ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे दरम्यान सोमवारी सायंकाळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची दोन बोटे तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण होतं. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहाय्यक आयुक्तांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली. आता बरं होताच पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करणार असं सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे या घटनेनंतर कासारवडवली पोलिसांनी फेरीवाला अमरजीत यादव याला अटक केली आहे.

“कारवाईसाठी आम्ही निघालो. फेरीवाल्यांवर आपण कारवाई संध्याकाळी करतो. संध्याकाळी म्हणजे स्टाफला आपण पुढे पाठवतो. मी मागून आले. कारवाई जवळपास झाली होती. कारवाई बघत असताना मी थोड्यावेळाने खाली उतरले. यानंतर काय झालं माहित नाही आणि अटॅक झाला. मागून तो अटॅक झाला. मला काही कळलंच नाही. नंतर मला कळलं की समोरून माझ्या तोंडावर वगैरे मारलं त्याने. मग ते कोणाला तरी समजलं मग त्याने त्याला ढकललं. मग तो स्कुटरवर जाऊन पडला. मी बघितलं माझं खूपच रक्त वाहत होतं. बघितलं तर दोन बोटच नाहीत. त्याच्या दोन हातात चाकू होता. नंतर मी इथे आले.”, असं सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

Exclusive: सामान्यांसाठी सिद्धिविनायक मंदिर बंद पण शिवसेना खासदारासहित VIP व्यक्तींना मागच्या दाराने प्रवेश

त्यानंतर कारवाईबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी कारवाई चालूच ठेवणार असल्याचं सांगितलं. “आपण त्यांना घाबरून थोडीच राहणार आहोत. ते माझं कामच आहे. यांना घाबरून राहिलो तर उद्या फेरीवाले फायदा घेतील.”, असा इशारा देखील सहाय्यक आयुक्तांनी यावेळी दिला.

तालिबानला एकाकी झुंजणाऱ्या सालेह यांचा अफगाणिस्तान सोडणाऱ्या अमेरिकेला टोमणा; म्हणाले, “सुपर पॉवर म्हणवणाऱ्यांनी…”

घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.