‘फेसबुक’, ‘झूम’वर विविध कार्यक्रम, व्याख्यानांची रसिकांसाठी मेजवानी
पूर्वा साडविलकर/गीता कुलकर्णी, लोकसत्ता
ठाणे : टाळेबंदीत सांस्कृतिक चळवळी आक्रसल्या. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरांतील सांस्कृतिक कट्टे आणि संस्थांना सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले. त्यामुळे कलारसिक आशयसंपन्न कलाकृतीच्या आस्वादापासून वंचित राहिले. अर्थात हे दुरावलेपण काही दिवसांपुरतेच होते, हे आता सिद्ध झाले आहे. तिन्ही शहरांतील कट्टे आणि संस्थांनी कलेचं ऑनलाइन आविष्करण सुरू केलं आहे. ही सर्व मंडळी विविध अॅप्लिकेशन आणि ‘फेसबुक पेज’च्या माध्यमातून कार्यक्रम पोहोचवत आहेत.
पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेणारे हे कट्टे समाजमाध्यमांवर पेज तयार करीत आहेत. याशिवाय ‘झूम’ आणि ‘गुगल मीट’ या ‘अॅप’ची मदत घेत आहेत. यात त्यांनी विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. ठाण्यातील ब्रह्मांड कट्टा ‘फेसबुक’वर आहे. येथे पंधरवडय़ातून एकदा विविध विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याचे या कट्टय़ाच्या संस्थापकांनी सांगितले.
ठाण्यातील सर्वात जुना नौपाडय़ातील आचार्य अत्रे कट्टा ऑनलाइन कार्यक्रमांना प्राधान्य देत आहे. अत्रे कट्टा ‘झूम’ अॅपवर आहे. यात व्याख्याने घेतली जात आहेत. सुरुवातीला ‘झूम’ अॅपची पूर्ण माहिती व्हावी, यासाठी सदस्यांसाठीच कार्यक्रम घेतले जात होते. त्यानंतर रसिकांसाठीही कार्यक्रम खुले करण्यात आले आहेत. यापुढे दर बुधवारी कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थापिका संपदा वागळे यांनी दिली.
तरुणांचा कट्टा अशी ओळख असलेल्या कोपरीतील भटकंती कट्टा यात मागे नाही. विविध विषयांवरील व्याख्यानाची मालिका टाळेबंदीतही ‘भटकंती’वर सुरू ठेवण्यात आली. भटकंती कट्टय़ावर प्रवासवर्णन आणि पर्यावरणावर महिन्यातून एकदा फेसबुक पेजवर व्याख्यान आयोजित केली जात आहेत. ठाण्यातील ‘अजेय संस्थे’मार्फत फेसबुक, ‘व्हॉट्सअॅप’ आणि ‘झूम’ अॅपच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनासाठी स्पर्धा तसेच कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी या संस्थेने ‘चमत्कार’ ही स्पर्धा घेतली. यात स्पर्धकांना एका विषयाला वाहिलेली एक कथा लेखन, ध्वनी वा ध्वनिचित्र स्वरूपात सादर करण्यास सांगण्यात आले होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आध्यात्मिक कार्यक्रम
ठाण्याप्रमाणेच कल्याण आणि डोंबिवली शहरातील संस्थांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी केली आहे. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे त्यांच्या फेसबुक पेजवर ज्येष्ठ नागरिकांसाठी तीनदिवसीय आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यापुढेही विविध व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे, तर टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे काही वर्षांपूर्वी संस्थेतर्फे आयोजित केलेले कार्यक्रम फेसबुक पेजवर नव्याने सादर केले जाणार आहेत.