संत जेरोम चर्च, काशिमीरा
मीरा-भाईंदर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या काशिमीरा येथील टेकडीवर वसलेले ‘संत जेरोम चर्च’ हे तीन चर्चच्या संगमातून उभे राहिले आहे. या चर्चचा सण २६ डिसेंबरला साजरा केला जातो. या सण सोहळ्यात सर्वधर्मीय शेकडो नागरिक सहभागी होतात आणि आनंदोत्सव साजरा केला जातो.
या ठिकाणी पहिले चर्च काशी आणि मीरा या दोन गावांच्या सीमेवर १५९५ ते १६०२ दरम्यान फ्रान्सिस्कन मठाधिपतींनी उभारले. परंतु १६१८ मध्ये झालेल्या तुफानी वादळात हे चर्च नामशेष झाले. १६२८मध्ये जुन्या चर्चच्या अवशेषांसभोवती नवे चर्च बांधण्यात आले. त्यावेळच्या काशी, मिरे, चेणे आदी ठिकाणचे भक्त या चर्चमध्ये येत असत. पुढील १०९ वर्षांच्या काळात हे चर्च चांगलेच नावारूपाला आले. परंतु १७३९ मध्ये झालेल्या लढायांमध्ये या चर्चची पुन्हा भग्नावस्था झाली.
त्यानंतर तब्बल १८७ वर्षांनी सध्या अस्तित्वात असलेल्या पश्चिमाभिमुख चर्चची याच ठिकाणी पुनर्बाधणी करण्यात आली. हे चर्च अशा पद्धतीने बांधण्यात आले की जुन्या चर्च कमानीचे रूपांतर पवित्र प्रार्थनास्थळात झाले आणि जुन्या चर्चच्या जागी प्रार्थनेचे साहित्य आणि वस्त्रे ठेवण्याचा कक्ष निर्माण करण्यात आला. संत जेरोम यांच्या पुतळ्याचे जतन करून तो मुख्य वेदीवर ठेवण्यात आला आहे. चर्चच्या आवारात दोन क्रुस आहेत. एक ३५० वर्षांपूर्वीचा आहे आणि दुसरा १९२६ला उभारण्यात आला. हे चर्च भक्तांच्या प्रार्थनेसाठी २६ डिसेंबर १९२६ ला खुले करण्यात आले त्यामुळे संत जेरोम यांचा सण ३० सप्टेंबरला असतानाही या चर्चमध्ये दरवर्षी २६ डिसेंबरलाच सण साजरा केला जातो.
१९६८ पर्यंत हे चर्च भाईंदर पश्चिम येथील ‘अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च’च्या अखत्यारीत होते. या चर्चचे फादर रविवारी सकाळचे दोन मिसा संपल्यानंतर टांग्याने काशिमीरा येथील संत जेरोम चर्चमध्ये यायचे आणि तिथला मिसा साडे दहा वाजता सुरू व्हायचा. १९७० नंतर हे चर्च स्वतंत्र धर्मग्राम म्हणून स्थापित झाले.
सणाचे आगळेवेगळे महत्त्व
दरवर्षी २५ डिसेंबरला नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना संत जेरोम चर्चमध्ये हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्तासोबतच संत जेरोम यांचे पुण्यस्मरण भक्तिभावाने केले जाते. २६ डिसेंबर हा दिवस चर्चच्या सणाचा दिवस. या दिवशी आयोजित केली जाणारी यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. केवळ काशिमीरा आणि आसपासचे भक्त नव्हेत तर उत्तन, गोराई, मनोरी तसेच मुंबईतून सर्वधर्मीय भाविक २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच चर्चमध्ये जमायला सुरुवात होते. गोराईमधील भक्त पारंपरिक पद्धतीने आजही बैलगाडीमधून घुमट हे वाद्य वाजवत चर्चकडे प्रस्थान करतात. हे भक्त रात्रभर चर्चच्या आसपासच्या वाडय़ांमधून वास्तव्य करतात.
सकाळी सहा वाजल्यापासून संत जेरोम यांच्या दर्शनाने यात्रेची सुरुवात होते. यासाठी संत जेरोम यांचा पुतळा खास भक्तांच्या सोयीसाठी चर्च बाहेर आणला जातो. दुपारी एक वाजेपर्यंत प्रार्थना आयोजित केल्या जातात आणि दर्शन सोहळा रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहतो. यात्रेनिमित्त चर्चचे आवार गजबजलेले असते. विविध खेळणी, पाळणे, विविध खाद्यपदार्थ यांची या ठिकाणी रेलचेल असते. या ठिकाणी विक्रीसाठी येणारा काळा शिंगाडा तर खूपच प्रसिद्ध आहे. याशिवाय ख्रिस्ती लग्नामध्ये हमखास वाजवले जाणारे घुमट हे वाद्यदेखील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले जाते आणि येणारे भक्त त्याची आवर्जून खरेदी करतात.