अँटिव्हायरस ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची नितांत गरज आहे. पण बाजारात असंख्य पर्याय उपलब्ध असताना आपल्या गरजेनुसार अँटिव्हायरस निवडणं कठीण जातं. अनेक बडय़ा ब्रॅण्ड्सची नावं आपण ऐकून असतो. त्यांचं कामकाजसुद्धा उत्तमरीत्या सुरू असतं. मात्र प्रत्येक सॉफ्टवेअरचे गुणदोष असतातच. त्यामुळे ते ओळखून, नीट परखून, तपासून अँटिव्हायरस सॉफ्टवेअरची निवड करणं महत्त्वाचं ठरतं. कारण शेवटी प्रश्न सुरक्षेचा असतो. महत्त्वाचा डेटा पाहता सुरक्षेशी तडजोड करणं फारच महागात पडू शकतो. म्हणूनच अँटिव्हायरसची निवड करताना खालील तीन पद्धतींचा अवलंब केला तर त्याचे परिणाम निश्चितच चांगले होतील.
१) युजर्सचं मत
२) तज्ज्ञांचे रिव्हय़ू
३) सॉफ्टवेअरचं टेस्टिंग
युजर्सचं मत – अँटिव्हायरसच नाही खरं तर कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी युजर्सचं मत जाणून घेणं गरजेचं असतं. कारण आपल्याआधी कुणी ना कुणी तरी ते प्रॉडक्ट, ती वस्तू, सॉफ्टवेअर वापरलेलं असतं. त्यामुळे त्यांचं त्या सॉफ्टवेअरबद्दलचं मत कळलं की साधारण कल्पना येते.
अर्थात युजर्सच्या प्रतिक्रिया निष्पक्ष असतील किंवा एखाद्या विशिष्ट सॉफ्टवेअरचंच गुणगान गाणाऱ्या नसतील याची खातरजमा करून घ्यायची. इंटरनेटवर असे अनेक सिक्युरिटी फोरम्स आहेत जिथे अँटिव्हायरस, फायरवॉल, इंटरनेट सिक्युरिटी वगैरे विषयांवर चर्चा होत असतात. जगभरातले युजर्स आपले अनुभव आणि सल्ले तिथे शेअर करत असतात. या फोरम्समधून एखादी चक्कर टाकली की आपल्याला सॉफ्टवेअर्सबद्दलचे गुणदोष कळू शकतात. (अनेकदा अनेक मतं वाचून गोंधळायलाही होतं. पण अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्सच्या बाबत सखोल चौकशी केलेली असणं महत्त्वाचं.) नेटवर असे अनेक ग्रुप्स आहेत जिथे या चर्चा वाचता येऊ शकतात. विंडोज सिक्रेट्स, वाइल्डर्स सिक्युरिटी फोरम्स, सायबरपॉवर फोरम, ब्लीपिंग कॉम्प्युटरसारख्या ग्रुप्समध्ये चांगले तसंच वाईट अनुभव शेअर केलेले असतात. याशिवाय क्वोरा, याहू आन्सर्स, ट्रस्टपायलटसारखे फोरम्ससुद्धा आहेत जिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. क्वोरावर तर कॉम्प्युटर सिक्युरिटी, अँटिव्हायरस सॉफ्टवेअर, इंटरनेट सिक्युरिटी वगैरे टाकलं की या विषयावर आधी झालेली प्रश्नोत्तर सहज सापडतील.
तज्ज्ञांचे रिव्हय़ू- इंटरनेटवर पीसी मॅगझिन, गिझमोज फ्रीवेअर, सॉफ्टपीडिया, पीसी अॅडव्हायजरसारखे पोर्टल्स उपलब्ध आहेत. यामध्ये अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्सचे डिटेल्स तुम्हाला मिळू शकतात. तसंच प्रत्येक सॉफ्टवेअरचं परीक्षणसुद्धा लिहिलेलं असतं. या सॉफ्टवेअर्सची ऑनलाइन तुलना करायची सुविधाही या पोर्टल्सवर दिलेल्या असतात. यापैकी काही पोर्टल्सवर ट्रायल व्हर्जन्सही उपलब्ध असतात. एक महिना ट्रायल घेऊन त्यानंतर फुल व्हर्जन विकत घेता येऊ शकतं.
गिझमो फ्रीवेअरसारख्या पोर्टल्सवर फ्री अँटिव्हायरसची इत्थंभूत माहिती दिलेली असते. कुठची सॉफ्टवेअर्स फ्री आहेत आणि त्यांचे गुणदोष याबाबत सविस्तर माहिती इथे वाचता येऊ शकते. अर्थात पैसे भरून चांगलं अँटिव्हायरस विकत घेणं कधीही उत्तम.
सॉफ्टवेअर टेस्टिंग – आयटीमध्ये कार्यरत असणाऱ्या काही फम्र्सनी स्वत:च्या टेस्टिंग लॅब्स काढल्या आहेत. व्हायरस बुलेटिन, डेनिस टेक्नॉलॉजी लॅब्स, एव्ही टेस्ट अशा काही लॅब्स या अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्सच्या टेस्ट्स घेत असतात. आणि या टेस्टिंगचे रिझल्ट्स आपल्या वेबसाइट्सवर प्रसिद्ध करीत असतात. यापैकी एव्ही टेस्ट ही वेबसाइट अगदी खोलात जाऊन रिझल्ट प्रसिद्ध करते. ह्यमध्ये ब्रॅण्ड्सच्या नावांनुसार, ऑपरेटिंग सिस्टमनुसार टेस्ट रिझल्ट तपासायची सोय आहे. रिझल्ट रिपोर्ट्सवरून नजर फिरवली की त्यातले बारकावे नीट समजू शकतात. एक गोष्ट मात्र खरी आणि ती म्हणजे जगातलं सगळ्यात उत्तम अँटिव्हायरस सॉफ्टवेअर हा एक भ्रम आहे. असं काही अस्तित्वात नाही. कारण प्रत्येक अँटिव्हायरस सॉफ्टवेअरमध्ये काही ना काही दोष असतातच. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये जसे गुणदोष असतात तसंच आहे हे. या महिन्यात एखादा रँकिंगमध्ये अव्वल असेल तर पुढल्या महिन्यात दुसराच असू शकतो. त्यामुळे सॉफ्टवेअरच्या परफॉर्मन्सवर निर्णय घ्या.
टेक अस्सं कस्सं? : अँटिव्हायरस निवडताना..
गिझमो फ्रीवेअरसारख्या पोर्टल्सवर फ्री अँटिव्हायरसची इत्थंभूत माहिती दिलेली असते.
Written by पुष्कर सामंत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-05-2016 at 02:33 IST
मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips for choosing the best anti virus software