भाईंदर : राज्यात टाळेबंदीचे नियम लागू असल्यामुळे रहिवासी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींची दुरुस्तीची कामे रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांना परवानगी देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर शहरात मोठय़ा प्रमाणात नव्या-जुन्या इमारती आहेत. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीचे कामे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या महिन्यात करण्यात येत असते. परंतु यंदा करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यात पूर्णत: टाळेबंदी करण्यात आली आहे. शिवाय मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून सक्त पावले उचलण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत अनेक इमारतींची कामे ही अर्धवट स्थितीतच बंद असल्याचे आढळून आले आहे.
पावसाळ्यापूर्वी या इमारतींची कामे न झाल्यास त्या इमारतींच्या नागरिकांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान उचलावे लागणार आहे. तसेच पूर्वी ठरवण्यात आलेल्या किमतीत वाढ होऊन अधिक किंमत मोजावी लागण्याची भीती आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्यक विकास कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. या काळात इमारतींच्या दुरुस्तीचीदेखील परवानगी प्रशासनाकडून देण्यात यावी, अशी मागणी गृहनिर्माण संस्थांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाकडे दुरुस्तीची परवानगी मागण्यास आलेल्या इमारतींना परवानगी देण्यात येत आहे. साधारण २० इमारतींना आतापर्यंत परवानगीदेखील देण्यात आली आहे.
– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता.