आजकाल अनेक घरांमध्ये होम थिएटर सर्रास दिसू लागलंय. काही वर्षांपूर्वी नवा असणारा हा प्रकार आता बऱ्यापैकी रुळलाय असं म्हणायला हरकत नाही. मोठय़ा आकाराचा म्हणजे अगदी भिंतीभर पसरलेला मल्टिपर्पज टीव्ही, चार कोपऱ्यांमध्ये लावण्यासाठी स्पीकर्स, वूफर्स असा फौजफाटा असला की घरच्या घरी थिएटरचा अनुभव घेणं सहज शक्य. पण समजा असा भिंतीभर आकाराचा टीव्ही बजेटमध्ये बसत नसेल तर काय करणार? एक सोपा आणि किफायतशीर उपाय म्हणजे सरळ प्रोजेक्टर आणायचा आणि पांढऱ्या मोठय़ा पडद्यावर (अथवा थेट भिंतीवरच) सिनेमा, मॅचेस बघायच्या. वर्ल्डकपचा फिव्हर बघता सध्या सोसायटय़ांमध्ये, मैदानांमध्ये, हॉटेल्स-रेस्टॉरंट्समध्ये हे प्रोजेक्टर आणि स्क्रीन्स हमखास बघायला मिळतात.

खरं तर या प्रोजेक्टर्सचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. त्यामुळे आपल्या गरजेप्रमाणे नेमका कुठला प्रोजेक्टर कसा घ्यायचा हे अनेकदा अवघड होऊन जातं. किमतींचं म्हणाल तर अगदी अडीचशे रुपयांपासून ते थेट ५० हजारांपर्यंत अशी या प्रोजेक्टर्सची रेंज असते. त्यामुळे हे प्रकरण नक्की कसं काय असतं आणि त्यातले खाचखळगे काय हे कळणं महत्त्वाचं असतं. टप्प्याटप्प्याने आपण हे तिन्ही प्रकार बघू या.

होम थिएटर प्रोजेक्टर्स

एखादी इमेज ५० इंची एचडीटीव्हीच्या ३६ पटीने मोठी प्रोजेक्ट करण्याची ताकद होम थिएटर प्रोजेक्टर्समध्ये असते. त्यामुळेच एखादा अ‍ॅक्शनपट असो किंवा फुटबॉल, क्रिकेटचे रंगतदार सामने. या प्रोजेक्टर्समुळे एक तगडा अनुभव मिळतो. होम थिएटर्स प्रोजेक्टर्स हे मुळातच थिएटरसारख्या वातावरणासाठी बनवलेले असतात. त्यामुळे खोलीत थिएटरसारखा अंधार असणं अनिवार्यच. अर्थात अंधार नसला तरी ब्राइटनेस वाढवून सिनेमाचा दर्जा टिकवता येतो.

होम थिएटर्स कशासाठी उपयुक्त ठरतात?

अर्थात मूव्ही नाइट्स, मूव्ही मॅरेथॉन. सिनेमांचे चाहते असाल आणि थिएटरसारखा अनुभव हवा असेल तर हे प्रोजेक्टर्स उत्तम. थ्रीडी सिनेमे, स्पोर्ट्स, व्हिडीओ गेम्स, फोटो स्लाइड शो यांच्यासाठी होम थिएटर प्रोजेक्टर्सचीच शिफारस केली जाते.

मोठय़ा स्क्रीनवरही इमेजचा दर्जा टिकवला जात असल्याने हे प्रोजेक्टर्स लोकप्रिय आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रोजेक्टर्सच्या फॅनचा आवाज फार कमी येतो. त्यामुळे कानात वाजणारा जो एक सततचा आवाज असतो तो या प्रोजेक्टर्समधून येत नाही.

साधारण सहा हजारांपासून या प्रोजेक्टर्सची किंमत सुरू होते.

