मुरबाड तालुक्यात शार्प शूटर्सच्या सहभागाने खास मोहीम

मुरबाड तालुक्यातील पळू आणि सोनावले गावांसह परिसरातील १५ गावांमध्ये दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबटय़ाला बुधवारी वनविभागाने कोळंब गावाजवळ सायंकाळी साडेपाच वाजता गोळ्या घालून ठार केले. त्याचा मृतदेह तपासणीसाठी टोकावडय़ाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवण्यात आला. या बिबटय़ाने दोन गावकऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. या पाश्र्वभूमीवर त्याला जागच्या जागी ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिले होते. मात्र गेले चार दिवस तो वनविभाग आणि पोलिसांना हुलकावण्या देत होता.

बुधवारी मात्र हा बिबटय़ा कोळंब या गावाजवळ असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्याला कोंडीत पकडून गोळ्या घालून ठार करण्यात आले. हा बिबटय़ा सुमारे सत्तर किलो वजनाचा असून त्याची लांबी सहा फूट होती, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

मुरबाडच्या पळू या गावातील मिराबाई वारे (५४) या महिलेवर शुक्रवारी बिबटय़ाने हल्ला करून त्यांना फरपटत जंगलात नेले होते. मिराबाई यांचा मृतदेह गावकऱ्यांना जंगलात सापडला होता. त्यानंतर रविवारी सोनावले गावामध्ये बारकु भोईर (५२) या शेतकऱ्याची बिबटय़ाने शिकार केली होती. या परिसरातील कुत्रे, गाई, म्हशी आणि कोंबडय़ाही बिबटय़ाची शिकार ठरल्या होत्या. बिबटय़ाच्या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील शाळा तसेच बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले होते.

जामानिमा..

या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचा आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथकही त्याला पकडण्यासाठी आले होते. तर तीन शार्प शूटर्सना जंगलाच्या विविध भागांमध्ये मचाणांवर बसवण्यात आले होते. बुधवारी वेगवेगळ्या पथकांनी जंगलामध्ये शोधमोहीम राबवली. 

‘जय’चा तपास सीबीआयकडे?

मुंबई : विदर्भातील उमरेड कऱ्हांड अभयारण्यातील जय हा वाघ १८ एप्रिलपासून बेपत्ता असून त्याची हत्या झाल्याचा आरोप भाजप खासदार नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटून सीबीआयकडे तपास सोपविण्याची विनंती केली आहे.