लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: कचरा म्हणून नागरिकांकडून फेकल्या जाणाऱ्या काही वस्तुंचे विघटन, त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेकडून १० प्रभाग क्षेत्र हद्दीमध्ये कचरा संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

२० मे ते ५ जूनपर्यंत कचरा संकलन केंद्रांवर सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत कचरा संकलित केला जाणार आहे. नागरिकांकडून घरात वापरून झालेल्या पण पडीक असलेल्या जुनी खेळणी, दप्तरे, बूट, चप्पल, प्लास्टिकच्या वस्तू, खेळणी, वापरातील पण सुस्थितीत असलेली पुस्तके कचरा म्हणून फेकून दिली जातात. रद्दीत दिली जातात. अशा वस्तु पालिकेच्या माध्यमातून विविध संकलन केंद्रांवर जमा करायच्या. या वस्तू शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, कचरा पुनर्प्रक्रिया करणाऱ्या संस्था यांच्या ताब्यात द्यायच्या. ज्यामुळे कचरा केंद्रांवर चांगल्या स्थितीत असलेला कचरा जाणार नाही. या कचऱ्याचा शहरात पुनर्वापर करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.

आणखी वाचा-अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाच्या कुटुंबियांना मिळाले विम्याचे एक कोटी रुपये

ही कचरा केंद्रे पाच स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहेत. प्रभागातील कर्मचारी, महिला बचत गट सदस्य, कचरा वेचक संघटना प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी असतील, असे आयुक्तांनी सांगितले. जमा टाकाऊ साहित्य पुनप्रक्रियेसाठी, वापरासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना दिले जाणार आहे. कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी महिला बचत गटांना कापडी पिशव्या विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

कचरा संकलन केंद्रे

अ प्रभाग क्षेत्र, वडवली गाव, ब प्रभाग क्षेत्र, वाणी विद्यालयाजवळ, कल्याण, क प्रभाग क्षेत्र सुभाष मैदान, अत्रे मंदिरा जवळ, कल्याण, जे प्रभाग, भगवती अभिलाषा कन्ह्वेंचर, रेल्वे तिकीट खिडकीजवळ, कल्याण पूर्व, ड प्रभाग क्षेत्र, कल्याण पूर्व, फ प्रभाग क्षेत्र, जुने डोंबिवली विभागीय कार्यालय, ह प्रभाग क्षेत्र, उमेशनगर, डोंबिवली पश्चिम, ग प्रभाग क्षेत्र, मारुती महादेव सोसायटी, सुनीलनगर, आय प्रभाग क्षेत्र, गायत्री सोसायटी, पिसवली, कल्याण पूर्व. ई प्रभाग कार्यालय, रिजन्सी इस्टेट, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 collection centers in kalyan dombivli municipal corporation for recycling waste materials mrj