छायाचित्रण, चित्रीकरण यांचं आकर्षण आजही कायम आहे. हातात डीएसएलआर कॅमेरा घेऊन रस्ते-वाटा तुडवणारे उत्साही कलाकार डोंगरमाथ्यांपासून ते घनदाट जंगलांपर्यंत कुठेही दिसतात. वेगवेगळ्या अँगलने, एक्स्पोजर, शटरस्पीडचा खेळ करीत फोटा काढणारे हे कलाकार कॅमेरांच्या दुनियेतल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. अर्थात आजकाल जो उठतो, तो गळ्यात डीएसएलआर लटकवून स्वत:ला निष्णात फोटोग्राफर समजतो हा भाग निराळा. पण ज्यांना खरोखरच या क्षेत्राची जाण आहे आणि या क्षेत्रात काही तरी हटके करण्याची आवड आहे, अशी मंडळी सतत काही ना काही तरी करीत असतात, नवीन मार्ग शोधत असतात. ड्रोन कॅमेरा हा याच हटके वाटेवरचा लोकप्रिय झालेला गडी.
वायरलेस रिमोट कंट्रोलचा वापर करीत भोवऱ्याप्रमाणे आकाशात भिरभिरणारा हा कॅमेरा लग्नापासून ते सिनेमापर्यंत सगळ्या सत्कार समारंभांमध्ये हमखास वापरला जातो. त्यातून टिपल्या जाणाऱ्या व्हिडीओचा दर्जाही चांगला असतो. एखाद्या दृश्याचं जरा उंचीवरून छायाचित्रण किंवा चलत्चित्रण करायचं असेल तर ड्रोनचा वापर केला जातो. फारपूर्वी क्रेनचा वापर करून अशा प्रकारची दृश्यं चित्रित केली जायची. बजेट असेल तर मग हेलिकॉप्टरचाही वापर केला जायचा. पण हेलिकॉप्टर हे एका ठरावीक उंचीवरून उडवायची मर्यादा असल्याने चित्रीकरणात अडचणी येतात. आत्ताच्या घडीला मात्र हय़ा सर्वाची जागा ड्रोन कॅमेराने घेतलीये.
ड्रोन म्हणजे पायलटविरहित छोटेखानी विमान. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हे विमान उडवलं जातं. मुळात ड्रोन्सचा वापर हा लष्करी मोहिमांसाठी केला जायचा. म्हणजे तसा तो अजूनही होतो. गेल्या दशकात झालेल्या अफगाणिस्तान युद्धादरम्यान अमेरिकन सैन्याने या ड्रोन्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला होता. या ड्रोन्सनाच मग व्यावसायिक स्वरूप देत त्याचा वापर नागरी क्षेत्रामध्ये होऊ लागला. आणि सध्याच्या घडीला ड्रोन कॅमेरा हे याचं सर्वात लोकप्रिय असं व्हर्जन आहे.
ड्रोन कॅमेराविषयी, तसंच त्याचा वापर कसा करावा याची माहिती जाणून घेण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. आणि ती म्हणजे ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी स्थानिक कायद्यांविषयी जाणून घ्या. कारण ड्रोन उडवण्याच्या उंचीवर अनेक ठिकाणी मर्यादा आहेत. डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच नागरी उड्डाण संचालनालयाने याबाबत नियमावली तयार केलेली आहे. तरीही किती उंचीवरून ड्रोन उडवता येऊ शकतं याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे ड्रोनचा वापर करण्याआधी स्थानिक पोलीस स्थानकामध्ये जाऊन परवानगी घेणं हितकारक आहे.
एकदा स्थानिक कायद्याचं पालन केलं की मग ड्रोनचा वापर करण्यात कुठलाच धोका नाही. या ड्रोन कॅमेराच्या किमतीही जरा चढय़ाच असतात. त्यामुळे ते विकत घेण्याआधी विचार करा. हौसेखातर किंवा मित्राकडे आहे म्हणून आपल्याकडेही असावा या कारणास्तव घेण्यात काहीही अर्थ नाही. एकदा घेण्यामागच्या कारणाची निश्चिती झाल्यानंतर मॉडेल्सची चाचपणी करावी. ड्रोन विकत घेताना दोन गोष्टी लक्षात घ्याव्यात. एक म्हणजे बिल्टइन कॅमेरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिमोट कंट्रोल. बहुतांश ड्रोन्समध्ये बिल्टइन कॅमेरा असतो. मात्र तसा नसेल तर मात्र वेगळा कॅमेरा विकत घ्यावा लागतो. शक्यतो बिल्टइन कॅमेरा असणारे ड्रोन विकत घ्यावेत.
या ड्रोन कॅमेरांमध्ये अनेक ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. स्पार्क, मॅव्हिक प्रो, फॅण्टम ४ प्रो, ऑटेल रोबोटिक ड्रोन्स, पॅरट एआर २.०, हुब्सॅन एक्स४ असे एकापेक्षा एक नावाजलेले ब्रॅण्ड्स ड्रोन कॅमेरे बनवतात. ३ हजार रुपयांपासून ते अगदी पार तीस-चाळीस हजारांपर्यंत या ड्रोन कॅमेरांच्या किमती जातात. त्यामुळेच हे कॅमेरे म्हणजे एक प्रकारे पांढरे हत्ती आहेत. त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि नाजूकपणे करावा लागतो. ड्रोन कॅमेरांचं उड्डाण जितकं वेगवान आणि उंच आहे तितकीच याविषयाची माहितीही व्यापक आहे. कुठलं ड्रोन घ्यावं, ते कसं उडवावं, ते उडवताना काय काळजी घ्यावी, वॉरंटी कशी बघावी, कॅमेरा कसा हाताळावा वगैरे एक ना अनेक गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागतो. या ड्रोनरूपी पांढऱ्या हत्तीचा उपयोग कसा करावा याविषयी आपण पुढल्या भागात अधिक सखोलपणे जाणून घेऊ या.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com