आमच्या फ्लीप ड्रीम इंडिया, फ्लीप ड्रीम इंडिया अक्वा गुंतवणूक कंपनीत मोठ्या रकमा गुंतविल्या तर वाढीव व्याज, व्याज वाढेल तसे मोटार कार, रोख रकमा, परदेश प्रवास अशी भरघोस आमिषे दाखवून कल्याण परिसरातील १४ गुंतवणुकदारांची या कंपनीच्या चार संचालकांनी एक कोटी सात लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
गेल्या चार वर्षापासून या दोन्ही गुंतवणूक कंपन्या ग्राहकांकडून एक लाखापासून ते पाच लाखापर्यंत गुंतवणुका स्वीकारत होते. अल्पावधीत झटपट मोठी रक्कम हातात येणार असल्याने गुंतवणुकदार या संचालकांच्या आमिषाला बळी पडत होते, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>> कल्याण : वाहतूक पोलिसाला ठोकर देणाऱ्या दुचाकी स्वाराला दोन वर्षाचा कारावास
या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव अशोक मनोहर गांगुर्डे (६३, निवृत्त, रा. योगीधाम, ग्रीन लॅन्ड सोसायटी, कल्याण) आहे. या दोन्ही गुंतवणुकदार कंपन्यांचे संचालक मोहम्मद रजा याकु खान, (रा. सय्यद मंझिल, मुरबाड रस्ता, कल्याण पश्चिम), अजय कृपाशंकर श्रीवास्तव (रा. माधव सृष्टी, गोदरेज हिल रस्ता, खडकपाडा सर्कल, कल्याण पश्चिम), सलिम चंद सय्यद (रा. चंद्रमुखी, लोकसुरभी संकुल, पत्रीपुलाजवळ, कल्याण पूर्व), इशाक जुम्मन अन्सारी (सतरामदास रुग्णालया जवळ, नाईस ब्युटिक, उल्हासनगर ५ आणि इतर हे या प्रकरणात आरोपी आहेत. एप्रिल २०१९ पासून साईविहार काॅम्पलेक्स, गुरुदेव हॉटेलचे वर, कल्याण पश्चिम) येथे ही घटना घडली आहे.
हेही वाचा >>> ‘मी शिवसेना बोलते…’; शिवसेनेची वाटचाल सांगणारा अनोखा देखावा कल्याणमधील गणेशोत्सवात
पोलिसांनी सांगितले, या दोन्ही गुंतवणुकदार कंपन्यांच्या संचालकांनी १४ गुंतवणुकदारांना आमचा मत्स्यपालन व्यवसाय आहे. यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. या मत्स्यपालन व्यवसायात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला दामदुप्पट परतावा मिळणार आहे. एक लाख रुपये गुंतविले तर १२ महिन्याच्या गुंतवणुकीवर १८ हजार रुपये दरमहा परतावा, हीच रक्कम १८ महिन्यांसाठी गुंतवली तर दरमहा ११ हजार रुपये, बायो फ्लाॅक योजनेत दोन लाख रुपये गुंतविले तर दोन वर्षानंतर चार लाख ५६ हजार रुपये परतावा आणि एक लाख बोनस, १२ व १८ महिन्यांसाठी ठरावीक रक्कम गुंतविल्यास ही रक्कम वाढत जाऊन व्याजाप्रमाणे गुंतवणुकदारांना प्रत्येक ठरावीक टप्प्यावर चढत्या भाजणीप्रमाणे मोबाईल, लॅपटाॅप, परदेश पर्यटन, बुलेट, मारुती कार, महागड्या कार, ५० लाख रुपये रोख, सदनिका, एक कोटी स्वामित्व रक्कम अशी अशक्यप्राय आमिषे दाखविली. या गुंतवणूक योजनेला भुलून तक्रारदार अशोक गांगुर्डे यांनी पाच लाख २० हजार रुपये आणि इतर गुंतवणुकदारांनी अशा प्रकारची गुंतवणूक या दोन कंपन्यांमध्ये केली.
दिलेल्या मुदतीत संचालकांनी गुंतवणुकदारांना वाढीव परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. वाढीव व्याज मिळत नसल्याने काही ग्राहकांनी मूळ मुद्दल रक्कम परत करण्याची मागणी सुरू केली. त्यालाही संचालक नकार देऊ लागले. चार संचालकांनी आपला विश्वास संपादन करुन आपली आर्थिक फसवणूक केली आणि आपल्या गुंतवणूक रकमेचा अपहार केला म्हणून १४ गुंतवणुकदारांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली.
महाराष्ट्र ठेवीदारांचे हित कायद्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सतिशचंद्र राठोड तपास करत आहेत.