वसई-विरारमध्ये वीज चोरांचा सुळसुळाट; वर्षभरात हजाराहून अधिक प्रकरणे उघडकीस

मीटरमध्ये फेरफार करून किंवा उघडय़ा वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांचा वसई, विरार शहरात उपद्रव वाढू लागल्यानंतर महावितरणने त्यांच्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षांत वसई विभागात वीज चोरीची एक हजाराहून अधिक प्रकरणे उघडकीस आली असून त्यांच्याकडून तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात महावितरणला यश आले आहे.

महावितरणाच्या वसई विभागात वसई, विरार आणि पालघर ही केंद्रे येतात. त्यांच्या अखत्यारीत एकूण १८ उपकेंद्रे आहेत. महावितरणाला सध्या सर्वात मोठी समस्या ही वीज चोरीची भेडसावत आहे. चालू आर्थिक वर्षांत म्हणजे १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ८ महिन्यांत वीज चोरीचे तब्बल १ हजार ११२ प्रकरणे शोधून काढण्यात आली आहेत. मागील वर्षी दुपटीने वाढले आहे. मागील वर्षी याच कालावधीत  हेच प्रमाण केवळ ४७५ एवढे होते. चालू वर्षांत १ हजार ११२ वीज चोरीच्या प्रकरणात ३३१ जणांवर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १३५ प्रमाणे वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ७९ लाख दंड वसूल करून २५५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वीज चोरीचे सर्वाधिक प्रमाण पालघर आणि ग्रामीण भागात आहे.

‘वाढत्या वीज चोरीमुळे फीडरवर परिणाम होत असून त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे. वीज चोरीचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या ई,एफ,जी (पालघर, वाडा, मोखाडा) आदी पट्टय़ांत त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे. या ठिकाणी सध्या दररोज ४ तास ते १२ तास एवढे भारनियम होते,’ अशी माहिती वसई परिक्षेत्राचे अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनावणे यांनी दिली.

८ दिवसांत नवीन मीटर जोडणीे

आकडे टाकून, मीटरमध्ये फेरफार करून, तसेच दुसऱ्याच्या मीटरमधून वीेज चोरी केलीे जाते. आकडे टाकून वीेज चोरी करणे जिवावर बेतू शकते. त्यामुळे नागरिकांनी वीज चोरी न करता नवीन जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अर्ज केल्याच्या ८ दिवसांत वीजजोडणी देण्यात येईल, असे वितरणाने म्हटले आहे.

Story img Loader