महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची स्पर्धा
जिल्ह्य़ातील नाटय़वेडी महाविद्यालये पडद्याआड हात जोडून सज्ज झाली आहेत.. गेला आठवडाभर ‘लोकसत्ता’मधून ‘लोकांकिके’ची वृत्ते ऑर्गनच्या सुरासारखी राज्यभरात भरून राहिली आहेत.. नटराजाला धूप दाखवून तिसरी घंटाही झाली आहे.. आता आज, रविवारी ठाण्यात ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा पडदा उघडेल आणि एकापेक्षा एक दर्जेदार एकांकिकांचे सूर ‘नांदी’सारखे राज्याच्या या विशाल प्रेक्षागारात गुंजतील.
[jwplayer voXexKMV]
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी युवा’ या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांची गुणवत्ता हेरून त्यांच्यासाठी मराठी मनोरंजनक्षेत्राची कवाडे खुली करण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. गेली तीन वर्षे अस्तित्व या संस्थेच्या मदतीने आठ केंद्रांवर तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
ठाणे विभागातील महाविद्यालयांत शनिवारी रात्री उशिरापर्यंत एकांकिकांच्या तालमी चालू होत्या. प्राथमिक फेरी नेपथ्याशिवाय करायची असल्याने वास्तवाकडे जाण्यासाठी ‘पॉलिशिंग’ चालू होते. रंगीत तालीम, त्यात झालेल्या चुकांचा आढावा, पुन्हा एकदा रन थ्रू, अशी जोरदार तयारी विविध महाविद्यालयांमध्ये चालली होती. दरवर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. यावर्षीदेखील उत्तम सादरीकरणासाठी तालमीदरम्यान प्रचंड मेहनत घेतली आहे. राज्यभरातील महाविद्यालयाच्या एकांकिका या स्पर्धेत असल्याने आव्हान असते. मात्र सवरेत्कृष्ट कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करू, असे जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विशाल खोजेने सांगितले.
ठाण्यातील नाटय़वेडय़ा तरुणांची गुणवत्ता हेरण्यासाठी या प्राथमिक फेरीसाठी आयरिस प्रॉडक्शनतर्फे सुवर्णा रसिक राणे, मधुरा महंत आणि सुप्रिया पाठारे उपस्थित राहणार आहेत. ‘प्रपंच’, ‘वादळवाट’, ‘अंकुर’, ‘मला सासू हवी’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘पुढचं पाऊल’ आदी मालिकांच्या कार्यकारी निर्मात्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुवर्णा रसिक राणे सध्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर आहेत. त्याशिवाय सुप्रिया पाठारे यांनी मराठी, हिंदूी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून लौकिक कमावला आहे. मधुरा महंत या गेली ३५ वष्रे काव्यलेखन करत आहेत. त्यांना काव्य लेखनासाठी अक्षरमंच प्रतिष्ठानचा ‘केशव स्मृती पुरस्कार’, ‘काव्यरत्न’ पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
[jwplayer bZoVXId4]