मुंबई, ठाण्यातील तरुण मंडळींकडून दहा ठिकाणी खासगी हवामान केंद्रे

ठाणे : भारतीय हवामान खात्याचा अंदाज नेहमीच फसतो, अशी सार्वत्रिक ओरड ऐकायला मिळते. त्यातही सरकारी हवामान यंत्रणा ठरावीक ठिकाणीच असल्याने त्या परिसराच्या आसपासच्या भागातील हवामानाचा आढावा घेणे कठीण असते. नेमकी हीच बाब हेरून मुंबई-ठाण्यातील काही तरुण मंडळींनी वांगणीसह दहा ठिकाणी खासगी हवामान केंद्रे स्थापन केली आहेत. उपग्रहामार्फत घेतल्या जाणाऱ्या नोंदीच्या आधारे या केंद्रांमध्ये हवामानाचा शास्त्रशुद्ध आढावा घेणे शक्य झाले आहे.

हॅम रेडिओद्वारे आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहन यंत्रणा उपलब्ध करून देणाऱ्या काही हॅमप्रेमी तरुणांनी मुंबई-ठाणे परिसरात एकूण दहा हवामान केंद्रे कार्यान्वित केली आहेत. त्यातील पहिले केंद्र वांगणी येथील संकेत देशपांडे यांनी त्यांच्या घरी गेल्या वर्षी उभारले आहे.

या हवामान केंद्राद्वारे त्यांना उपग्रहामार्फत पाच ते दहा किलोमीटर परिघातील हवामानाची इत्यंभूत माहिती मिळते. घराच्या छतावर बसविलेल्या एका बिनतारी संदेश ग्रहण यंत्रणेद्वारे संकेत देशपांडे यांना रोजचे तापमान, वाऱ्याची दिशा, हवेचा दाब, ढगांचे तपमान, त्यातील आर्द्रता, पडणारा पाऊस याचे अचूक तपशील मिळतात. ती सगळी माहिती घरच्या संगणकात ते संग्रहितही करतात.

संकेत देशपांडे यांनी गेल्या वर्षी अमेरिकेतील त्यांच्या बहिणीकडून हे हवामान केंद्र मागविले. त्यावेळी त्यांना दहा हजार रुपये खर्च आला. आता तर ही यंत्रणा भारतातही सहजपणे उपलब्ध आहे.

शिवाय त्याची किंमतही कमी झाली आहे. अवघ्या चार-पाच हजारात घरच्या घरी हे हवामान केंद्र बसविता येते. संकेत देशपांडे यांच्या मुंबई परिसरातील काही मित्रांनीही आता ही यंत्रणा घरी बसवली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील ठिकठिकाणच्या हवामानाची माहिती मिळते. गेल्या वर्षभरातील अनुभवावरून ही माहिती ९५ टक्के अचूक असल्याचे संकेत देशपांडे यांनी सांगितले.

तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

या हवामान केंद्राद्वारे मिळणारी माहिती अचूक आहे, मात्र त्या माहितीचा अर्थ लावून भविष्यातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी विशेष अभ्यासाची आवश्यकता आहे. संकेत, त्याचे मित्र सुयोग देशमुख, अक्षता तावडे आणि इतर आता तो अभ्यास करीत आहेत. हवामान खात्याचे संचालक कृष्णा होसाळीकर आम्हाला यासंदर्भात मार्गदर्शन करीत असल्याचे संकेत देशपांडे यांनी सांगितले.

Story img Loader