कल्याण-डोंबिवली पालिकेकडे १५० टन धान्य जमा
भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण : टाळेबंदीमुळे कष्टकरी, रोजंदार, बेघर, झोपडपट्टीतील रहिवासी उपाशी राहता कामा नये, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे त्यांना जेवण पुरविण्यात येत आहे. यासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील दानशूर मंडळींकडून १५० टन धान्य जमा केले आहे. या जमा होणाऱ्या धान्यातून दररोज ७५ हजार रहिवाशांना तयार भोजन पाकिटे वाटप केली जात आहेत.
कल्याण, डोंबिवली परिसरात ७४ झोपडपट्टय़ा, चाळी आहेत. येथील बहुतांश वर्ग ठाणे, मुंबई, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार, डहाणू परिसरातील कंपन्यांमध्ये, खासगी व्यवसाय, घरगुती कामे, हमाल, स्वच्छता खासगी कामगार म्हणून काम करतो. टाळेबंदीमुळे हाताला काम नसल्याने रोजगार बुडाला. घरातील काही दिवसापुरते असलेले किराणा सामान संपले. हातात पैसे नाहीत. अशा कुटुंबांची सर्वाधिक परवड सुरू होती. हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील कष्टकरी, झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी शहरातील घाऊक व्यापारी, सामाजिक-स्वयंसेवी संस्था, विकासक-वास्तुविशारद संस्था, स्वेच्छेने पालिकेला सहकार्य करणाऱ्या ठेकेदार मंडळींची बैठक घेऊन त्यांना टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या संकटाची माहिती दिली. त्यांना गरजूंना नियमित भोजन मिळेल या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले. आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या दातृत्ववान मंडळींनी १५० टन धान्य पालिकेला उपलब्ध करून दिले. हे धान्य जमा करून घेण्यात मुख्य वित्त अधिकारी उबाळे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. शासनाकडून २२ टन धान्यसाठा उपलब्ध झाला आहे. खिचडी, शाकाहारी बिर्याणी, पुऱ्या अशा पद्धतीने हे वाटप केले जाते. काही दानशूर मंडळींकडून धान्य शिजवण्यासाठी किराणा सामान घेतले जाते. भोजन तयार करण्यासाठी आठ भोजन कक्ष कल्याण, डोंबिवलीत उभारण्यात आले. आचाऱ्यांचे दोन्ही वेळ भोजन बनविण्यासाठी गट तयार करण्यात आले.
दीड महिना भोजन कक्षातून पालिका हद्दीतील रोजंदार कामगार, झोपडपट्टीवासी, स्थलांतरित, बेघर, अनाथ अशा सुमारे ७५ हजार रहिवाशांना दररोज तयार भोजन पाकिटे १० प्रभागांमधील प्रभाग अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पुरवली जातात. सकाळी १२ ते दोन आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत भोजन वाटप केले जाते.
महापालिका हद्दीतील करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन दातृत्वान मंडळींकडून १५० टन धान्य जमा केले आहे. शासनाकडून २२ टन धान्य मिळाले. आठ भोजन कक्षांच्या माध्यमातून ७५ हजार गरजू कष्टकरी, बेघर, स्थलांतरित लोकांना दीड महिन्यापासून तयार भोजन वाटप केले जाते. टाळेबंदी काळ वाढला तर येत्या काळात महापालिकेला ३०० टन धान्य लागेल. त्या दृष्टीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले आहे.
– सत्यवान उबाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, कडोंमपा