ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतू, गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरामध्ये १ हजार २०१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ३८ तक्रारींचा १०० मिनिटांत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
विधानसभा निवडणूका जाहीर होताच १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. या सर्व मतदार संघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोर आला आहे. मिरवणूक, प्रचार फेरी, सभा तसेच मेळावे असे उमेदवारांचे कार्यक्रम ठरलेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या मिरवणूक, सभा आणि मेळाव्यांमध्ये एखाद्या पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास याची तक्रार सि-व्हीजील ॲपवर करता येत आहे. प्रचारात काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक त्या प्रकरणाचा संदेश, फोटो, व्हिडिओ या ॲपवर शेअर करत आहेत. गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. १५ ऑक्टोबर म्हणजेच आचारसंहिता लागू झाल्यापासून ते १४ नोव्हेंबर या महिन्याभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात १ हजार २०१ तक्रारी या ॲपवर प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या १ हजार २०१ तक्रारींपैकी १ हजार १०९ तक्रारी या बरोबर आढळून आल्या आहेत. यातील १ हजार ३८ तक्रारींचा निपटारा १०० मिनिटांत करण्यात आला आहे. तर, ९२ तक्रारी या वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली.