लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे आणि मुंब्रा शहरात आंदोलने करण्यात आली. मुंब्रा शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला तसेच पाकिस्तान आणि दहशदवाद्यांविरोधात घोषणाबाजी केली. तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आम आदमी पक्षाच्यावतीने दहशदवादी हल्याचा निषेध केला. तसेच दिवा शहरातही बंद पाळण्यात आला होता.
कश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नागरिक मृत्युमुखी पडले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी ठाणे, मुंब्रा आणि दिवा शहरात हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलने झाली. मुंब्रा भागात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सहभाग घेतला होता.मुंब्रातील लोकांनी मशिदीमध्ये नमाज झाल्यानंतर एकत्र येत पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद असे म्हणत आंदोलन केले, याला माणुसकी म्हणतात. त्याचबरोबर जे काही झाले ते वाईट झाले आहे. सरकारने यावर उत्तर देणे गरजेचे आहे. हल्ला झाला तेव्हा एकही सैन्याचा अधिकारी तिथे नव्हता. याचा अर्थ सरकारचे लक्ष नाही. या २६ जणांच्या मृत्युला जेवढे दहशतवादी जबाबदार आहेत, तेवढेच एक टक्का सरकार देखील जबाबदार आहे असे आव्हाड म्हणाले.
ठाणे स्थानक परिसरातही आम आदमी पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी दहशदवादा विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केली. तर दिवा शहरातील दिवा मर्चंट व्यापारी संस्थेमार्फत दिवा शहर बंदची हाक देण्यात आली होती. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर दिवा शहरात बंद पाळण्यात आला. दिवा शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दहशतवाद्यांचा निषेध केला. दिवा शहरातील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करत पाकिस्तानचा झेंडा जाळला. त्याचबरोबर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व्यापारी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.