बिझनेस प्रोजेक्टर्स

मीटिंग्ज, प्रेझेंटेशन्स इतकंच नाही तर क्लासरूम्समधील वापरासाठी बिझनेस प्रोजेक्टर्स किफायतशीर ठरतात. यांना मल्टिमीडिया किंवा डेटा प्रोजेक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे होम थिएटर प्रोजेक्टर्सपेक्षा ते वरचढ असतात. सामान्यत: मीटिंग रूम्स किंवा क्लासरूम्समध्ये अंधार नसतो. त्यामुळे प्रकाशातही व्यवस्थित काम करू शकणारे आणि दर्जात्मक इमेजेस दाखवणारे प्रोजेक्टर्स गरजेचे असतात. अंधार नसला तरीही या प्रोजेक्टर्सचा ब्राइटनेस उत्तम असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस प्रोजेक्टर्स हे ग्राफ्स, पॉवर पॉइंट स्लाइड्स, फोटो अशी स्थिरचित्र (स्टॅटिक इमेजेस) दाखवण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. अर्थात मल्टिमीडिया आणि एंटरटेन्मेंटसाठीही त्याचा वापर केला जाऊ  शकतो. लॅपटॉप, ब्लू-रे प्लेयर तसंच इतर डिव्हाइसेसना जोडण्यासाठी एचडीएमआय पोर्टची सुविधा या प्रोजेक्टर्समध्ये असते.

त्यामुळे बिझनेस मीटिंग्ज, प्रेझेंटेशन्स, कॉन्फरन्सेस, पॉवर पॉइंट स्लाइड शो इतकंच नाही तर शैक्षणिक आणि प्रशिक्षणात्मक कामांसाठीही हा प्रोजेक्टर उत्तम आहे. लख्ख प्रकाश असणाऱ्या जागेत उत्तम ब्राइटनेस तर हे देतातच, पण यांची खासियत म्हणजे ते पोर्टेबल असतात. वजनाने हलके आणि हाताळायला सोपे असल्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं सहज शक्य असतं. सामान्यत: प्रोजेक्टर्स सेटअप करणं म्हणजे डोक्याला ताप समजला जातो (तसा तो नसतो.) पण हे प्रोजेक्टर्स इन्स्टॉल करणं सोपं असतं (मॅन्युअल वाचून सेट अप करणं सहज शक्य आहे.) या प्रोजेक्टर्सना मल्टिपल इनपुट्स देता येतात. त्यामुळे एकाच वेळी लॅपटॉप आणि इतर डिव्हाइसेसही जोडता येतात. याशिवाय वायरलेस प्रोजेक्शनची सुविधाही यात उपलब्ध असते.

किमती म्हणाल तर सहा ते सात हजारांपासून यांची किंमत सुरू होते. सामान्यत: सहा महिने ते एक वर्ष इतकी वॉरंटी असते.

पिको प्रोजेक्टर

हा प्रकार एकदम हिट आहे. अत्यंत कॉम्पॅक्ट आणि बॅग किंवा पर्समध्ये सहज मावू शकेल इतका लहान पण तितकाच पॉवरफुल असा हा प्रोजेक्टर. हातात पकडण्याइतके हे पॉकेट साइज प्रोजेक्टर्स छोटय़ा आकाराच्या खोल्यांमध्ये उत्कृष्ट काम करू शकतात. दीड किलोपेक्षा कमी वजन असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं सोपं असतं. ऑफ साइट मीटिंग्ज किंवा प्रवासामध्येही या प्रोजेक्टर्सचा वापर करणं शक्य आहे. प्रोजेक्टर्समधले सर्वात लहान आकाराचे असे हे प्रोजेक्टर्स आहेत. बल्बचं लाइफही चांगलं असल्याने हे प्रोजेक्टर्स त्रासदायक अजिबात नाहीत.

याशिवाय प्रोजेक्टर्स घेताना काय बघायचं?

प्रोजेक्टर टेक्नॉलॉजीमध्ये स्टॅंडर्ड लॅम्प, एलईडी आणि लेझर असे तीन प्रकार आहेत. स्टॅंडर्ड लॅम्प प्रोजेक्टर्समधला बल्ब साधारण पाच हजार तास चालू शकतो. आणि हा सर्वात किफायतशीर पर्याय आहे. लेझर प्रोजेक्टर्स हे ऊर्जा वाचवणारे प्रोजेक्टर्स आहेत. तसंच यामध्ये बल्बची रिप्लेसमेंट हा प्रकार नसतो. आणि लाइट सोर्सपेक्षा हे ब्राइट असतात. एलईडी हे प्रामुख्याने पिको प्रोजेक्टर्समध्ये वापरले जातात. यातल्या बल्बचं आयुष्य हे साधारण २० हजार तास इतकं असतं.

pushkar.samant@gmail.com