वापरकर्त्यांना ‘व्हच्र्युअल’ अर्थात आभासी विश्वात घेऊन जाणाऱ्या ‘व्हीआर हेडसेट’ची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अलीकडे सॅमसंगसारख्या कंपनीने भारतात आपल्या स्मार्टफोनसोबत असे हेडसेट पुरवण्यास सुरुवातही केली आहे. डोळय़ांवर चढवलेल्या या हेडसेटच्या माध्यमातून आपल्या मोबाइलवरून सिनेमा पाहताना किंवा गेम खेळताना वापरकर्त्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी वावरल्याचा अनुभव मिळणार आहे. मात्र, डोळ्यांच्या इतक्या जवळ मोबाइल ठेवून समोरील दृश्य पाहण्यामुळे डोळय़ांवर किंवा मेंदूंवर विपरीत परिणाम होणार नाही ना, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
सॅमसंग कंपनीने अलीकडेच आपल्या ‘एस ६’ या फ्लॅगशिप स्मार्टफोनला जोडता येणारा ‘व्हीआर गिअर’ भारतीय बाजारात दाखल केला आहे. तर त्याआधीच लेनोव्हो कंपनीने ‘के४ नोट’ या मध्यम किंमत श्रेणीतील स्मार्टफोनसोबत ‘व्हीआर हेडसेट’ देऊ केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या जाहिरातींनंतर सर्वसामान्यांत ‘व्हीआर हेडसेट’बद्दल चर्चा जोरात सुरू झाली आहे. या गॅझेटच्या समोरील भागात स्मार्टफोन बसवून ते डोळय़ांवर चढवल्यानंतर मोबाइलवर सिनेमा पाहतानाही थिएटरमध्ये बसण्याचा आनंद मिळेल किंवा गेम खेळताना त्या आभासी जगात गेल्यासारखा भास होईल, असे दावे केले जात आहेत. मात्र एकीकडे आपल्याकडे जवळून टीव्ही पाहू नये, मोबाइलच्या स्क्रीनवर जास्त वेळ डोळे लावून बसू नये अशा आरोग्यासाठी हितकारक अशा सूचना केल्या जात असताना थेट डोळ्यांपासून काही सेंटिमीटर अंतरावर मोबाइल ठेवून घेण्याचा हा दृश्यानुभव आरोग्याला अपायकारक तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
‘व्हच्र्युअल रिअॅलिटी’ अर्थात आभासी वास्तवाचा अनुभव देणाऱ्या ‘व्हीआर’ हेडसेटबद्दलचे कुतूहल गेल्या वर्षभरापासून प्रचंड वाढू लागले आहे. विशेषत: गेमिंगसाठी असे हेडसेट वापरल्याने प्रत्यक्ष गेममध्ये उतरल्याचा अनुभव मिळत असल्याने तरुणवर्गात आणि लहान मुलांत त्याची ओढ आहे. परंतु, अलीकडेच अमेरिकेतील ‘मॅजिक लीप’ या ‘व्हर्च्यूअल इमॅजिनरी’ उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉनी अबोविझ यांनी ‘व्हीआर गॉगल्स’ मानवी मेंदूला घातक असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली. काही विशिष्ट प्रकारच्या ‘व्हीआर हेडसेट’मुळे उत्पन्न होणाऱ्या लहरी मानवी मेंदूवर तात्पुरता किंवा कायमस्वरूपी परिणाम करू शकतात, असा दावा अबोविझ यांनी केला. अबोविझ यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे वैद्यकीय दृष्टय़ा अद्याप सिद्ध व्हायचं आहे. मात्र, सॅमसंगच्या ‘गीअर व्हीआर’सोबत कंपनीनेच त्याच्या दुष्परिणामांची यादी दिली आहे. डोळ्यांना ताण, पोटात मळमळ होणे किंवा नजर सैरभैर होणे अशी लक्षणे जाणवू लागल्यास ‘गीअर व्हीआर’चा वापर थांबवा, अशी सावधगिरीची सूचना कंपनीने केली आहे. तसेच या ‘गीअर’चा फार वेळ वापर केल्यास दृष्टी आणि हातांच्या हालचालींत असमन्वय निर्माण होण्यासारखा त्रास जाणवू शकतो, असे कंपनीने या उत्पादनासोबत देण्यात येणाऱ्या सूचनांमध्ये म्हटले आहे. १३ वर्षांखालील मुलांना हे हेडसेट वापरण्यास देऊ नये, असेही सॅमसंगने म्हटले आहे. याखेरीज चालत्या गाडीत ‘गीअर व्हीआर’ वापरू नका, असा सल्लाही कंपनीने दिला आहे.
अर्थात या साऱ्या सूचना कंपनीच्या ‘डिस्क्लेमर’मध्ये सूक्ष्म अक्षरांत छापण्यात येत असल्याने वापरकर्त्यांचे त्याकडे कधीच लक्ष जात नाही किंवा त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये व्हर्चूअल रियालिटी हेडसेटचा वापर वाढत चालला आहे. केवळ मनोरंजनच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रापासून लष्करापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर या तंत्रज्ञानाच्या अति वापराचा मेंदूवर होणारा परिणाम दुर्लक्षून चालणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. आपण प्रत्यक्ष जगात वावरत असतो तेव्हा आपल्याला विविध इंद्रियांकडून सूचना मिळत असतात. ही सर्व इंद्रिये मेंदूशी आणि एकमेकांशीदेखील समन्वय साधून असतात. याउलट ‘व्हच्र्युअल’ तंत्रज्ञानामध्ये असा समन्वय जुळूनच येईल, असे नाही. त्यामुळे ‘व्हच्र्युअल’चे विश्व अपूर्ण आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा १३ वर्षांखालील लहान मुलांच्या मेंदूवर जास्त विपरीत परिणाम होऊ शकतो, हे साऱ्यांनाच मान्य आहे. लहान मुलांच्या मेंदू जडणघडणीच्या अवस्थेत असतो. त्यांची दृष्टीही विकसनशील अवस्थेत असते. अशा वेळी या उपकरणांच्या जास्त वापरामुळे त्यांच्या दृष्टीसातत्याला फटका बसू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, सध्याच्या तंत्रयुगात अगदी लहान वयापासून मुलांच्या हाती तंत्र उपकरणे सहज खेळू लागतात. अशा वेळी गेमिंगच्या हेतूने घडवण्यात आलेल्या ‘व्हीआर’ उपकरणांपासून मुले दूर राहू शकतील का, हा खरा प्रश्न आहे.
आसिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com