मल्टिटास्किंग आणि भाराभर चिंध्या यांच्यात एक पुसटशी लाइन असते. माणसाचा मेंदू हा म्हणे एका वेळी अनेक गोष्टी हाताळू शकतो. म्हणजे एकाच वेळी अनेक विचार डोक्यात सुरू असतात. पण कृती मात्र एका वेळी एकच होऊ शकते. अर्थात काही तल्लख मेंदूचे लोक एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. पण तो अपवादाचा भाग झाला. डोक्यात अनेक गोष्टी सुरू झाल्या की मग डोकं भणभणायला लागतं. काहीच सुचत नाही. अगदी शून्य झाल्यासारखं वाटतं. जी गत मेंदूची तीच गत मशीनची.

ज्याप्रमाणे मेंदू कधी कधी गंडतो त्याचप्रमाणे स्मार्टफोन्सही अनेकदा हँग होतात. आणि हा अनुभव बहुतांश कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या बाबतीत येतो. काही काम करीत असताना फोन हँग होणं, मग तो गरम होणं किंवा अनेकदा आपोआप मध्येच रिस्टार्ट होणं असे प्रकार बरेचदा घडतात. चांगल्या कंपनीचा असला तरी हँग होणं ही बाब फारच कॉमन आहे. पण हे नेमकं होतं तरी कशामुळे?

एकदा कारणं कळली की मग नेमकं काय करायचं हे जरा स्पष्ट होतं.

  • नेहमी अ‍ॅप इन्स्टॉल करताना ती एक्स्टर्नल मेमरीमध्ये करा. जेणेकरून जेव्हा अ‍ॅप्स रन होतील तेव्हा टेम्पररी डेटा स्टोअर होण्यासाठी इन्टर्नल मेमरी मोकळी राहील. याचा आणखी एक फायदा असा तो म्हणजे इन्टर्नल मेमरी मोकळी राहिल्याने एकापेक्षा अधिक अ‍ॅप्स सहज सुरू राहतील.
  • विनाकारण इन्स्टॉल केलेली निरुपयोगी अ‍ॅप्स डिलिट करणं हा सगळ्यात उत्तम पर्याय. फोन हँग झाल्यानंतर रिस्टार्ट झाला की सर्वात आधी निरुपयोगी, फार कमी वेळा वापरली जाणारी अ‍ॅप्स ओळखून त्यांना सरळ बाहेरचा मार्ग दाखवायचा.
  • या सगळ्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅकग्राउंडमध्ये सुरू असणाऱ्या प्रोसेसेस बंद करणं. या प्रोसेसेस विनाकारण फोनची मेमरी वापरतात. बॅटरी खर्च होते हे दुसरं कारणही आहेच. अँड्रॉइड फोन्समध्ये इनबिल्ट टास्क मॅनेजर असतो. समजा तो वापरायचा नसेल तर अ‍ॅडव्हान्स्ड टास्क किलर किंवा इझी टास्क किलरसारखी अ‍ॅप्स हे काम नक्की करू शकतील.
  • कुकीज, कॅशे फाइल्स डिलिट करण्याचा पर्याय नेहमी सांगितला जातो. याशिवाय इन्टर्नल मेमरीमधला डेटा वेळोवेळी मेमरी कार्डमध्ये घ्यावा किंवा क्लाउड बॅकअपचा पर्याय वापरावा. जेणेकरून फोनची इन्टर्नल मेमरी मोकळी राहील.

हँग होण्याबरोबरच अनेकदा फोन आपोआप रिस्टार्ट होतो. एखादं अ‍ॅप्लिकेशन सुरू करताना ते सुरू होण्याऐवजी फोनच बंद होऊन सुरू होतो. हे कसं झालं ते कळायला मार्ग नसतो. याचं कारण असतं ते म्हणजे बॅकग्राउंड अ‍ॅप्स. फोन स्टँडबाय मोडवर असला तरी काही अ‍ॅप्स ही अविरत सुरूच असतात. बॅकअप घेणं, अपडेट होणं, पॅच फाइल्स डाउनलोड होणं वगैरे प्रकार सुरू असतात. त्याशिवाय असं रिस्टार्ट होण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण असतं आणि ते म्हणजे अ‍ॅप्सची क्वालिटी. स्मार्टफोन्समध्ये इन्स्टॉल करण्यात येणाऱ्या अ‍ॅप्सच्या खराब क्वालिटीमुळे फोनवर परिणाम होत असतो.

ज्याप्रमाणे मेंदूवर एका वेळी अनेक कामांचा ताण पडला की तो जसा हँग होतो आणि त्याचा जसा इतर गोष्टींवर परिणाम होतो, तसाच प्रकार आहे हा. शेवटी मेंदू काय किंवा मशीन काय, एक्सपायरी डेटपर्यंत उत्तमरीत्या कार्यरत ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणं महत्त्वाचंच आहे.

स्मार्टफोन्स हँग होण्यामागे काही कारणं आहेत-

  • एकाच वेळी एकापेक्षा अनेक अ‍ॅप्स चालू असतील तर फोन हँग होऊ शकतो.
  • एक्स्टर्नल मेमरीऐवजी फोन मेमरीमध्ये अ‍ॅप्स इन्स्टॉल होत असतील तर.
  • इन्टर्नल मेमरी तसेच रॅम जर का नेहमी भरलेली असेल तर.
  • मेमरी कार्ड किंवा एक्स्टर्नल मेमरी फुल असेल तर.
  • फोन जेव्हा स्टँडबाय मोडवर असतो तेव्हा वापरल्या जाणाऱ्या थीम्सची साइज जर का जास्त असेल तर.
  • कुकीज, कॅशे मेमरी, लॉग फाइल्स वेळोवेळी डिलिट केल्या नसतील तर.
  • फोनमध्ये खूप सारी अ‍ॅप्स असतील तर.
  • फोनच्या रॅम, प्रोसेसरच्या क्षमतेपेक्षा मोठय़ा फाइल्स चालवणं.

 

फोन रिस्टार्ट होण्यामागची काही कारणं

  • अ‍ॅप्सची खराब क्वालिटी
  • सिस्टीम अ‍ॅप्स डिसेबल केली असतील तर अनेकदा अडचणी येतात. विशेषकरून अँड्रॉइड फोन्सच्या बाबतीत हे अनेकदा होतं. सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप्लिकेशन्समध्ये गेलं असता येणारी यादी एकदा तपासून पाहा. जी अ‍ॅप्स ऑफ किंवा डिसेबल केली असतील तर ती अनेबल करा. अ‍ॅप लाँचसाठी तसंच सिस्टम लाँचसाठी या सिस्टम अ‍ॅप्सची गरज असते.
  • फोन गरम होणं हा प्रकार तर बराच कॉमन आहे. थ्रीजी-फोरजीचा वापर, जीपीएसचा वापर, जास्तीचा ब्राइटनेस यामुळे ओव्हरहीट होऊन फोन आपोआप बंद होतो किंवा रिस्टार्ट होतो.
  • फोन आपोआप रिस्टार्ट होण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर्स करप्ट होणं. हा प्रॉब्लेमसुद्धा बहुतांशी अँड्रॉइड फोनमध्ये येतो. अशा वेळी मोबाइलमधील (इंटर्नल मेमरीवरच्या) डेटाचा बॅकअप घेऊन फोन रिसेट करणं हा पर्याय उत्तम.

 

– पुष्कर सामंत

ushkar.samant@gmail.com

Story img Loader