इंटरनेट हे खऱ्या अर्थाने एक मायाजाल आहे. इंटरनेटचा विस्तार झाला तशा वेबसाइट्सही भराभर वाढत गेल्या. आत्ताच्या घडीला कोटय़वधी वेबसाइट्स अस्तित्वात आहेत आणि त्या वेबसाइट्सवर तितकीच भरमसाट माहितीही. ही माहिती एका क्लिकवर आपल्या स्क्रीनवर येते. गुगलचा जन्म झाल्यानंतर एखाद्या विषयाची माहिती शोधण्यासाठीचं तेच एक लोकप्रिय सर्च इंजिन बनलं. एकदा का सर्चसाठीचा शब्द टाइप केला की त्यानंतर सर्च रिझल्टमध्ये ढीगभर साइट्स दिसू लागतात. त्यातून हव्या असणाऱ्या वेबसाइटच्या लिंकवर क्लिक केलं की मग माहिती वाचणं एवढंच काम उरतं.
ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे अशीच असते. पण कधी कधी वेबसाइटच्या लिंकवर क्लिक केलं की काही तरी अनपेक्षित होतं. सव्र्हर नॉट फाऊंड किंवा तत्सम एर्स स्क्रीनवर दिसतात. हे असं होण्यामागचं नेमकं कारण काय, या एर्स कसल्या असतात, सव्र्हर नॉट फाऊंड म्हणजे काय, असे प्रश्न पटकन मनात येऊन जातात. अनेकदा त्याची शहानिशा न करता आपण दुसऱ्या वेबसाइटकडे वळतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे वेबसाइट्स या एका सव्र्हरवर होस्ट केलेल्या असतात. सव्र्हर म्हणजे एक विशेष प्रकारचा कॉम्प्युटर असतो ज्याला इंटरनेट कनेक्शन असतं. जेव्हा वेबसाइटवर आपण क्लिक करतो तेव्हा आपला कॉम्प्युटर आणि सव्र्हर यांच्यात कम्युनिकेशन सुरू होतं. अर्थात हे सगळं इंटरनेटमुळेच शक्य होतं. आपण ज्या वेबपेजवर क्लिक करतो ते पेज सव्र्हरकडून आपल्या कॉम्प्युटरला पाठवलं जातं आणि आपला कॉम्प्युटर ते आपल्या स्क्रीनवर दाखवतो.
सामान्यत: वेबसाइट क्रॅश होण्यामागे दोन महत्त्वाची कारणं असतात. एक म्हणजे ट्रॅफिक. रस्त्यावर गाडय़ा वाढल्या की ट्रॅफिक जॅम होतं आणि मग आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी उशीर होतो. अगदी तसाच प्रकार वेबसाइटच्या बाबतीत होतो. एकाच वेळी अनेक जण जर का एकाच वेबपेजची रिक्वेस्ट पाठवत असतील तर अडचण होते. सव्र्हरला त्या सगळ्या रिक्वेस्ट्सना उत्तर देणं अशक्य होऊन जातं. आणि मग टाइमआऊट अशी विण्डो आपल्या स्क्रीनवर झळकते. यालाच म्हणतात वेबसाइट क्रॅश होणं.
अनेकदा ऑनलाइन सेल असला की अनेक वेबसाइट्स क्रॅश होतात किंवा अत्यंत धिम्या गतीने काम करतात. ‘एरर 408’- रिक्वेस्ट टाइम आऊट, ‘एरर 504 ’- गेटवे टाइम आऊट, एरर 503 – आऊट ऑफ रिसोर्सेस अशा आशयाच्या लाइन्स आणि विण्डो जर का तुम्हाला कधी दिसल्या असतील तर समजा की आपण व्हिजिट करत असलेली वेबसाइट क्रॅश झालेली आहे. हे होतं कसं? आपल्या कॉम्प्युटरकडून सव्र्हरला रिक्वेस्ट तर जाते, पण सव्र्हर एकाच वेळी अनेकांच्या रिक्वेस्ट्सना रिस्पॉन्स देण्यात व्यस्त असल्यामुळे ते वेबपेज काही आपल्या स्क्रीनवर दिसत नाही. कधी कधी सव्र्हरचा डेटाबेस करप्ट होतो किंवा सव्र्हर मशीनची स्टोरेज डिस्क भरली असेल तर हवं असलेलं वेबपेज दिसत नाही.
दुसरं कारण हे पूर्णत: हार्डवेअरशी संबंधित आहे. सव्र्हर मशीन बंद पडलं, सव्र्हर रूममध्ये काही बिनसलं किंवा वीज गेली तर वेबसाइट पूर्णत: ठप्प होते. हे म्हणजे मानवी शरीराच्या हृदयाचे ठोके बंद होण्यासारखंच आहे. एरर 500 – सव्र्हर एरर, एरर 404 – नॉट फाऊंड असं स्क्रीनवर दिसलं की समजायचं सव्र्हरच्या हार्डवेअरमध्ये काही तरी प्रॉब्लेम झाला आहे.
एखाद्या सव्र्हरवर वेबसाइट होस्ट केलेली असते. जेव्हा ती क्रॅश होते तेव्हा त्या सव्र्हरवरून दुसरीकडे ती रिहोस्ट करणं हा एक उपाय असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालं तर ते दुसऱ्या रस्त्याने वळवणं आणि मुक्काम गाठणं. शेवटी मुक्काम गाठणं महत्त्वाचं असतं. अनेक मोठय़ा मोठय़ा वेबसाइट्समध्ये ही सुविधा असते. वाढत्या मागणीनुसार त्यांच्या सव्र्हरची साइज वाढत जाते. हे म्हणजे रस्त्यावरचं ट्रॅफिक वाढत गेलं की रस्ता आपोआप मोठा होण्यासारखं आहे. अर्थात त्यासाठी वेबसाइटला होस्टिंग कंपनीला ज्यादा पैसे द्यावे लागतात. आजच्या घडीला वेबसाइट २४ तास कार्यरत ठेवणं हे कुठल्याही कंपनीसाठी निकडीचं झालेलं आहे. त्यामुळेच सव्र्हर स्पेस आणि होस्टिंगसाठी ज्यादा पैसे मोजायला कुठलीही कंपनी तयार असते.
एकूणच वेबसाइट कशी काम करते आणि वेबपेजेस कशी बनतात हे रंजक आहे. वेब डेव्हलपमेंट करणारी अनेक मंडळी आजूबाजूला सहज सापडतील. पण स्वत:ची एखादी वेबसाइट तयार करणं फारच सोपं आहे. ती कशी करायची ते आपण बघू या पुढच्या लेखात.
pushkar.samant@gmail.com