण्यासाठी आपल्याला एक चष्मा परिधान करावा लागतो. त्याच्या मदतीने आपण आभासी विश्वात पोहोचतो. अर्थात या उपकरणाला तंत्रज्ञानाच्या भाषेत व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट असे म्हणातात. सध्या बाजारात अशा विविध हेडसेट्सनी गर्दी केली आहे. तसेच याला चांगली मागणीही आहे. हा हेडसेट वापरण्यासाठी आपल्याला आपल्या फोनमध्ये गुगल कार्डबोर्ड हे अॅप डाऊनलोड करावे लागते. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर क्यूआर कोडच्या माध्यमातून आपण हेडसेट आणि आपला फोन जोडू शकतो. कार्डबोर्ड या अॅपमध्ये व्हीआरवर आधारित अॅप्स आणि गेम्स देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये थ्रीडी गेम्सचे कलेक्शन्स आहेत. यामुळे आपल्याला आभासी जगातील नावीन्यपूर्ण गोष्टी उपलब्ध होतात. बाजारात झेब्रॉनिक्स, पीट्रोन, अॅग्नुस, आयरुस प्ले, डोमो एनहान्स या कंपन्यांनी हे हेडफोन्स बाजारात आणले आहेत. याची किंमत १२०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत आहे.
नीरज पंडित @nirajcpandit
Niraj.pandit@expressindia.com