नीरज राऊत

एल्फिन्स्टनची भयस्मृती

अरुंद पुलावर गर्दीमुळे चेंगराचेंगरीची शक्यता

‘एल्फिन्स्टन रोड येथे रेल्वे पुलावर झालेल्या ‘चेंगराचेंगरी’ला वर्ष होत आले तरी पश्चिम रेल्वेला जाग आलेली दिसत नाही. विरार ते डहाणू रोड या उपनगरीय क्षेत्रातील सर्वात गजबजलेला बोईसर रेल्वे स्थानकावरील दक्षिणेकडील पूल अरुंद असल्याने सकाळ, संध्याकाळी गर्दीमुळे जाम होत असून येथे चेंगराचेंगरीची मोठी शक्यता आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच रेल्वे दखल घेणार आहे का? असा सवाल प्रवाशी करीत आहेत.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सुमारे १४०० कारखान्यातील सुमारे २० ते ३० हजार कामगार दररोज विविध ठिकाणाहून बोईसर येथे येतात. सकाळी ६.३० ते ८ वाजेदरम्यान डहाणू व मुंबई-विरारकडून हे कामगार येत असतात. याच वेळी मुंबई व वापी (गुजरात) कडे कामानिमित्ताने रेल्वेने बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी असते. दोन्ही बाजूने येणाऱ्या गाडय़ा अनेकदा एकाच वेळी येत असल्याने फलाटावर त्यावेळी काही हजार प्रवासी चढत-उतरत असतात. कामावरून सुटल्यावर सायंकाळी ५ ते ७ दरम्यान रेल्वे फलाटावर याच प्रकारची गर्दी होते.

बोईसर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेच्या बाजूला एका जुना पादचारी पूल असला तरी अधिकतर लोकवस्ती मध्यभागी व दक्षिणेच्या दिशेने असल्याने या जुन्या पुलाचा वापर होताना दिसत नाही.

बोईसर रेल्वेच्या दक्षिणेच्या बाजूला नव्याने मालवाहू टर्मिनल उभारण्यात आला असून यापुढे डाऊन दिशेच्या गाडय़ा फलाट क्रमांक १ वर आणणे शक्य झाले आहे.

पुलाची रुंदी जेमतेम ४ ते ५ फुटांची

दक्षिणेला रेल्वेने विकलांग (दिव्यांग) प्रवाशांच्या सोयीसाठी बोईसर स्थानकात नव्याने उताराचा (स्लाइडिंग) पूल बांधला. हा पूल सुमारे ९० ते १०० मीटर लांबीचा असला तरी या पुलाची रुंदी जेमतेम ४ ते ५ फुटांची असल्याने एकावेळी जेमतेम दोन प्रवासी प्रवास करू शकतात. अशा गर्दीच्या प्रसंगी एखाद्या वयस्कर प्रवाशी किंवा डोक्यावर ओझे, हातामध्ये सामान घेणारा प्रवाशी असल्यास प्रवाशांना पुढे जाणे कठीण होते. अशाच वेळी गाडी फलाटावर आल्यास गाडी पकडण्याच्या घाईत धक्काबुक्की होते आणि अशा क्षणी पूल चढण्याचा प्रवासी प्रयत्न करीत असल्याने चेंगराचेंगरी शक्यता आहे.

पायऱ्यांच्या शिडीची जोड रखडली

रेल्वे प्रशासनाने दक्षिणेच्या पुलाला पायऱ्यांच्या शिडीची जोड देणे गरजेचे आहे. त्याचे कामही सरू आहे, मात्र कासवगतीने. मध्येच काम सुरू असते मध्येच बंद राहते.  त्यामुळे प्रलंबित काम होणे गरजेचे आहे. गाडी येण्याचे फलाट बदलणार असल्यास त्यांची सूचना देणे तसेच गाडी पकडणाऱ्यांना व उतरणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

बोईसर येथील उताराच्या पुलाला पायऱ्यांची जोड देण्याची प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. हे काम सुरू झाले; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून काम अधूनमधून थांबून राहत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच बोईसर येथे सरकता जिना उभारण्यात यावा

-विजय शेट्टी, अध्यक्ष, डहाणू, वैतरणा रेल्वे प्रवासी सेवा संघ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोईसर येथील अरुंद व लांबलचक असलेल्या पुलाच्या वापर त्रासदायक ठरत असल्याने अनेक प्रवासी कामावर आपल्या वेळेत पोहोचण्यास चक्क रूळ ओलांडताना दिसून येत आहेत. यामुळे चेंगराचेंगरीपेक्षा एखादी भयंकर घटना घडू शकते.