ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत १५६ प्रकरणे
ठाणे : टाळेबंदीत ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीचा आलेखही काहीसा चढा राहिला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत विनयभंग, लैंगिक अत्याचार, अपहरण, दुखापत वा हल्ला करणे, घरफोडी, दरोडे आणि चोरी यांसारखी १५६ प्रकरणे दाखल झाली आहेत. यात सर्वाधिक गुन्हे हे चोरी आणि हल्ल्याचे आहेत. त्यामुळे करोनाच्या बंदोबस्तासोबत या गुन्ह्य़ांवर आळा बसविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
आयुक्तालय हद्दीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी येथील शहरी भाग येतो. पोलीस आयुक्तालयात दर महिन्याला ७०० हून अधिक प्रकरणे दाखल होत असतात. टाळेबंदीत नागरिक फक्त अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडत असतात. त्यामुळे या कालावधीत काही महत्त्वाच्या गुन्ह्य़ांत घट अपेक्षित होती.
टाळेबंदीचा भार
एखाद्याला मारहाण करून दुखापत करण्याच्या ६३ घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली. टाळेबंदीच्या काळात पोलिसांवर बंदोबस्त, तसेच मजुरांचे नियोजन यांसारख्या कामांचा भार आहे.
पंचनामा
* १ एप्रिल ते १५ मेपर्यंतच्या कालावधीत १५६ गुन्हे दाखल. यात ३५ चोरीच्या, १८ घरफोडय़ा, दोन दरोडय़ाच्या घटना.
* एप्रिलमध्ये अशा दहा प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात यश. तसेच १० विनयभंग आणि आठ लैंगिक अत्याचाराच्या घटना.
* या कालावधीत लैंगिक अत्याचाराच्या पाच प्रकरणांत आरोपींचा शोध लावण्यात यश. विनयभंगाच्या तीन प्रकरणांत आरोपींना अटक. – १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत २० अपहरण वा घर सोडून गेल्याची प्रकरणे. याच कालावधीत एकूण १२ प्रकरणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश.