जिल्ह्यात १० परदेशी श्वान, मांजरी जखमी अवस्थेत

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोनाकाळात पाळीव प्राणी सोडून देण्याचे प्रमाण सतत सुरू असून गेल्या काही दिवसांत प्राणीमित्र संस्थांना ठाणे जिल्ह्य़ात १० परदेशी प्रजातीचे श्वान आणि आठपेक्षा अधिक मांजरी रस्त्यावर जखमी तसेच आजारग्रस्त आढळून आल्या आहेत. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर हे प्रमाण सतत वाढत असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.

नवी मुंबईतील वाशी भागात सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन (कॅप) या संघटनेला शिह त्जू प्रजातीचा श्वान काही भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेला आठवडाभरापूर्वी आढळून आला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाण्यातील वृंदावन सोसायटी येथे एका बास्केटमध्ये एक पर्शियन जातीची मांजर कोणीतरी ठेवून निघून गेले होते. माजिवडा येथे रक्ताने माखलेल्या अवस्थेत पर्शियन मांजर आढळून आली. अशा घटना गेल्या काही दिवसांपासून वाढू लागल्या आहेत, अशी माहिती प्राणीमित्र संघटनेत कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांनी दिली.

ठाणे, कळवा, नवी मुंबई, मुंब्रा या भागांत गेल्या दोन आठवडय़ांत शिह त्जू, डॉबरमॅन, लॅब, जर्मन शेफर्ड यांसारख्या उच्च प्रजातीचे आणि महागडे श्वान रस्त्यावर सोडून दिल्याचे प्रकार आढळून आले आहेत. पर्शियन मांजरीही सोडून देण्याचे प्रकार या काळात वाढले असून करोनाकाळात हे प्रकार सातत्याने घडत आहेत, अशी माहिती सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनचे सदस्य सुशांत तोमर यांनी दिली. प्राणी मालकांची प्राणी पाळण्याची हौस फिटणे, करोनाकाळात या प्राण्यांचा मासिक खर्च न पेलवणे, प्राणी आजारी पडण्याचे प्रमाण वाढणे अशी काही कारणे यामागे असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

एखाद्या व्यक्तीने त्याच्या पाळीव प्राण्याला भर रस्त्यात सोडून देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या सर्व प्रकरणात आम्ही संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारीही दिल्या आहेत. आम्हाला आढळून आलेल्या १६ प्राण्यांवर उपचार केले. त्यानंतर १३ प्राणी काही जणांनी दत्तक घेतले आहेत.

– सुशांत तोमर, सदस्य, सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशन.

परदेशी प्राणी पाळणे किती खर्चीक?

परदेशी प्राणी पाळताना त्यांची भारतीय हवामानात अधिक काळजी घ्यावी लागते. अनेक प्राण्यांना वातानुकूलित यंत्रांची दिवसभर गरज लागत असते. तसेच त्यांचे खाद्यही वेगळे असते. त्यामुळे या प्राण्यांवर महिन्याला अधिकचा खर्च येतो. मोठय़ा हौसेने असे प्राणी घेताना त्यांचा सांभाळ करताना लागणाऱ्या रसदेचा विचार मालकांनी आधीच करायला हवा, असे प्राणीमित्र संघटनांचे मत आहे. अनेक कुटुंब हे घरातील लहान मुलांना खेळण्यासाठी कुत्रे, मांजरी पाळतात. ही पद्धत अत्यंत चुकीची असून प्राणी पाळणे ही वेगळी आणि स्वतंत्र जबाबदारी आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे ठाण्यातील प्राणीप्रेमी रुपेश मोरे यांनी सांगितले. घरातील लहान मुलाचा आपण जसा सांभाळ करतो तितकीच, अनेकदा त्यापेक्षाही अधिकची काळजी पाळलेल्या प्राण्यांची घ्यावी लागते,  असेही रुपेश यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीने त्याच्या पाळीव प्राण्याला भर रस्त्यात सोडून देणे हा गुन्हा आहे. या सर्व प्रकरणात आम्ही संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारीही दिल्या आहेत. आम्हाला आढळून आलेल्या १६ प्राण्यांवर उपचार केले. त्यानंतर १३ प्राणी काही जणांनी दत्तक घेतले आहेत.

– सुशांत तोमर, सदस्य, सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशन.