कल्याण खडकपाडा
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कलच्या पुढे गोल्डन पार्कच्या दिशेला असणाऱ्या रस्त्यावर पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असून चार महिन्यांपेक्षाही अधिक काळ शेकडो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने हे पाणी पावसाचे असल्याचा नागरिकांचा समज होऊन या गळतीकडे दुर्लक्ष केले जाते. अधिकारीवर्गाकडूनही याची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरिकांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करावा लागतो. शिवाय रस्त्यावर होणाऱ्या सततच्या गळतीमुळे रस्त्यावर शेवाळ्याची निर्मिती होऊन परिसरातील रस्ता निसरडा बनला हे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच भागातून पालिकेचे बरेचशे अधिकारी ये-जा करत असून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असून त्यामुळे ही समस्या कायम आहे.

वागळे इस्टेट

वागळे इस्टेट परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात जलवाहिन्या नादुरुस्त असल्यामुळे या भागात पाणी वाया जाताना दिसते. रस्त्यामध्येच असलेल्या जलवाहिन्यांवरून वाहने गेल्यामुळे जलवाहिन्या फुटून पाण्याचे मोठे फवारे उडत असतात. प्रत्येक आठवडय़ातून एकदा ते दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडतच असतात. महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

कल्याण शिळरोड

बारवी येथून कल्याण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची १७७२ डायमीटर व्यासाची जलवाहिनी असून ही वाहिनी फुटून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जाण्याचे प्रमाण गेली अनेक दिवसांपासून समोर आले आहे. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर या महापालिकांना पाणीपुरवठा केला जातो. या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात गॅरेज आणि गाडय़ा धुण्याचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींची दुकाने असून त्यांच्याकडून या भागात जलवाहिन्यांना भोक पाडून पाणी चोरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अपघाताची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून काही वेळा होल पाडताना अनेक वेळा जलवाहिन्यांचा स्फोट होऊन मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असते. तर अन्य वेळा गॅरेज मालक हे पाणी चोरटय़ा पद्धतीने वापरत असतात. या प्रकारातून हजारो लिटर्स पाणी वाया जात असून मोठा अपघात घडला तरच हे प्रकार लक्षात येतात. अन्यथा पिण्याचे पाणी मोठय़ा प्रमाणात गाडी धुण्यासाठी चोरले जाते.

कोपरी परिसर

ठाणे कोपरी परिसरातही अशाच अवजड वाहनांमुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे पाणी वाया जाताना दिसते.

ठाणे रेल्वे स्थानक

ठाणे पालिकेने सॅटिस परिसरामध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारी टाकी बसवली आहे. छोटय़ा आकाराची टाकी मात्र त्याला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मोठी यामुळे ही टाकी भरल्यानंतर पाणी मोठय़ा प्रमाणात वाहून जाण्याचा प्रकार घडत आहे. याकडे महापालिका प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसून वाहणाऱ्या पाण्यामुळे स्थानक परिसरामध्ये दलदलीचे स्वरूप निर्माण होते. पार्किंगची व्यवस्था असलेल्या या भागात ही पाणीगळती होत असून त्याचा फटका रेल्वे प्रवाशांनाही सहन करावा लागतो.

कल्याण पूर्व

कल्याण पूर्वमध्ये चाळींचे साम्राज्य असून या दाटीवाटीमध्ये पाण्याची गळती मोठय़ा प्रमाणमध्ये होते. अनेक वेळा या भागातील जलवाहिन्या फुटल्या तरी पालिका अधिकारी फिरकत नसल्याने अनेक वेळा पाणी वाया जात राहते. त्यामुळे या भागामधील वितरण व्यवस्थेतील सुधारणेची गरज आहे. मोठय़ा प्रमाणामध्ये मोटरचा वापर पाणी खेचण्यासाठी केल्यामुळेही जलवाहिन्या फुटून पाण्याची नासाडी होते. तिसगाव परिसर, कर्पेवाडी, कोळसेवाडी या भागांत अनेक वेळा पाणीगळती होऊन पाणी वाया जात असते.