सर्वसामान्यत: घरांमध्ये जुन्या झालेल्या वस्तू, सामान काढून टाकलं जातं. म्हणजे मोडकळीस आलेल्या, वापरात नसलेल्या वस्तूंना घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो. काही वस्तूंशी भावऊनक नातं जोडलेलं असतं. मग अशा वस्तू काढून टाकणं फारच त्रासदायक ठरतं. कारण कितीही म्हटलं तरी त्याही अडगळच ठरत असतात. शेवटी मग त्यांचीही गच्छंती होते. जी गत घरातल्या वस्तूंची तशीच काहीशी कॉम्प्युटरमधल्या सॉफ्टवेअर्स आणि प्रोग्राम्सची.
ऑपरेटिंग सिस्टीम कुठलीही असो, काही प्रोग्राम्स किंवा सॉफ्टवेअर्स हे कालांतराने नकोसे होतात. ते प्रोग्राम्स विनाकारण कॉम्प्युटरमधली जागा व्यापून असतात. असे प्रोग्राम्स काहीवेळा सरळ मार्गाने डीलीट किंवा अनइन्स्टॉल होत नाहीत. त्यासाठी जरा आडवाटेने जावं लागतं. अॅपलची मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर सर्वसामान्यत: अनइन्स्टॉल करताना फारशी अडचण येत नाही. कारण मॅकबुकवर इन्स्टॉल होणारे सॉफ्टवेअर्स किंवा प्रोग्राम्स हे अॅप्लिकेशन्सप्रमाणे असतात. खरी अडचण येते ती विण्डोजची ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्या यूजर्सना. संपूर्ण प्रोग्राम अनइन्स्टॉल झाला तरी अनेकदा त्याचा छोटासा भाग कॉम्प्युटरमध्ये राहतोच. तर अशा वेळी नेमकं काय करायचं.
कंट्रोल पॅनेल
ही पारंपरिक पद्धत आहे. एखादं सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम डीलीट करायचा असेल तर विण्डोज कॉम्प्युटर्समध्ये कंट्रोल पॅनेल नावाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर उजवीकडे कंट्रोल पॅनेलचा ऑप्शन दाखवला जातो किंवा फाइंड फाइल्स अॅण्ड फोल्डर्सचा वापर करूनही कंट्रोल पॅनेल सुरू करता येऊ शकतं. हे पॅनेल सुरू झाल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर्समधील सगळे प्रोग्राम्स आणि सॉफ्टवेअर्स दिसतात. त्यामधील नको असलेला प्रोग्राम सिलेक्ट करून तो अनइन्स्टॉल करता येतो.
अॅप्स मॅनेजर
विण्डोजच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टीम्स ह्य़ा अॅपल ओएससारख्या आहेत. त्यामुळे प्रोग्राम्सप्रमाणेच अॅप्सही आता कॉम्प्युटर्सवर वापरली जातात. अशा वेळी नको असणारी अॅप्स डीलीट किंवा अनइन्स्टॉल करण्यासाठी कधी सोपी तर कधी जरा गुंतागुंतीची प्रक्रिया करावी लागते. गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणजे अॅपएक्स पॅकेजसारखा प्रोग्राम इन्स्टॉल करायचा. हा प्रोग्राम तुमच्या कॉम्प्युटर्समधली अॅप्स मॅनेज करतो. कुठलं अॅप कितीवेळा वापरलं गेलं, ते वापरताना काय अडचणी आल्या, त्या अॅपची सुरक्षा वगैरे नोंदी हे अॅप करून ठेवत असतं. सिस्टीममध्ये अॅप्स इन्स्टॉल किंवा अनइन्स्टॉल करण्यासाठी हेच अॅप प्रामुख्याने वापरलं जातं. पण अनइन्स्टॉल करण्याची प्रक्रिया जरा कठीण आहे. कठीण म्हणजे अॅप काढून टाकण्यासाठी कमांड टाइप करावी लागते आणि ती कमांड प्रत्येकवेळी लक्षात ठेवावी लागते. मुळात अॅपएक्स पॅकेज हे अनेक अॅप्स पुरवणारं एक पॅकेज असतं. त्यामुळे एक एक अॅप काढून टाकताना ppxPackage *3dbuilder*| Remove-AppxPackage अशी कमांड द्यावी लागते. थ्रीडी बिल्डर हे एक प्रकारचं अॅप आहे. प्रत्येक वेळी अॅप डीलीट करताना त्या अॅपचं नाव लिहून कमांड लिहावी लागते.
टेनअॅप्स मॅनेजर नावाचाही एक प्रोग्राम आहे. सिस्टीममध्ये आधीपासून इन्स्टॉल केलेली अॅप्स या प्रोग्रामच्या मदतीने डीलीट करता येतात. जमेची बाजू म्हणजे अनइन्स्टॉल किंवा डीलीट करताना कुठल्याही प्रकारची अधिकची कमांड लिहावी लागत नाही. निव्वळ माऊसचा वापर करून अॅप किंवा प्रोग्राम रिसायकल बिनमध्ये टाकता येतो.
सिस्टीम रिस्टोअर
विण्डोज ऑपरेटिंग सिस्टीमची ही एक जमेची बाजू आहे. टाइम ट्रॅव्हेल ज्याला म्हणता येईल अशीच काहीशी ही सुविधा बिल गेट्सने पुरवली आहे. उलटून गेलेल्या एका ठरावीक तारखेला कॉम्प्युटरचं सेटिंग नेऊन ठेवणं शक्य होतं. म्हणजे उदाहरणार्थ एक वर्षांपूर्वीसाठी सिस्टीम रिस्टोअर केली तर एक वर्षांपूर्वी कॉम्प्युटर जसा होता, ज्या फाइल्स, प्रोग्राम्स होते ते दिसू लागतात. त्यानंतर इन्स्टॉल केलेलं काहीही दिसत नाही. हे म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्मृती काही वर्ष मागे नेल्यासारखं आहे. अर्थात हा मार्ग सतत वापरणं योग्य नाही. पण अगदी अडचणीच्या काळात सिस्टीम रिस्टोअर हा हुकमी एक्का आहे. व्हायरस किंवा प्रोग्राम अनइन्स्टॉल होत नसेल तर हा उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतो.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com