करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली शहरांमधील अतिसंवेदनशील क्षेत्रांत २९ जूनपासून संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान निर्बंध थिथील झाल्याने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून ठाणे पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.

“ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घऱात राहणं अपेक्षित आहे. गरजेच्या गोष्टी, कामांसाठी खासगी कार, टॅक्सी, रिक्षा ज्यामध्ये एक अधिक अशा दोघांना आणि दुचाकीवर एकालाच परवानगी आहे. असं असतानाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन वाढत आहेत,” असं अमित काळे यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- मोठी बातमी! १ जुलैपासून ठाणे शहरात पुन्हा लॉकडाउन जाहीर

“या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी सर्व ठिकाणी कडक नाकाबंदी लावली आहे. विनाकारण फिरणारे, गरज नसताना बाहेर पडणारे यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. गाड्या जप्त देखील केल्या आहेत. कालच्या दिवसात दोन हजार वाहनांवर कारवाई केली. पहाटे पाच वाजेपर्यंत अडीचशे वाहनांवर कारवाई झाली आहे. सर्व नागरिकांनी घरातच थांबावं, अनावश्यक असताना बाहेर पडू नये अथवा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल,” असा इशारा अमित काळे यांनी यावेळी दिला आहे.