टाळेबंदीत वाहतुकीच्या साधनांअभावी आदिवासींचा व्यवसाय कोमेजला

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : बदलापूरची प्रसिद्ध जांभळं आदिवासी हिरव्याकंच पानांत बांधून बाजारपेठेत दरवर्षी आणत होते. मात्र, यंदा टाळेबंदीत वाहतुकीची अपुरी साधने आणि नियमित बाजार बंद असल्याने जांभळं पिकून झाडालाच लगडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात खूपच कमी जांभळं आली आहेत. त्यामुळे किलोमागे साधारण २५० रुपये आकारले जात आहेत.

बदलापूरनजीक एरंजाड, सोनिवली, काराव, डोणे, बोराडपाडा, मुळगाव, बारवी आणि मुरबाडच्या काही भागातून आदिवासी बांधव जांभूळ गोळा करतात. यात मोठय़ा आकाराचा हलवा आणि छोटय़ा आकाराचा गरवा अशी जांभळांच्या प्रमुख जाती आहेत. गेल्या वर्षी जांभळाच्या १०० पाटय़ांचा व्यवसाय अवघ्या १० ते १५ पाटी प्रति दिवसांवर आला होता. यंदा तो पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे.

करोनाकाळात आदिवासींनी झाडावरची जांभळे अद्याप उतरवलेली नाहीत, अशी माहिती व्यापारी कय्यूम खान यांनी दिली. आम्ही काही आदिवासींशी संपर्कात होतो. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे फळ झाडावरच राहण्याची चिन्हे आहेत, असे खान म्हणाले.

जांभळात औषधी गुण आहेत. त्यामुळे त्याला मोठी मागणी असते. मात्र, मोजकेच जांभूळ विक्रेते अंबरनाथ, बदलापूर शहरात दिसत आहेत. त्यामुळे आंब्याच्या किमतीत जांभळे विकत घेण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया काही ग्राहकांनी व्यक्त केली.याशिवाय वाहतुकीची साधने नसल्याने करवंदे गोळा करून विक्री करायची कुठे, असा सवाल आदिवासी उपस्थित करत आहेत. त्यामुळे बाजारात करवंदेही आलेली नाहीत.

प्रक्रिया केंद्रांचा अभाव

आंबा, चिकू या फळांप्रमाणे जांभूळ आणि करवंद यांना कधीही मोठय़ा बाजारांत मानाचे स्थान मिळाले नाही. जांभूळ खरेदी-विक्रीत व्यावसायिकता नसल्याने गरजेपुरती खरेदी आणि विक्री या फळांबाबत होताना दिसत आहे. त्यातही व्यावसायिकदृष्टय़ा फळांची लागवडही होत नसल्याने त्याची साठवण आणि प्रक्रिया केंद्रेही उभी राहू शकलेली नाहीत.

Story img Loader